शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

बळे बळे दत्ता

बळे बळे दत्ता
***********

बळे बळे दत्ता 
तुझ्या दारी येतो  
सोडुनिया लाज 
तुला धरु जातो

नाही रे वैराग्य
नाही ज्ञान भक्ती
तप करण्याची 
इवलीही शक्ती 

नाही संत संग
नाही पारायण 
हिंडतो जगात 
स्वच्छंद मी होत

जर का पाहसी 
लायकी तू माझी 
देवा ती ही नाही 
भक्त खेटरांची 

मिळते गचांडी 
तुझिया दारात 
हाकलती देती
लाथा पेकाटात 

तुझे द्वारपाल 
योगी महाराज 
मज पाहुनिया 
होतात नाराज

परी मी  लोचट
श्वान दारातला 
तुकडे मागत
येतो उंबऱ्याला 

भुंकणे भोगणे
तुज विसरणे 
नित्य जरी घडे 
हेच व्यर्थ जीणे

विक्रांत पतित 
रे पतिताहून 
तयां न आसरा 
तुझ्या कृपेविन

उदारा उद्धरा
पदी द्या आसरा
जाणून घेवून
अजाण लेकरा 
******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

इंद्रायणी तीर


इंद्रायणी तीर
**********

मज बहु प्रिय 
इंद्रायणी तीर 
जीवीचे जिव्हार 
जिथे नांदे ॥

अलंकापुरीचे 
वयोवृद्ध बाळ 
चिन्मय ती खोळ 
पांघरून ॥

वेधियले मन 
तयाच्या शब्दांनी 
आनंदाचा धनी 
केले मज ॥

आहाहा अद्भुत 
होतसे विस्मित 
चित्त चाकाटत   
तया माजि॥

प्रज्ञेच्या राऊळी 
तेजाची पखाल 
होय निर्विकल्प 
अभिषेक ॥

ऐसा ध्यानीमनी 
राहतो नांदूनी
मज पांघरुनी 
सर्वकाळ ॥

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

सत्य (poem for a friend who lost her husband in covid )

सत्य  (poem for a friend who lost her husband in covid )
********

सुख असे काय ?
दुःख असे काय ?
तुजलागी काय !
सांगू तरी ॥

भेटले चांदणे 
भोगले अपार 
आजचा अंधार 
क्रमप्राप्त ॥

कुठल्या झाडाची 
किती ती पालवी 
वसंत ठरवी 
आपणचि ॥

मालविता दिप 
अंधार पडतो 
डोळा सरावतो 
पण त्याही 

मंद प्रकाशाची 
ऋजू चांदण्याची 
दौलत लाखाची 
दाखवितो 

तुटतात धागे 
तडतड होते 
वस्त्रही कण्हते 
वियोगाने 

आहे तया हाता
परी सांभाळणे 
जीवनाचे लेणे 
आपणच ॥

भरतील घाव
उद्या वियोगाचे 
आहे जगायचे 
घरासाठी॥
 
कोसळता वृक्ष 
देई फांद्या बुंधा 
आधार तो खंदा 
अजुनही

प्रिय त्या स्मृतीला 
देत धन्यवाद 
चाल आता वाट 
दृढ पणे

याहून अधिक 
काय ते सांगावे 
शरण ते जावे 
तथागता ॥

तयाहून थोर 
कुणाला ते ठावे 
जगती रहावे 
कसे काय ॥

जगी दुःख आहे 
कारणही आहे 
जाणुनिया पाहे 
निवारण ॥

इतुके सांगतो 
विक्रांत थांबतो 
आणिक प्रार्थतो
कळो तुज


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, ३ जानेवारी, २०२१

२ कृष्ण

देव तू 
किंवा माणूस 
देवत्वास 
जो गेला कुणी 

अफाट आणि 
अद्भुतसे जे
जाणतो मी   
गेले घडूनी
 
कळल्या वाचूनी
तुझी लीला 
इथे तिथे मग 
जावून भटकूनी

तुजलागी मी
घेवू पाहतो 
ह्रदयी जाणूनी
भक्त होवूनी

परी दिसे तो 
मज चालला
बाजार  खुला रे
बहु लोटला 

तो भक्तीचा 
भरे स्वार्थाने
धनमानाचा 
तव नावाने

तुजला भजती 
येवूनी रडती
विकार मनीचे
गेल्यावाचूनी
(त्यात जरी मी )
भक्ती दाटूनी

असे चालले 
काय ते जीवन
तुजला  जाणेल
कृपा लेवून?

सीमा धुसर 
जिथे जाहल्या 
देव आणिक
मानव्यातल्या 

दिव्य दर्शना
अश्या सजल्या 
मन व्याकुळ रे
तव गोपाला 

आशा भरले 
आस दाटले 
जीवन कळण्या 
आतुर झाले.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, २ जानेवारी, २०२१

कृष्णास. .


कृष्णास
********
वर्षानुवर्षे मी येत आहे
कृष्णा तुझ्या मंदिरात  
वर्षोनुवर्ष  ऐकत आहे
देवा  तुझे भागवत.

दुर्लभ तुझे दर्शन
मनोमनी मी जाणतो
आधाराविन कुठल्या
तुला सर्वस्व मानतो

किती वेळा ऐकलेय
तुझे दिव्य जन्म घेणे
पुरातून पार होणे
यशोदेचे सांभाळणे

गोपजनासवे मस्त
गोकुळात बागडणे
वेड्या गोपी राधेसवे
रासलीलेचे  रचणे

एक एक येता दैत्य 
त्यांना सहज वधणे
पुढे मर्दून कालिया
अंति कंस निर्दाळणे

हे सारे लोभसवाणे
करते  मनोरंजन 
तरी पण काही तरी 
वाटते अपुरे पण

तुझे माणूस असणे
तुझे गुणात खेळणे
पायास बाण लागून 
सहज असे मरणे

मामा असून तू तुझ्या
अभिमन्युचे मरणे
खून द्रौपदीपुत्राचे 
निद्रेत संपून जाणे

भीष्म द्रोण यांचे रणी
निरर्थ  जीवन जाणे
बलशाली यादवांचे 
उगा उच्चाटन होणे

होय मी वाचले आहे 
कित्येक ग्रंथ यावर 
जे न येवू देती कधी
आच देवा तुझ्यावर

कर्म गती सांगणारे 
धर्म नीती मांडणारे  
खरंच सांगतो परी
वाटती ती पोकळ रे  . .

तुझ्या चरित्राचा अर्थ 
होता परित्राणाय साधू 
तर मग सांग कसा 
आला तयास तो बाधू 

जरी मज आवडतो 
तू हृदयात वसतो
कळल्यावाचून धुक्याचा 
पण तरंग असतो 

कृष्णा मज कृष्ण कळू दे 
अन् माझा जन्म फळू दे 
चरित्रात त्या दडलेले 
अमृत कण मिळू दे !

**************:*:::
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

दत्त प्रभावळ


दत्त प्रभावळ
+******


निवले हे डोळे 
शांत झाले मन 
श्री दत्त चरण 
पाहूनिया ॥१॥

रम्य प्रभावळ
सद्बक्ती प्रेमळ
सुखची केवळ
मांडलेले ॥२॥

केले देवराये
किती हे कौतुक 
मिरवि एकेक 
अलंकारे ॥३॥

भक्तिला निमित्त
सारे उपचार
दत्त अंगिकार 
होईस्तो रे॥४॥

मग देव भक्त  
आणिक देव्हारा 
उरे व्यवहारा 
कुणा दुज्या ॥५॥

विक्रांत दत्ताचा 
विनवि दत्ताला 
दावि रे आतला 
भाव शुद्ध॥६॥ 

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

दत्ताचे घर

दत्ताचे घर
*******::
फार फार दूरवर
दत्ता तुझे घर आहे 
थकलेले पाय माझे 
डोळ्यात काहूर आहे ॥

येशील का नेशील का 
मन चिंतातुर आहे 
विझलेले त्राण सारे
गालावर पूर आहे ॥

सगुणाचे गीत गाण्या
जीवन आतुर आहे 
निर्गुणात हरविण्या
जीवी हुरहुर आहे॥

घेतलास भार माझा
फक्त तू आधार आहे
तुझे प्रेम हेच सार
बाकीचा व्यापार आहे॥

तू म्हटले तर देवा
मी इथे गाणार आहे
येऊनिया परी कधी 
कानी सांगणार आहे ॥

मान्य आहे तशी काही 
माझी मोठी भक्ती नाही 
शब्दांचा हा जोड धंदा 
फारसा बाजार नाही ॥

खरे खोटे शब्द जरी
तुच तो दातार आहे 
लिहण्याची आटआटी
तुझा कारभार आहे

रोज पाहे रांग जरी
आलो कुठवर आहे
पहीलीच पायरी नि
शेवटी नंबर आहे ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...