ज्ञानेश्वर महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्ञानेश्वर महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

महावृक्ष


मावुली
*****
तृषार्थ जगता 
पाहुन द्रवला 
कृपा  अंकुरला
महावृक्ष

जरी विश्वाकार
देहात कोंडला
अन बहरला
घनदाट ॥

बीज करूणेचे
बीज चैतन्याचे 
बीज कैवल्याचे 
वर्षवता ॥

प्रारब्धा वाचून 
दुःख ते भोगले 
जगता दिधले 
छाया सुख ॥

बोलणे तयांचे
अमृत फळाचे 
मधूर अर्थाचे
रसराज ॥

वदते मावुली
जग तया सारे 
शब्द न दुसरे 
सार्थ अन्य॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

चैतन्य


चैतन्य
*****

इंद्रायणी तीरी 
विश्वाचा गाभारा 
देव ज्ञानेश्वरा 
मांडलेला ॥१॥

ज्ञानियाचा राजा 
त्रैलोकाच्या वोजा 
भक्ताचीया काजा 
नित्य जागा ॥२॥

आठशेहून ती
उलटली वर्ष 
दिव्यत्वाचा स्पर्श
तरी तोच ॥३॥

थकल्या वाचून
आभाळ होऊन 
भक्तीचा घेऊन
ओघ येतो ॥४॥

चैतन्य कोवळे 
अखंड झळाळे 
पाहणारे डोळे 
सुखावती॥५॥

विक्रांत वेचतो 
तयाचे ते कण 
आनंद होऊन 
शब्दातीत॥

*+*+*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, १० जानेवारी, २०२१

योगी


योगी
******

मरणा मरण 
देऊनिया योगी 
रहातसे जगी 
संजीवन ॥

अपार करुणा 
बांधून गाठीला 
देण्यास जगाला 
आत्मबोध ॥

थांबवला मोक्ष 
संकल्प बळाने 
अत्यंत प्रेमाने 
भारावून ॥

कृपाळू ज्ञानाई 
निवृत्ती सोपान 
मुक्ताई महान 
तया परी ॥

घडविला मेघ 
मोडीयला मेघ 
तैसे त्यांचे जग 
अद्भुतसे॥

विक्रांत जाणून 
त्यांचे उपकार 
लीन पायावर 
सदा होय॥
**********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी 
*****
शब्दातील आर्जव 
शब्दातील मार्दव 
शब्दातीत भाव
 ज्ञानदेवी ॥

शब्दांचे  औदार्य 
शब्दांचे सौंदर्य 
अद्भुत हे कार्य 
ज्ञानदेवी ॥

कृष्ण कृपा कर 
पुन्हा एकवार 
प्रेम दे अपार 
ज्ञानदेवी॥

तरले तरले 
अपार इथले 
पैल थडी गेले 
पुण्यवान ॥

तेच भाग्यवंत 
झाले ज्ञानवंत 
स्तनाला झोबंत
दूध प्याले ॥

विक्रांत सेवतो
तयाचे उच्छिष्ट 
सुखाने संतुष्ट 
जीव होय॥
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
*********

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

इंद्रायणी तीर


इंद्रायणी तीर
**********

मज बहु प्रिय 
इंद्रायणी तीर 
जीवीचे जिव्हार 
जिथे नांदे ॥

अलंकापुरीचे 
वयोवृद्ध बाळ 
चिन्मय ती खोळ 
पांघरून ॥

वेधियले मन 
तयाच्या शब्दांनी 
आनंदाचा धनी 
केले मज ॥

आहाहा अद्भुत 
होतसे विस्मित 
चित्त चाकाटत   
तया माजि॥

प्रज्ञेच्या राऊळी 
तेजाची पखाल 
होय निर्विकल्प 
अभिषेक ॥

ऐसा ध्यानीमनी 
राहतो नांदूनी
मज पांघरुनी 
सर्वकाळ ॥

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...