*******
तुझिया रुपात मूर्तिमंत कष्ट
होते ग नांदत
घरात या ॥१॥
परी त्या कष्टाचे
तुजला न भान
जीवनसाधन
जणू काही ॥२॥
चार भिंतीच्या या
जगात रमली
आणिक सरली
गाथा तुझी ॥३॥
जर का कधी तू
पडती बाहेर
झेंडा जगावर
उभारती ॥४॥
होतीस हिरा तू
मुकुटा वाचून
तेज न जाणून
आपुले ग ॥५॥
अपार तुझिया
प्रेमात वाढत
आकाशी उडत
गेलो उंच ॥६॥
हातात आता या
हजार चांदण्या
परी त्या पाहण्या
नाहीस तू ॥७॥
जरी उलटली
तपे दोन माय
येते तुझी सय
सदोदीत ॥८॥
जन्मजन्मांतरी
भेट तुच आई
अन मज घेई
कुशीत ग॥९॥
आई वाचुनिया
नसतेच घर
विक्रांत माहेर
जिवाचे या॥१०
***********-
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा