गुरुवार, २७ जुलै, २०२३

सुमन

सुमन 
****
जीवन सुमन दत्ताला वाहिले 
काही न उरले माझे आता ॥

सुमन कुठल्या असो रानातले 
केवळ फुलले तयासाठी ॥

स्वीकारा दयाळा जरी कोमेजले. 
कृमीं टोकरले असो तया ॥

उन वारीयास साहत राहिले
डोळे लागलेले तया वाटे॥

आता ओघळेल तरुच्या तळाला 
नेई रे कृपाळा तेव्हा तरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

बुधवार, २६ जुलै, २०२३

बाहुला


बाहुला
*****

पायरी पातलो दत्ता तुझी आता 
नाही भय चिंता 
जगताची ॥
बाप कनवाळू झाला अनिवार 
नेले मनापार 
धरूनिया ॥
ठेविले मज देह मनातील 
वस्त्र दाखवीत 
जणू काही ॥
पांघरतो मन देही कधी जरी 
गाठी झाल्या दुरी 
बांधलेल्या ॥
परी वठवतो भूमिका ती छान
दत्त प्रयोजन 
समजून ॥
अंतरी बाहेरी करी तो ची लीला 
अरे मी बाहुला 
तयाधीन ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

मंगळवार, २५ जुलै, २०२३

सांगावा

सांगावा
*****
चार शब्द तुझे आले चांदण्यांचे
बरसले थेंब जणू अमृताचे ॥

किती आडवाटा फिरून ते आले 
किती तटबंद्या मोडून ते आले ॥

शब्द कसे म्हणू तया भाषेतले 
सापडले मज प्राण हरवले ॥

वठलेल्या झाडा अंकुर फुटले 
आटत्या तळ्यास जीवन भेटले ॥

जरी सांगाव्यात होते न भेटणे 
भेटण्याची घडी पुढे ढकलणे॥

दडलेले त्यात होतेच भेटणे 
पुन्हा पुन्हा स्वप्न एक भरारणे.॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘


सोमवार, २४ जुलै, २०२३

स्वामी माय

स्वामी माय
*******
तुझ्या करूणेने चिंब मी भिजलो  
स्वामी सुखावलो 
अंतर्यामी ॥१
तुझिया दर्शने जाय क्षीण सारा
चैतन्याचा झरा
वाहे देही ॥२
जीवन खेळात पडतो रडतो 
बाप सांभाळतो 
जाणे परी॥३
किती कष्टतोस देवा माझ्यासाठी 
येसी घडोघडी 
सांभाळाया i४
विक्रांत निश्चिंत असे सर्वकाळ 
पाठी स्वामी माय 
म्हणुनिया ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, २३ जुलै, २०२३

दादा गावंड यांची कविता (अनुवाद)

दादा गावंड यांची कविता (अनुवाद)
*******************
मन भटकते  भटकू त्या दे रे 
राहुनिया शांत तयाला पहा रे ॥१

बाहेर धावते व्याकुळ करते 
रहा रे अंतरी शांत तू स्तब्ध ते ॥२

राहू दे वाहू दे मन विचार रे
व्यस्त सदोदित अन विखुरले ॥३

जाणीव निश्चल अलिप्त नि शांत 
आपुलिया आत सदा अखंडित ॥४

सौर्य मंडलास सदैव भ्रमण 
सूर्य  परी राही ढळल्या वाचून ॥५

धावू दे इंद्रिय इंद्रियाच्या अर्थी 
होवो कासावीस मन मेटाकुटी ॥६

परंतु ती ऊर्जा असू दे अलिप्त 
धावू देत मन निरखी त्या शांत ॥७

फुटतात लाटा अनंत वरती 
अंतरी सागरा गांभीर्य नि शांती ॥८

भटकती मेघ सर्व जगतात 
परी आकाश ते पवित्र निस्तब्ध ॥९

घटती घटना घडो जीवनात 
राही अंतरी तू सावध निवांत ॥१०

बडबडे मन सदैव बेशिस्त 
ठेव आकलन शांत मी दुरस्थ ॥११

प्रखर प्रदग्ध पाहणे घडता  
शांती व नम्रता उलगडे चित्ता ॥१२

अरे तू आकाश असीम अनंत 
नच पसरले मेघ अस्ताव्यस्त ॥१३

सावध सुधीर संवेदनशील 
आहेस तू साक्षी तुच जाणशील ॥१४

क्षणिक स्मृती नि क्षणिक विचार 
नाहीस रे तू जाण हे साचार ॥१५

सखोल गंभीर प्रचंड सागर 
तरंग ना तू जो दिसे वरवर ॥१६

असेअविचल सूर्य तू महान 
नच उपग्रह विचार भ्रमण ॥१७

तूच तूच आत शाश्वत नि स्थिर 
विनाशी ढसाळ दिसे जै बाहेर ॥१८

अनंत अव्याप्त असा जो शाश्वत 
अजन्मा प्राचीन असा तू रे फक्त ॥१९

तत तत्व असी तूच असे तो रे 
तत तत्व असी तूच असे तो रे ॥२०

तुझ्यातील ते हे सदा तुझे व्हावे 
जाणीवी जाणीव सारे उजळावे ॥२१

कालाच्या अतीत दिव्य अनुभूती 
अक्षय अवीट यावी तुझे हाती ॥२२

मूल्यवान अशी घटिका ही आहे 
मूल्यवान क्षण आताचाच आहे ॥२३

करी हे चिंतन धरी रे तू ध्यान 
घेई तू जाणून आपल्या आपण ॥२४

दिव्य ते आपले अंतर जाणून 
शाश्वत नित्य घे स्वरूप पाहून ॥२५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, २२ जुलै, २०२३

सांभाळ



सांभाळ
*******
किती रे इवली दत्ता माझी उड़ी 
उगा धडपड़ी डबक्यात ॥१
पाहतो गरुड नभी या भरारे
किव वाटते रे माझी मला ॥२
इवल्या जन्माची इवली साधना 
तिची ती गणना काय जगी ॥३
दग्ध होते तृण जसे वणव्यात
जळणे तद्वत जपीतपी ॥४
जन्म लावुनिया कुणी ते पणाला 
कुरवंडी तनाला करतात ॥५
जप कोटीकोटी नाम कणोकणी 
धन्य पुरश्चरणी होती कोणी ॥६
कोणी ध्यानमग्न काळा न गणता 
मना ते सरता करूनिया ॥७
कोणी ज्ञानयज्ञी तत्वी ठाण देती 
तेच तेरे होती सायासाने ॥८
अन मी संसारी भोगात रमतो 
क्वचित स्मरतो तुज कधी ॥९
मज खंत वाटे माझिया यत्नाची 
तुझिया भेटीची सोय नाही ॥१०
सांभाळ विक्रांता दोष न पाहता 
जवळ घे आता दयाघना ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

पूनव

पूनव
******
कितीतरी लांबलेली 
अवस आज सरली 
चांदणे पांघरूनी ही 
नभी पुनव दाटली ॥

पाकळी पाकळी मनी 
नवउन्मेषी  बहरली 
शुभ्र ज्योत्स्ना अंतरंगी 
उजळूनी दीप जाहली ॥

हा स्पर्श तुझाच ऋजू 
तुझ्याविनाच जाहला 
देह सतारीचा धुंद 
कंपनांनी थरारला ॥

अन पुन्हा उधानले 
शब्द शब्द मोहरले 
आठवेना मनास या 
काय किती ते बोलले ॥

या  ऐशिया ऋतूची रे 
वाट किती मी पाहिली 
दैन्य सरे प्राक्तनाचे 
ऋतुपती दारी आले ॥

ठेव मना जपून हे 
भाग्य नव केसराचे 
घे भरुनी डोळा आता 
रंग गंध जीवनाचे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...