गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

चकवा

चकवा 
******
आशा अनंत घेऊन 
तुझ्या रानात हिंडलो 
वृक्ष विविध पाहूनी 
तया सुखे हरवलो ॥१

कधी सावली कुणाची
मज  फार आवडली   
फळे रुचिर कुठली
बहू  प्रेमाने चाखली ॥२

किती रंग उधळणं 
किती ऋतूंचे सोहळे  
किती काळ गमावला  
भान नाहीच उरले ॥३

याद आली अचानक 
मग रानच्या राव्याची 
केला आटापिटा सारा 
वांच्छा जया भेटण्याची ॥४

चित्त भरले ग्लानीने 
असे कसे हे घडले 
मन वाटवधे झाले 
मज लुबाडून गेले ॥५

आता घालतो मी साद 
प्राण शब्दात ओतून 
येई जीवलगा येई 
मज जाई गा घेवून॥६

मन बेरकी बहूत 
मज भरवसा नाही 
काय चकव्यात जीव 
पुन्हा पडणार नाही॥७

उभा ठायीच मी आता 
सारा सोडून देखावा 
कधी भेटेल श्रीदत्त
माझा प्राणाचा विसावा ॥८

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...