गाडे
****
अजूनही अडलेले
पाठीवर ओझे अन्
पाय खोल गाडलेले ॥
अंधुकशा दिशा सार्या
तारे तमी काजळले
हाके नच प्रत्युत्तर
दीप सारे विझलेले ॥
वाटाड्या तो येईल का ?
घेऊनिया जाईल का ?
किंवा इथे असाच हा
मार्ग माझा खुंटेल का ?॥
घनघोर प्रश्न मनी
काळजाचे पाणी पाणी
डोळ्यांमध्ये प्राण सारे
अन मौन आळवणी ॥
फांदीवर बसलेले
पाप माझे हसते का ?
पायाखाली वळवळ
कर्म माझे डसते का ?॥
दाटलेले जागेपण
कणोकणी हाकारते
पापण्यांशी वैर तरी
दृष्टी सदा पाणावते ॥
वाट पाही विक्रांत हा
शीत घेई अंगावरी
हरकत नाही मुळी
मरूनिया गेला तरी ॥
जागेपण राहो पण
डोळ्यांमध्ये भरलेले
दत्त पदी नवा जन्म
स्वप्न तेच उरलेले ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा