बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

खरे होते





खरे होते
*****

शब्द खरे होते
सूर खरे होते
परि यार माझ्या
कानी दडे होते ॥

रूप खरे होते
रंग खरे होते
परि डोळे स्वप्नी
अंध बंद होते ॥

चित्र खरे होते
विश्व खरे होते
कागद मनाचे
जळलेले होते ॥

श्वास उरी होते
हात करी होते
भीतीच्या सावली
जन्म दुरी होते ॥

देव खरे होते
गुरू खरे होते
जर तर वैरी
भाऊबंद होते ॥

चंद्र खरा होता
शीत खरे होते
विक्रांता काय रे
जळत ते होते॥
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kaviteshahikavita.blogspot.com

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

मौन वना

 मौन वना
 *******
नुकतीच गाथा
परत वाचली
बांधून ठेविली
कपाटात

नुकतीच फुले
काढली सुकली
नेऊन टाकली
निर्माल्यात

नुकताच  गंध
गेला हरवून
वाऱ्यात वाहून
दूरवर

मिटले सुटले
हौसेने  मांडले
तिथेच राहिले
पाटावर

विक्रांत पाहिले
जुनाट खेळणे
मांडणे मोडणे
होतानासे

गेला मांडणारा
मांडणे सोडून
गर्द हरवून
मौन वना
***

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

स्वामींचा



 स्वामींचा 
********
तुच तू दयाळा
कृपा अवतारा
चैतन्य सागरा
स्वामी राया

ज्ञान सागरीचे
मोती तू शोधून
आणिले वेचून
 आम्हासाठी

आमच्यासाठी तू
किती शिणलास
प्रसाद   दिलास
बहू प्रेमी

लंघणे पर्वत
हिंडणे जंगले
गिरी नि कंदरे 
जयासाठी 

केल्याविन सारे 
हाती दिले भोजे 
त्वा स्वानंद राजे
केले देवा

कैसे होवू तुज
आता उतराई
ओवाळू कायाही
तुजवरी

विक्रांत धाकुला
हट्टाने अडला
स्वामींनी घेतला
कडेवरी

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

मागावे कुणाकडे


मागावे कुणाकडे
 *************
मागावे कुणाकडे काय आणि कसे
थेंब टपोऱ्या दवावरून चालावे कसे

मागणे बहु मनी जरी असे दाटलेले
ओठांच्या पाकळीत मौनगंध साठलेले

मागणारे हात जरी थरथर बुजणारे
ठाव नच असेल का ते फुलांनी भरलेले

मागु हात हातामध्ये सोडुनीया लोकलाज
पाहू किंवा दुरूनच तया दारी होत सांज

मागण्याचा आर्तभाव कळेल का कुणाला
तनी मनी दाटलेला आवेग हा अर्पणातला

बंध हे जीवनाचे घातलेले जीवनाने
सूर-ताल मुक्त माझे कोण ऐकेल रे गाणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

डंका





डंका
**********
हिंदु ना धर्म
फक्त पुजनाचा
हिंदु  शोध रे
अर्थ जीवनाचा  

धर्म सनातन
जाणे आत्मज्ञान
मना मनात
असे तत्वज्ञान

हिंदु टिकला
तरच टिकेल
बौद्ध जैन अन
शिख या भुवर

पडले  इराण  
पडतील आण
सांग तयाला
कोण वाचवीन

इथेच जन्मुन
इमान विकला
जो पर देशाला  
रे धत तयाला

त्या का म्हणावे
या देशाचा
पुत्र कुलक्षणी  
तो आईचा

सशक्त व्हावा
धर्म हा संपन्न
सर्व त्रुटीना
देत फेकून

हाच केवळ
आहे त्राता  
या जगताचा
सौख दाता

यात मजला  
मुळी न शंका
म्हणुन पिटतो
मी  हा डंका

**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

वलय




पाणीयाचे थेंब
पडता पाण्यात
नक्षी वलयात
उमटती
हिरव्या डोहात
चंदेरी कड्यांचे
सौंदर्य क्षणांचे
दृश्य होते
वलया न क्षिती
मिटून जाण्याची
येण्याची जाण्याची
कधी कुठे
तिथलेच पाणी
होय वरखाली
ऊर्जेची कोवळी
रेष धावे ‍‍‍ ‍‍‍
आयुष्य वलय
तैसे अस्तित्वाचे
एकाच क्षणाचे
विश्व डोही
विक्रांत पाहतो
घडता सोहळा
पाहणारा डोळा
होऊनिया

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

द्वैत माहेर





द्वैताच्या माहेरी
अद्वैताचे गाणे
घेऊन साजणे
आले कोणी 
आता माझे मन
इथे ग  रमेना
संग सोसवेना
इतरांचा 
तोच तो ग मनी
राहिला भरुनी
झाले मी दिवानी
एकत्वाची 
कल्लोळाची ओढ
लागली थेंबाला
निघे मिटायला
दुजेपण 
सुटावे माहेर
सुटावे सासर
उभी वाटेवर
राहावी मी 
मग आहे नाही
येणे जाणे काही
रंभागर्भ वाही
गती व्हावी 
विक्रांत गडनी
सद्गुरु स्वामिनी
पाहते हसुनी
कौतुकाने 
दावी खाणाखुणा
जीवीच्या त्या गोष्टी
भरुनिया प्रीती
ओतप्रोत
 **
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...