मंगळवार, २० मे, २०१४

नर्मदा तीरावर..








आकाशीचे शुभ्र तेज
पांघरून छतावर
शांतपणे निजलेली
पिठूर इवली घर

दाटलेली चंद्र प्रभा     
साऱ्या कणाकणावर
सुख अद्भुत मोहिनी
जडलेली प्राणावर

गर्द पानातून किर्र
गुंजे प्राचीन संगीत  
शांत मुग्ध निळाईत   
गूढ दाटला एकांत  

धुंदावणारा सुगंध
विशाल आम्र मोहरा
ओळखीची सळसळ
अनोळखी तरुवरा

ओघळला मेघ कुठे
कुणास शांत निजवी
थकल्या पायात बळ   
माय गातसे अंगाई

अर्थ मुळी नव्हताच
कुठल्याही अस्तित्वाला
नच कुणी पाहणारा
दर्शनी सोस कुणाला    

कोण मी इथे कशाला
नुरली आठव खंत
नितळ निवांत शांत
पाजळलो प्रकाशात



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...