गुरुवार, ५ जून, २०१४

प्रेमकांक्षा







दिन गेला सुना सुना
तुझ्या माझ्या भेटीविना
सखी तुझ्या डोळ्यातील
चंद्र आज पहिला ना

प्राणोत्सुक आतुर मी
तरीही होतो थांबलो
बहकलो होतोच की
नजरेत त्या बांधलो

वाट होती थबकली
वाट तुझी पहातांना
वळणावर उगा मी  
तिला साथ करतांना

का शामला भुलविशी
सारे काही सुटतांना
पुन्हा बुडे कृष्णडोही
आमंत्रुनी मी दु;खांना

जळलो असे कितीदा
आग लागून स्वप्नांना
पुन्हा जागते मनी का
प्रेमकांक्षा विझतांना

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ४ जून, २०१४

ग, राहू दे ग






जावू दे ग, राहू दे ग
तुज कळणार नाही
डोळे आभाळाचे सखी
कधी दिसणार नाही

खडबडीत खोडात
स्पर्श खुलणार नाही
तनु कोमल तयास
अर्थ कळणार नाही

किती प्रखर ऊन हे
शांती वरणार नाही
तुझे प्राजक्ताचे ओठ
दाह साहणार नाही

आग लागता वनास
पाणी मागणार नाही
प्राण विझले तरिही
हाक हि येणार नाही  

तुझे सजू देत स्वप्न
कुणा कळणार नाही
वाट बुजली जुनी ही
खुणा राहणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






मंगळवार, ३ जून, २०१४

कसे सांगू सखी ...





इथे आहेस तू
तिथे आहेस तू
रात्रंदिनी मनी
माझ्या आहेस तू

जवळी असून
दूर आहेस तू
हृदयी असून
न दिसतेस तू

कसे सांगू सखी
ध्यास आहेस तू
पुन्हा जगण्याची
आस आहेस  तू

अजुनी मजला
न कळलीस तू
अजुनी प्रीतीला
न स्पर्शलीस तू
  
जीवास परि वेड      
लाविलेस तू  
मनी खोलवर
रुजलीस तू

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...