शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

काळ

काळ
****
काळ सरता सरतो सूर्य विझता विझतो 
चंद्र झिजता झिजतो हळू विक्रांत मरतो॥१

जन्मा आधी रे तो होता राही देह तो सरता
सांगे भगवद् गीता मग कशाला ती चिंता ॥२

जन्मा आधी रे परंतु तो हा  नव्हता विक्रांत
मन पुसता विझता कैसा येईल विक्रांत॥३

काही नाव या देहाला अन गाठी संस्काराला 
चिंता आकाराची का रे अशी पडे पुतळ्याला ॥४

खेळ मातीचा मातीला व्यथा का रे चैतन्याला 
सुख दुःखाच्या मुशीत नक्षी क्षणाची काळाला ॥५

काळ असतो अकाल वेळ मानवे निर्मिली 
जन्म मृत्यूची साखळी अन तयात गुंफली ॥६

काही कळू कळू येते काही हळू निसटते 
शून्य स्पंदाच्या शेवटी काही आत लकाकते ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

वाणतो


वाणतो
******
सोडून हात हा 
तू आता कुणाची 
सोडुन साथ ही 
तू आता स्वतःची ॥१॥

नव्हती कधीच 
गाठ बांधलेली 
चालता प्राक्तनी  
गाठ पडलेली ॥२॥

कुणाचे असे हे 
काही देणे घेणे 
तयालागी इथे 
असे हे भेटणे ॥३॥

घडे भेटणेही 
घडे सुटणेही 
उमलता कळी 
घडे पडणेही ॥४॥

परी जाहले हे 
गंधित जगणे 
वाणतो क्षणास 
त्या कृतज्ञतेने ॥५॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

दत्त दावितो

दत्त दावितो
*********
दत्त दावितो जगणे 
मज करून खेळणे 
डाव उलटा सुलटा 
त्यात हसणे रडणे ॥१

कधी फुगवी हवेने 
उंच नेई रे वाऱ्याने 
मग फजित करुन
हवा काढतो सुईने ॥२

कधी दावून ज्ञानाला 
टाकी स्तिमित करून 
कधी लावून कामाला 
टाकी हाडास मोडून॥३ 

मित्रपरिवार सुख 
देई भरभरूनिया 
ठेवी एकांति विरक्त 
मृत्यू खेळ दाऊनिया॥४

देई यश धनमान 
सुखे भौतिक भरून 
त्यात अपूर्णता पण 
देई हळूच पेरून ॥५

आत कळते मनाला 
खेळ निरर्थ चालला 
आस जागते अंतरी 
भेटण्याची शाश्वताला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..



बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

पैसा

पैसा
*****
हे जग व्यवहाराचे पैशाचे अन कमवायचे 
माझ्या काय कामाचे उगाच ओझे वाहायचे 

पैशात सुख नसते रे पैशात प्रेम नसते 
पैसा हे वेड असते भुतागत मागे लागते 

पाच पन्नास वर्षाचे असते आयुष्य माणसाचे
यात वाया घालवायचे हे तो लक्षण मूर्खपणाचे 

फुगू देत आकडे बँकेचे ढिग जमो त्या कागदाचे 
खुळे स्वप्न गाडी बंगल्याचे पंथ अंध हे निरर्थाचे

प्रेम भरू दे कणाकणात आनंद उसळो हृदयात
गाणे उमटावे ओठात हेच घडावे फक्त जीवनात 

पोटा कपडयासाठी अन कमवावे रे छतासाठी 
पैसे एवढेच कुणी काही जमवावे जगण्यासाठी

बांधूनी हा पैसा उरावर कुणास जाता येत नाही
जग आंधळे डोळा असून त्या कधी दिसत नाही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..



मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

बुडालो नाही

नाही
****

हजारदा डोळ्यात तुझ्या 
बुडूनही मी बुडलो नाही 
किती गोंदले तुज देहावर 
चंद्र सावळा झालो नाही 

कधी हसता खळाळून तू 
भिजलो परी फुटलो नाही 
किती झेलले तुषार हाती 
कड्यावर कोसळलो नाही 

ती नाव कागदी होती जरी 
कधी वादळा घाबरलो नाही 
पडता थेंब तव डोळ्यातील 
पुन्हा कधीच भरारलो नाही 

घेऊन बाजार खिशात फुलांचा 
उधळण्यास कचरलो नाही 
फुले जुईची तुझी इवली 
वेचण्या परी धजावलो नाही 

हात तव जरी देण्यास उतावीळ
झोळी घेऊन मी आलो नाही 
जरी राहिलो आयुष्य भिकारी  
तुझ्याविना कुणा विकलो नाही 

म्हणती जग हे विक्रांत दिवाना 
कुणा विचारत बसलो नाही 
मी माझ्यातच मस्त विरक्त 
स्वप्न तुझे पण विसरलो नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

पालव




पालव
******

भक्तीचा भिकारी दत्ता मी रे बरा 
नको देऊ मला मोठेपणा ॥१

जाणतो मी माझे मूल्य ते इवले 
तार्‍यांनी भरले आभाळ हे ॥२

प्रत्येक पत्थर असे अवनीचा 
भाव हा मनाचा तुझ्यासाठी ॥३

तुच तुझे शब्द देऊनिया ओठी 
धरलेस हाती कौतुकाने ॥४

आता दूर सार शब्दांचे पालव 
रूप ते दाखव शब्दातीत ॥५

याच क्षणासाठी जन्म कोटी कोटी 
विक्रांत जगती घेईल रे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

आलीस तू


आलीस तू
*********
आलीस तू उधळीत हसू 
मेघ सावळा झालीस तू 
माझ्यासाठी पण कधीच 
नव्हता हा गं वर्षा ऋतु 

लखलख डोळे केस मखमली 
जरी सावरत बोललीस तू
त्या न गावचा होऊन उगा
मज थांबवले मी जाता ऊतू

 मन हे वैरी आपले असते 
स्वप्न दावते भलते सलते 
वारा पिऊन उगाच फिरते 
रित जगाची तया न कळते

जाणून मनीचे व्यर्थ खेळणे
दिले सार्थ त्या काही करणे
मान वळवली वही उघडली 
जगतासाठी लिहिली कवणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...