बुधवार, १६ मार्च, २०१६

मजला दत्ता चालणे अजून



मासाचा तुकडा
माझिया मुखात
झुंबड चोरात
घार मीच ||

घेतली उपाधी
जमवून काही
माहितही नाही
ओझे किती  ||

धावतो उगाच
जगणे मनात
अडल्या पायात
कनक बेडी ||

अवधूत मार्ग
सरळ समोर
आणिक संसार
चिकटला ||

कुणाचा दिलासा
कुणाचा हवाला
परी काळजाला
शांती नाही ||

बरे हे भोगतो
उरले मी काही  
अन वाट पाही
सुटण्याची ||

तुझे चालू दे रे
वर्तुळी जगणे
पाच ठिकाणे
ठरवली ||

मजला दत्ता
चालणे अजून
प्राक्तन भरून
ठेवलेले ||

भेटू कधीतरी
कुठल्या वाटेला
आठव प्रेमाला
उन्यादुण्या ||

विक्रांत धावता  
दुनिया भोगता
उठतो पडता
दत्त कृपा ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...