निळेपण
********
चैतन्याचा पूर
प्रकाशाचा नूर
निळा निळा ॥
निळेपणी चंद्र
मिरवितो आभा
प्रकाशाचा गाभा
दाटलेला ॥
निळ्या पाणियात
निळ्या निळ्या लाटा
प्रकाशाच्या वाटा
असंख्यात ॥
निळूली चांदणी
निळेपणी खणी
तेजाच्या अंगणी
लखलखे॥
निळसर नग
गडद ध्यानस्थ
न्याहाळे अंतस्थ
निळेपण ॥
पाहता पाहता
डोळे झाले निळे
निळूले ओघळे
नीलपाणी ॥
निळे झाले मन
निळे झाले तन
हसतोय कृष्ण
नीलमनी ॥
विक्रांत निराळा
नुरेचि वेगळा
झाला निळा निळा
कृपा दत्त ॥
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा