बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

ग्रांट मेडिकल कॉलेज


ग्रांट मेडिकल कॉलेज 
****************

मी माझ्या कॉलेजला 
त्या जि एम सि ला 
धन्यवाद कसे देऊ 
माझे हे ह्रदय  
शब्दात कसे ठेवू 

ज्ञान दिले तिने मला 
विज्ञान दिले तिने मला 
उत्कृष्ट साधन दिले
 जगण्याला 
जगात अभिमानाने
 मिरवायला 

कुण्या एका पावसाळ्यात 
आलो मी या प्रांगणात 
खरंच सांगतो पाहून तिला 
ह्रदयात लागले धडधडायला 
एवढा मोठा पसारा पाहून 
गेलो हरखून गेलो हरवून 
जरा घाबरून जरा बावरून

ओळखीचे तर कोणीच नव्हते 
पण बहुतेक सर्व हुशार चेहरे होते 

दगडात बांधलेल्या त्या
मोठ्या प्रशस्त इमारती 
अवाढव्य भव्य आरामदायी 
एक गाव होईल एवढी वस्ती
जणू काही आधुनिक 
गुरूकुलाची देखणी मूर्ती 

मग पहिला 
तो लांब-रुंद उंच शवविच्छेदनाचा हॉल 
तिथे टेबलावर ठेवलेले 
ते फार्मुलीनच्या भयंकर वास येणारे 
डोळ्याची आग करणारे
मेंदूला झिणझिण्या आणणारे
ते मृत मानवी देह 

पुढे ती अनिवार्य चिरफाड 
थोडे कुतूहल 
थोडी घृणा
आणि खूप करूणा
यांनी ओथंबून गेलेले मन 

खरंच मी क्वचितच  
स्कालपेल  हातात घेतले होते 
क्वचितच विच्छेदन केले होते 
मानवी जीवनाचे व देहाचे 
क्षणभंगुरत्व मला
व्यापून राहिले होते  

फिजिओलॉजी त्यामानाने बरे होते 
तेथे समजून घेणे होते 
एक विलक्षण जगच 
न पाहताही समोर दिसत होते 
आणि त्या मातीच्या देहातील 
ती अमाप असीम विलक्षण प्रज्ञा 
मला चकित करुन सोडत होती 
पेशी पेशीचे कार्य 
रक्तवाहिन्यांची जाळ
ती संप्रेरक ते सूक्ष्म विद्युत प्रवाह 
अवघे एखाद्या जादूगाराच्या 
गोष्टी सारखं वाटत होतं 
 
आधीच अंतर्मुख असलेले मन 
अधिकाधिक खोल जाऊ लागले होते 
या विलक्षण देहातील घडामोडी पाहून 
त्याची क्षणभंगुरता जाणून 
ते जगण्याचा अर्थ शोधू लागले होते 

मला बाहेर 
विज्ञानाची दिप्ती जाणवत होती 
आणि अंतरी अनुभूतीची गुहा उघडत होती


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...