रविवार, ३० जानेवारी, २०२२

जोवर

जोवर
******

जोवर माझा श्वास 
तोवर तुझा ध्यास 
देई रे हृदयास 
प्रेम तुझे ॥

जोवर माझी दृष्टी 
राहो तुज पाहती 
मनात साठवती 
रात्रंदिवस ॥

जोवर माझे हात 
राहोत जोडत 
पूजा तव करत 
अवधूता ॥

जोवर माझी वाणी 
म्हणोत तुझी गाणी 
तल्लीन होत भजनी 
तुझं आळवत ॥

जोवर माझी श्रुती 
ऐकोत तुझी कीर्ती 
भक्तांची तव महती 
कानी पडो ॥

जोवर ही चरण 
करोत परिक्रमण 
येऊ देत धावून 
तुझ्या ठायी ॥

विक्रांतची ही काया 
राहु दे तुझ्या पाया 
जाऊ देत लया 
तुझ्यासाठीच ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘२४४

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

तोरण


तोरण
*****
प्राणातील सरले त्राण आवेग व्यथांचा आहे
दारावर बांधून तोरण मी उभा कधीचा आहे  ॥१

चेहऱ्यात शोधतो तुजला खुळाच हा छंद आहे 
तू ये ना जीवलगा प्रतिक्षा छळ जीवाचा आहे ॥२

हलता सावली धाव घेतो सदैव तुझा भास आहे
अधीर मनाचा यत्न खरा तर विलोपनाचा आहे ॥३
 
हा डोह वेदनांचा का साथी माझ्या जीवनाचा आहे
देहात खोल भिनला रेशमी मग स्पर्श कुणाचा आहे.॥४

उतरली सांज डोळ्यात कैफ किरणांचा आहे 
उतरेल का झिंग कधी तो हक्क तमाचा आहे॥५

डोळ्यातील विझली स्वप्ने शोध डोळ्यातच आहे
ती घडो सावळी बाधा जन्म उधळायचा आहे ॥७


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

चंद्र शोध


चंद्र शोध 
*********

पथ सारे सुटलेले
नुरे पावुलांच्या खुणा 
ओढ कसली कुणाची
मागे खेचते जीवना ॥१

कधी सांडले सुखाचे 
मीच नावडून घट 
कुण्या स्वप्नाची तरीही
मन पाहतसे वाट ॥२

जरी जाणतो विभ्रम 
इंद्रधनुचे नभात 
हाव डोळ्यात जागते
तया घेण्यास कवेत.॥३

पट तुटले दिशांचे
धुके विरळ संदिग्ध
हात सुटती धरले
स्पर्श परके विदग्ध ॥४

काही मागताच कुणा 
चोरी वाटते जगाला
फुले वेचता पडली 
सजा करती जीवाला ॥५

कोण खेळणार कसा 
डाव मोडलेला असा 
दत्त दूर डोंगरात 
नच ओळखत जसा ॥६

हाय विक्रांत अजून 
भिरभिरतो नभात 
नाही दोर अन दिशा 
चंद्र शोधतो मनात ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

स्वामी दरबारी

स्वामी दरबारी
**********

स्वामी दरबारी 
व्हावे सेवेकरी 
देह पायावरी 
वाहुनिया ॥

स्वामी स्वामी स्वामी 
म्हणावे मुखाने 
पहावी डोळ्यांने
रूप तेची ॥

स्वामींच्या लीलांचे 
करावे चिंतन 
मनाने रंगून 
त्यात जावे ॥

स्वामी पूर्णब्रह्म 
दत्त अवतार 
मुखी जयकार 
सदा त्यांचा॥

विक्रांत स्वामीचा 
चाकर जन्माचा 
पातलो कृपेचा 
प्रसाद हा ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘२७३

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

शब्द वांझोटे


शब्द वांझोटे
***********

शब्द असती वांझोटे 
बळे होतात सांगते 
परी होतात रुजते 
गुरु मुखी च्या अमृते 

जरी वाचली हजार 
ग्रंथ आणून साचार 
होतो व्यर्थची तो भार 
काळ अपव्यय फार

ज्ञान निर्मळ शब्दात 
तत्त्वमसीच्या अर्थात
जया पडते कानात
त्याची सरे यातायात 

ज्ञान इथेच संपते 
यात्रा शब्दाची सरते 
शब्द परंतु ते जिते
व्हावे मनी विरूढते 

नाथा घराची हि खूण 
शोधे विक्रांत अजून
संत सज्जना भेटून
पायी तयांच्या पडून

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सावळ्याची सखी

सावळ्याची सखी
**************

सावळ्याची सखी 
असे तू सावळी 
घन ओघळली 
रेशमी सावली 

घनगर्द बटा 
आकाश वादळी 
चिंब निरागस 
जलभार डोळी 

शब्द किती तव
अडलेले ओठी 
आणिक गुपिते 
दडलेली पोटी 

कोणास सांगावे 
तुज न कळते 
आकाश दाटले 
शिखर शोधते 

नकोच शोधूस
तो मुग्ध सावळा 
बघता अंतरी
दिसेल तुजला 

शब्दातील अर्थ
शब्दात राहू दे
मौनातच बोल
तव मावळू दे
 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

वीज

वीज
***:
लोभस लाजरी 
तेजस साजरी 
वीज जरतारी 
नभाचे नगरी 

चपळ मासोळी 
लखलखे जळी 
टपोऱल्या डोळी 
आव्हान कट्यारी 

मोकळा संभार 
मेघ भाळावर 
तेजाळ तर्रार 
नयनाचे तीर 

सवे अवखळ 
बाल्यही खट्याळ 
करी कलकल 
झराची चंचल 

झेलावी ही सर 
वाटे क्षणभर 
होय थरथर 
वृक्ष पानावर 

घनघोर वारा 
पळ खिळलेला 
अंतरी बाहेरी 
प्रकाश कोवळा

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...