रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

सावल्यांचे जग

सावल्यांचे जग
***********

सावल्यांचे जग असते अगदी खोटे खोटे 
कुणी कुणाचा धरला हात कुणा न कळते 

धरल्या वाचून धरल्याचा होतो कुणा भास 
धरला की न धरला प्रश्न पडती कुणास 

सावल्यांच्या जगाचे पण एक बरे असते 
कुठलीही सावली न कधी कुणा चिकटते 

सुंदर असते कधी अथवा विद्रूप दिसते 
मूळ वस्तूस परी त्याची फिकीर नसते 

सावली होऊन कधी कुणी कुणाची जगते 
सावली सम पाठलाग कुणी कुणाचा करते 

तीच सावली कार्य कारण जाता बदलून जाते 
कळल्या वाचून कुणालाही किती वेगळी होते 

सर्वात सुंदर सावली पण वृक्षाचीच असते 
भर उन्हात वनव्यात जी शीतलता देते 

कधी एकांतात चालतांना उगाचच रस्त्यात 
सावलीचाच राक्षस होतो आपल्या मनात 

रात्रही असते खरंतर फक्त एक सावली 
आपल्या देहावरती अवनीने पांघरली 

चंद्रही सावलीत तिच्या त्या लुप्त होतो 
पौर्णिमा अमावस्या आहे जगास सांगतो 

प्रकाशाचा अर्क सूर्य सर्व सावल्यांचा नियंता  
त्याची छाया असेल का पडत कुठे जगता  

सावलीच्या प्रश्नाला सावलीच उत्तर 
प्रकाशाचा अंत होता उरे सावली नंतर 

सावल्यांची जग हे सदा गुढ कोडे घालते 
कधी काळी भिवविते सदैव मज खुणावते


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वारी

वारी ***** येताच आषाढी निघाले भाविक  बांधून पडशी जग हे मायीक ॥१ लोट लोटावरी धावती प्रेमाचे  जणू अनिवार जल उधाणाचे ॥२...