बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

उपाधीत जगणे

उपाधीत
********

उपाधीत जगणे 
उपाधीत मरणे 
मज लाजिरवाणे 
करू नको ॥

असे रुतलेलो 
गाळी अडकलो 
मरणा लागलो 
सोडवी रे ॥

घेई देह सारा 
मनाचा पसारा 
सोडून दातारा 
जाऊ नको ॥

धावे बळेविन 
गातो गळ्याविन 
भजे भक्तीविन 
तुजलागी ॥

आलोय शरण 
तुज दयाघन 
इतुके जाणून 
हात धरी ॥

दोषांचे भांडार 
भरले अपार 
दृष्टी तयावर 
देऊ नको॥

दत्त दत्त दत्त 
हृदयात गीत 
भरो तुझी प्रीत 
कणोकणी ॥

अजून ते काही
मागणे रे नाही 
विक्रांता या पायी 
राहू दे रे॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...