शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

प्रार्थना

प्रार्थना
******

कुठल्यातरी विराण देवळात 
आड बाजूच्या परिसरातील 
कोणी एक पुजारी 
दिवा लावून जातो 
रोजचे एक कर्तव्य 
पार पाडून जातो 

नवे तेल नवी ज्योत 
परी दिवा तोच असतो
प्रकाश तसाच दिसतो 
तरी त्यात नवा हुंकारअसतो 

क्षणाक्षणाने सरणारे तेल 
पिवळ्या मंद प्रकाशाने 
उजळलेला गाभारा 
उग्र गंधीत शेंदरी देवता 
हलणार्‍या सावलीचा
निशब्द गूढ पसारा

काळ वाहत असतो 
म्हटला तर गोठलेला असतो 
तिथे कुणी येणार नसते 
तिथून कोणी जाणार नसते 
तरीही ती ज्योत जळत असते 
अन कधीतरी मध्यरात्री 
हळूच विझून जाते 
क्षणभर पसरतो 
जळलेल्या वातीचा तेलाचा 
एक गंध 
एक तेलकट तवंग
अन क्षणात कुठेतरी
विखरून जातो

उजेड कोणी पाहत नसतो 
अंधार कुणा दिसत नसतो 
दिवाही वाट पाहत नसतो 
उद्याच्या संध्याकाळची 
तो फक्त असतो 
देवतेसमोर 
आपल्या असण्यात 
अस्तित्वात 
प्रार्थना होऊन 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राम

राम *** राम प्रेमाचा पुतळा  राम भक्तीचा जिव्हाळा  राम तारतो सकळा  भवसागरी ॥१ राम अयोध्येचा राजा  धावे भक्ताचिया काजा  गती अन्य न...