मंगळवार, २२ मार्च, २०१६

देवा अवधूता



तुझे रूप डोळ्यात  
तुझा छंद मनात  
तुझे ध्यान दिनरात
घडो अवधूता ||१

खेळ चाले जगण्याचा   
भास उगा असण्याचा
आन किती खेळायचा
सांग अवधूता ||२

पाठी पोटी पुण्य नाही
घटी ओठी सेवा नाही
हाव पण जात नाही
माझी अवधूता ||३

स्पंद स्पर्श नाही जरी
वेडी खुळी आशा उरी
येती लाटा लाटावरी
देवा अवधूता ||४

आग्रहास वाव नाही  
याचकास भाव नाही
मर्जीविना ठाव नाही
पदी अवधूता ||५

सारे काही मान्य तुझे
वाहतो मी तुला ओझे
दारी जावो जन्म माझे
तुझ्या अवधूता ||६

वाटेवरती विक्रांत
चाले तुझे गाणे गात
ठेव थोडे स्मरणात
प्रभू अवधूता ||७

विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...