मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

सांज

सांज
****

सरता सरता दिन 
किती उजेड पडला 
गर्द पिवळा प्रकाश 
कणाकणात भरला 

मंद धूसर होणारे 
क्षितिज गुलाबी झाले 
किती वर्ण सुवर्णाचे 
आभाळ घेऊन आले 

घडली किमया अशी 
नकळे ही कुणामुळे 
उधळले स्वप्न माझे 
रंगी हरवून गेले 

प्रहर अर्धाच जरी 
आनंद कल्लोळ लोटे 
मिटण्याची खंत गेली 
सुखोर्मी देहात दाटे 

पेटवून लक्ष दिवे 
अनायसे गेलीस तू 
अंतरात वृक्ष परी
चैतन्याचा झालीस तू 

सांजसखी जीवनाचा
झाला असा हा सोहळा 
आता मिठी तृप्त देतो 
पुढच्या मी अंधाराला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...