शनिवार, २९ एप्रिल, २०२३

चित्ती राहा

चित्ती राहा 
********
नको मज शालू देखणी पैठणी 
राहू दे रे जुनी 
साडी चोळी ॥१
मग मी रावुळी सहज बसेन 
संत रजकण 
घेत भाळी ॥२
नको माझं वाक्या पाटल्या सोन्याच्या 
हिऱ्याच्या मोत्याच्या 
एकावळी ॥३
गोष्टी सांभाळत उगा राहायच्या
देहा स्मरायाच्या 
सर्वकाळ ॥४
तुळशीची माळ देई एकतारी 
आणि तू श्रीहरी 
चित्ती राहा ॥५
मागते मी तुज एकच मागणे 
करू नको जीणे 
भक्ती उणे ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

 

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

भेटत जा


भेटत जा
*******

कधी कधी पाहत जा 
कधीकधी बोलत जा 
कारण काही नको तू 
डोळ्यात उतरत जा ॥

स्वप्न तुझे मागतो ना 
चंद्र हाती ओढतो ना 
फक्त काही किरणे ती 
मनी या उधळत जा ॥

उगाचच हसतेस 
उगाच बहरतेस 
कधीतरी पाकळ्या त्या 
माझ्यासाठी पेरत जा ॥

आकाशात रंग नाही 
मनात तरंग नाही 
अशा गूढ एकांतात 
मजला तू भेटत जा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


बुधवार, २६ एप्रिल, २०२३

मित्र


मैत्री
*****

मित्र टिकवायचे असतात 
मित्र जपायचे असतात 
कारण मित्र हेआपली 
प्रतिबिंब असतात 
आरशा वाचून पडलेली
मित्र हे आपली स्वप्न असतात 
निद्रे वाचून दिसणारी

तिथे आपणच आपल्याशी बोलतो 
आपणच आपल्याला ऐकतो 
दिशा ठरवतो मार्ग बदलतो 
आपल्या ध्वनी नादाचा 
प्रतिध्वनी मित्र असतो .

पण कधी कधी 
आपल्या त्या मित्राचे 
मित्रही वेगळे होवू लागतात
तेव्हा ते मित्रही
वेगळे वाटू लागतात
वेगळे वागू लागतात
वेगळ्या रस्त्याने जाऊ लागतात 
अन वेगळी गाणी गाऊ लागतात 
त्याला काही इलाज नसतो 
सारीच फळे एकाच झाडाची 
किती दिवस सोबत राहतात 

तरीही आपण असतो 
शतशः त्यांचे ऋणी 
त्या ओघळत्या सोनेरी क्षणी 
जीवन सुंदर केलेले असते त्यांनी 

तेच मित्र अन  ती मैत्री सदैव राहावे ही 
इच्छा असते मनात अन असावी ही 
पण अट्टाहासने होत नसते काहीही 

कारण आज उगवला 
मित्र जरी तोच असला
तरी तो दिवस तोच नसतो 
जरी तेवढाच सुंदर असला
तरी तसाच नसतो 

जेव्हा मित्र सोबत असतो 
तेव्हा तो त्या दिवसाचे सार्थक करतो 
तो दिवस ग्रेटच असतो
कारण आपण आपल्या सोबत असतो

 पण तो जातो 
त्यानंतर तो चंद्र ही आपलाच असतो 
रात्रही आपली असते 
ते ग्रह तारका आपली असतात 
नदी वृक्ष आपलीच असतात 
मित्र होऊन आपल्याला रिझवतात 
सदैव सोबत करत असतात 
त्या वृक्षाची कुरणाची नदीची क्षितिजाची 
आपली मैत्री ही तशीच उत्कट असते 
तेही जीवनाचे गाणे असते .
कारण मैत्री ही मित्राहूनही मोठी असते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

उपवास

उपवास
*****
श्रद्धाळू मनाचे सरे उपवास 
केलेले सायास पूर्ण झाले ॥१

कुणा न ठाऊक काय मिळवले 
काय गमावले कुठे किती ॥२

परी दृढ गाठ बसली मनात 
झाली बळकट श्रद्धा एक ॥३

उठली मनात प्रार्थना ही खोल 
ओठी आले बोल ज्ञानेशाचे ॥४

हरवली मात अस्तित्वाचा अर्थ 
माणसाची जात सुखी कर ॥५

रहा रे कृपाळू सदा जगावर 
दुःखाचा आकार मिटवून ॥६

बाकी तो आहार कुणा निराहार
व्यर्थ कारभार झाला उगा ॥ ७

विक्रांता कळला अर्थ उपवासी 
जोडलो देवासी जगताशी ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


सोमवार, २४ एप्रिल, २०२३

बीजेचा चंद्र

बीजेचा चंद्र
**********

तुझिया बीजेची दिसे चंद्रकोर 
आनंद मोहर मन झाले ॥१

इवलीशी रेखा जणू भाळावर 
कोणी तालेवार मिरवती ॥२

तैसे ते आकाश प्रोढीने भरले 
शुक्र विसरले भरजरी ॥३

पश्चिमेची गाणी आली कानावर 
दूर रेतीवर उमटली ॥४

कुठे उगवली कुठे पेरलेली 
श्रद्धा थरारली मनातली ॥५

पाहता पाहता देखावा सरला 
आभास मिटला विलक्षण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, २३ एप्रिल, २०२३

भास


भास
*****
ऐसा पाठीपोटी दत्त घनदाट 
पाणि पाणियात मिसळले ॥१
द्वैताची झुळूक जन्मा ये लहर 
निमे हळुवार जीवनात ॥२
सुवर्ण शलाके कारण अरुण 
जाता अस्तावून तीही नाही ॥३
तैसे माझेपण दुजे दत्ताहून 
अंतरी जाणून मीची दत्त ॥४
परी ते कौतुक मिरवतो वरी
भक्तीच्या लहरी नांदुनिया ॥५
विक्रांत वेगळा दत्तात आटला 
दिसे जगताला भास उगा ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

सुन्न

सुन्न
*****

तो कोपरा या मनाचा अजूनही सुन्न आहे 
ते आकाश जीवनाचे सर्व ऋतूत खिन्न आहे ॥

लाख शोधली कारणे अर्थाविन शून्य आहे 
मीच कारे मलाच का अनुत्तरीत प्रश्न आहे ॥

ते दान दिले दैवाने स्वप्न फुलून आलेले 
ओघळून मातीवरी आज छिन्न भिन्न आहे ॥

नाही जरी तू ती सवे गमते अजून आहे 
शब्द स्पर्शाविन तुझ्या भ्रमित हे मन आहे ॥

जाणतो मी दारात तू थांबली अजून आहे 
जन्म मृत्यू पायरीला मजसाठी बसून आहे ॥

यावेसे वाटते परी शपथेत बांधून आहे 
तुझ्यासाठी जगतोय जगणे थांबून आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...