*****************
स्वातंत्र्यवीर सावरकर
तिला माहीत नव्हती माघार
तिला माहीत नव्हती हार
तिला फक्त माहित होते लढणे
सर्वस्व पणाला लावून
शत्रूवर तुटून पडणे.
तिच्या घणाघाती घावांनी
हादरून टाकले होते आंग्लभूमीला
तिचा खणखणाट घाबरत होता
कृत्रिम पुरोगामित्वाला
तेथे नव्हते लपने-छपने
राजकीय खेळ खेळणे
पदासाठी गादीसाठी स्वार्थासाठी
स्वतःला हिरव्या रंगात रंगून घेणे
म्यानात गपचूप लपून बसणे.
भरमध्यांनी आकाशात तळपणार्या
सूर्याचे तेज होते
स्वातंत्र्यवीर सावरकर
जे व्यापून घेत होते
सारे आकाश
दिगंतापर्यंत पसरत होता
त्याचा प्रकाश
दिवा भितांना ते
कधीच कळले नाहीत
काळोख्या खोबणीत
तोंड लपवून बसणाऱ्या
निशाचारांना
ते कधीच दिसले नाहीत.
राष्ट्रदेवते पुढे अखंड पेटलेल्या
धूनीतील अंगार होते सावरकर
आणि त्या धूनीत पडत होती
आहुती
देहाची मनाची घराची दाराची
बंधूंची पत्नीची सर्वस्वाची
स्वातंत्रा आधीही
आणि स्वातंत्र्यानंतरही
निरपेक्ष निरामय
कुठलीही लांछन नसलेली
काळीमा नसलेली धूर नसलेली
ही धूनी विटाळण्याचा विझवण्याचा
प्रयत्न केला अनेक स्वार्थी लोकांनी
आणि संधिसाधू नतद्रष्टांनी
त्यांचे हात भाजले
त्यांची वस्त्रे जळाले
आणि ती लपून बसले
आपापल्या ढोलीत
तोंड लपवित
अन मेले विस्मृतीत.
भगवान शंकराच्या
तिसऱ्या डोळ्यांतील
साक्षात अग्नी होते
स्वातंत्र्यवीर सावरकर
जहाल भेदक कठोर
इथे नव्हती जागा
माया मोह ममतेला
स्वत: च्या जगातील
इवलाल्या स्वार्थांना
तिला नको होते
ताम्रपत्र मानपत्र सन्मान
ती आग जाळत होती
अनार्य असत्य आणि मालिन्य
पसरलेले या भूमीवर सतत
ती आग अजूनही विझली नाही
ते तेज अजुनही मावळले नाही
ते आहे विद्यमान हजारो लाखो
डोळस विवेकी धीर अन
दूरदृष्टी असलेल्या हृदयात
त्या प्रकाश वृक्षाचे
हजारो लाखो अग्निकण
येऊन पडले आहेत
आमच्या मनात काळजात रक्तात
जे देत राहील आम्हाला
सदैव धैर्य प्रेरणा आश्वासन
निराशेच्या प्रत्येक क्षणी
पेटून धडाडून आतून
हे महापुरुषा
हे पुण्यपुरूषा
हे आमच्यातील अंशा
तुम्हास कोटी कोटी अभिवंदन
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा