बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

खुणा


 खुणा.

*****

माझ्या मनातील खुणा 

दत्ता पुसता पूसेना  

व्रण स्मृतीचा खिळ्यांचे

खोल आतील मिटेना  


इथे लपवितो काही  

डाग बेपर्वा पडले

वस्त्र मलमली मृदू

जरी त्यावरी ओढले


दिला मुलामे वरती 

बरे वाटे पाहताना 

दोन दिसात परंतु

तडे पडती तयांना 


आत जाणतोय परी 

माझ्या साचल्या व्यथांना 

जन्म दारभ्य वाहीले 

त्याच त्याच कामनांना


तुवा दिधली घालून 

जग चालवया रीत 

देवा चुकलो चुकलो 

नच झाले रे स्वहित 


तुच करविता सारे 

नीती नियमांचे द्वार 

नाही म्हणत तुजला 

तया अपवाद कर 


करे विनंती दयाळ 

एका नव्या आरंभास

जुने मोडून पडू दे 

व्यापी तुच जीवनास 


तुझा होवून विक्रांत

सदा राहो रे पदास 

ओझे सुखांचे चुकांचे 

नको आता या जीवास

*********


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...