बुधवार, १४ जानेवारी, २०१५

सहाऱ्यातील चंद्र





गौर तनुवर
वस्त्र अबोली
चंद्रकोर अन
गोऱ्या भाळी

गाली सौम्य
कोवळ लाली
ओठ जसे की
गुलाब पाकळी

डोळ्या मध्ये
ताम्र वर्ण तो
सहाऱ्यातील
चंद्र भासतो

मुद्रा मोहक
जादू भरली
मूर्त तुझ्या
या रूपातली

पाहून कविता
माझी बहरली
शब्द तोकडे  
दाटी झाली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

असमाधान






असमाधान..
सतत अस्तित्वमान
अतृप्ती गतिमान
अधिक अधिक अधिकाधिक
उदंड पिकते आहे पिक
एकेक दाणा रुजवून पुन्हा
उगवणारा रुजतो दाणा
आज नाही तर उद्यातरी
करिता करिता जन्मभरी
संपून व्यापून जीवनमान
केवळ उरते असमाधान

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

दाता कोण घेता







माझे मन तुला
टाकले देवूनी
तरीही विकार
येतात दाटुनी

कळल्या वाचुनी
येते हे घडुनी
हातातुनी पाणी
जाते ओघाळूनी

का न तू मन हे
घेतले अजुनी
का न मज देता
आले ते अजुनी

उदास अंतर
भरले व्यथेनी
दाता कोण घेता
न ये रे कळूनी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...