तुम्ही महाथोर
बैसला टिकून
खुर्ची सांभाळून
धन्यभाग ||
सह्यांचेच धनी
आज्ञेचे गुलाम
बांधिला लगाम
सदा नाकी ||
अहो इवलाले
झालात की प्यादे
खातात मलिदे
दुजे कोण ||
किती कष्टवाल
आपुल्या
मनाला
दिलेत रोगाला
आवतन ||
बीपी मधुमेह
ताण नि तणाव
बोनस हा राव
न मागता ||
अंकुशा वाचून
मिळतो न मान
कुंजर होवून
जाणीयले ||
ऐसे व्यर्थ राजे
आपुल्या घराचे
हुकुम जगाचे
डोईवरी ||
इवलासा मान
डोईवरी काटे
अवघे ओखटे
कामकाज ||
ऐसे हे त्रांगडे
जमते जयाला
नमन तयाला
विक्रांतचे ||
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा