सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

कळत नाही


कळत नाही
*******
हे आंदोलन कुणाचे 
आम्हाला खरंच नाही कळत
यातून कुणाला फायदा मिळणार
आम्हाला खरंच नाही उमजत
लाखो रुपयांच्या गाड्या उडवीत
ते येतात फौजा घेऊन 
अन् ठेवतात बिनधास्तपणे 
शहर वेठीस धरून 
पण कुणाच्या आशीर्वादानं
नाहीच कळत .

इथे तिथे दिसतात ढीग
जेवणाचे खाण्याचे बाटल्यांचे 
जे सडते वाया जाते 
फेकले जाते बेफिकिरपणे 
कळत नाही हे पैसे कोणाचे

मान्य आहे मला 
या शिड्या आवश्यक आहेत 
अंधारातून प्रकाशाकडे येणाऱ्यांसाठी 
दलदलीतून जमिनीवर चढण्यासाठी 
पण जे बसले आहेत किल्ल्यावर 
होऊन राजे किंवा सरदार 
त्यांना त्या कशाला हव्या आहेत 
त्यांचा डोळा आहे नेमका कश्यावर

हा खरंच लढा आहे 
का ही आहे असूया
किंवा हे आहे छूपे छद्म राजकारण  
जे नाही समजू शकत
आम्ही सामान्य जन
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

समांतर

 


समांतर  
*****"
दोन किनारे सदैव
खिळलेले समांतर 
युगे युगे साथ तरी 
भेट नच आजवर 

तीच स्थिती तीच माती 
तीच प्रियजन सारी 
काही पूल काही बोटी 
चालतात व्यवहारी 

आटूनिया पाणी जाता 
किनारे उरत नाही 
भेट घडे जरी काही 
भेट त्या म्हणत नाही

किनार्‍याच्या नशिबात 
प्रवास हा समांतर 
अन् प्रवाहात वाहे
जीवनाची तीच धार

किती मने किनाऱ्याची
किती घरे प्रवाहाची  
किती एक कल्लोळात 
कथा कळे विरहाची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


बोले देव आळंदीचा

बोले देव आळंदीचा 
***************
प्रेमबळे बोले देव आळंदीचा 
उधळीत वाचा ज्ञान फुले ॥
शब्द प्राजक्ताचे शब्द चांदण्याचे 
शब्द लावण्याचे रूप जणू ॥
गायन कुसरी साज शब्दावरी 
अर्थ मनावरी राज्य करी ॥
हरवले प्रश्न अवघ्या जनाची 
मने वैष्णवांची तीर्थ झाली ॥
मोक्ष एक एका घेई कडेवरी 
भक्ती गालावरी तीट लावी ॥
अवघा अपार लोटला आनंद 
नंद ब्रह्मानंद मूर्त रूप ॥
ओलांडून काळ जन्म हा धावतो
कणकण होतो ज्ञानदेव ॥
पानोपानी  दिसे चित्र हे देखणे 
विक्रांत पाहणे धन्य झाले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

दत्त व्हावे

दत्त व्हावे
********
इथे तिथे मज दिसो दत्त फक्त
जगण्याच्या आत एकमेव ॥

नको माझेपण जीवनाचे भान  
व्यापून संपूर्ण राहो दत्त ॥

कुणा काय देणे कुणाचे वा घेणे 
दत्ता विना उणे होऊ नये ॥

साध्य साधनेचे साधनची व्हावे 
दत्तात नांदावे सर्वकाळ ॥

प्रश्न जगण्याचे प्रजा प्रपंचाचे 
आजचे उद्याचे दत्त व्हावे ॥

एकच उत्तर अवघ्या प्रश्नाला 
यावे आकाराला दत्त रूपी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

पूर्णस्य पूर्णमादाय


पूर्णस्य पूर्णमादाय 
**************
सर्जन विसर्जनाचा 
खेळ तुझा आवडीचा
क्षणोक्षणी खेळतो तू
कोटी कोटी जीवनाचा 

काळामध्ये बांधलेला 
काळओघी चाललेला
हा पसारा अस्ताव्यस्त 
नियमात कोंडलेला 

साऱ्यामध्ये असूनही 
साऱ्यांच्याही पलीकडे 
शोधू शोधूनी जना या
रूप तुझे ना सापडे 

जरी मानतो ऐसे की
या जगता कारक तू 
तारक तू मारक तू
भक्ष्यक तू भक्ष्य ही तू 

नियमा या अपवाद 
जरी नाही कुणी इथे
होता विसर्जन पण
असशील रे तू कुठे ?

अन होईन विसर्जन 
हे  सारे कश्यात कुठे?
का सर्जन विसर्जन
फक्त मायिक असते ?

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं 
पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय 
पूर्णमेवावशिष्यते॥

ॐ शांति, शांति, शांतिः

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️  

मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

मोकळा

 

मोकळा
********
करी रे मोकळा माझ्यातून मला 
घडवी दयाळा कृपेचा सोहळा 

सरो व्यवहार सर्व हा संसार
नको उपचार नको उपकार 

निर्बंध निराळा मेघ मी मोकळा 
हिंडत राहावा माईचा किनारा

नको मनी खंता दाणापाणी चिंता 
ओढून आकाश निघावे दिगंता

दत्त नाम घ्यावे स्वरुपा स्मरावे
गुरु सेवेलागी नित्य रत व्हावे 

याहून विक्रांता अन्य नको काही 
सर्वकाळ चित्त राहो तुझ्या पायी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

गणपती

गणपती
******
कुठे कुठे रूप तुझे
कितीदा मी न्याहाळतो 
तोच भाव तीच श्रद्धा 
जीव उमलून येतो ॥ १

सजावट मुळी सुद्धा 
मन हे पाहत नाही 
तुझ्या डोळी हरवतो 
काळ तो उरत नाही ॥ २

क्षण एक दोन तीन 
पांगुनिया कोश जाती 
लखलखे वीज एक 
पंचप्राण पेट घेती ॥ ३

मृतिकेचा देह माझा 
मृतिकेला दूर सारी 
विरुनी भास आभास 
तूच दिसे मुलाधारी ॥ ४

पालटती युगे किती 
जन्म किती उलटती
तुला मला पाहतो मी 
वर्तुळात कोटी कोटी ॥ ५

असणेही व्यर्थ होते 
नसणेही अर्थ देते 
कळते ना काही जरी 
जाणणे ते शून्य होते ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
//kavitesathikavita.blogspot.  
☘☘☘☘ 🕉️

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...