सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

राधा


राधा
*****

खरंच होती का 
राधा अस्तित्वात ?
कुणास ठाऊक 
पण नाही सापडत 
ती भागवतात !

पण तिने व्यापलेले 
आकाश इतके प्रचंड आहे 
की तिचे देहाने असणे नसणे 
गौण आहे भाव जगतात 

खरंतर राधा असते 
भक्तीने भारलेल्या 
प्रत्येक मनात . .
त्या अवस्थेचे
परमोच्च शिखर होऊन 

तो राधा भाव 
हृदयात उतरला की 
कृष्णही जातो 
जणू आपण होवून

बाकी फुटकळ शृंगाराच्या 
कथा त्यांच्या 
ठेवल्या आहेत 
बऱ्याच आंबट शौकीनांनी लिहून 
त्या त्यांच्या मनातील 
वासनांच्या चिंध्याच आहेत 
लपवलेल्या  
राधा कृष्णरुपी 
तलम वस्त्रानी पांघरुन
खोटा साज लेववून 

जसजसा
राधेचा विचार करावा 
तसतसे असे वाटते 
ती अवस्थाच आहे 
देहातीत 
ज्यात वाजत असते 
कृष्ण धून 
बासरीच्या अनाहत सुरांनी 
अन झिरपत असते
पौर्णिमा 
सहस्त्र दलातील 
चंद्रातून 
पेशी पेशी तुन होत असते 
नर्तन 
जाणवत असते 
स्पंदन 
चैतन्याचे आनंदाचे
शब्दातीत सुखाचे 

सर्व कर्मेंद्रिये 
पंचेंद्रिये 
सूक्ष्म इंद्रिये 
जातात एकवटून 
त्या एका जाणिवेत 
ती जाणीव 
म्हणजेच 
राधा !

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीराम प्रार्थना

श्रीरामास प्रार्थना ********** अयोध्येत पुन्हा विराजमान झाल्यानंतर  हे रामराया, हा तुझा पहीला जन्मदिवस  अतिशय गौरवशा...