रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

श्रीपाद श्रीवल्लभ



श्रीपाद वल्लभ
***********

दुर्जन भंजक
सज्जन रक्षक
भक्तोधारक
श्रीपाद वल्लभ

विश्व उद्धारक
जगात पालक
भक्त तारक
श्रीपाद वल्लभ

सद्गुण कारक
आनंदवर्धक
कलीमलहारक
श्रीपाद वल्लभ

आपल्ल राजा
सुमती माता
चित्तामोदक
श्रीपाद वल्लभ

शंकर माधव
रजकादीक
श्री वरदायक
श्रीपाद वल्लभ

भक्त संजीवक
मंगलदायक
नाम पवित्रेक
श्रीपाद वल्लभ

नमो नमो प्रभू
मम हृदयस्थ
वंदे विक्रांत
श्रीपाद वल्लभ
**
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

दत्ताची परीक्षा



दत्ताची परीक्षा

*********



दत्ताची परीक्षा

असते कठीण

प्रश्नांविना प्रश्न

उभे पाही



लावुनिया गोड

भोगाची आवड

इंद्रियांचे धेंड

दे धाडून  



मना देई मान

प्रस्थ वाढवून

टाकी बुडवून

मस्तीमध्ये



कधी रंग गंधी

कधी सूर शब्दी

लावतसे नादी

अभिजात



अखेर आसक्ती  

जमल्या धनाची

घराची दाराची

ठरलेली



प्रश्नाला तयाचा

एकच उत्तर

देतो वारंवार

मीही नित्य



अवघे तुझेच

कृपेने भोगतो

कृपेने सोडतो

दत्तात्रेया



ज्यात माझे भले

तेच घडो दत्त्ता

मजवर सत्ता

चालो तुझी



सदा काठावर

पास हा विक्रांत

धरूनिया दत्त

जगी नांदे



© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in





प्रकाश देवता





प्रकाश देवता

***********

खेळ संपता संपता 
गाव अंधारी दाटता 
पाय वळत माघारी
जात घराकडे वाटा

माय उभीसी दारात 
दिवा तिच्या हातात 
मंद प्रकाशात दिसे 
तिचे रूप सोनीयात

शीण दिवसांचा सरे 
जाय लागले खुपले 
धाव घेई तिच्याकडे 
मन प्रेमी आसावले

येई कौतुक डोळ्यात 
रेषा काळजीची मिटे
काही बोलल्या वाचुनी 
लाख आशिषची भेटे

गोष्ट काल कालचीही 
वाटे घडावी आजही
काळ वैरी या जगाचा 
भाग्य थोरले ते नाही


आता नाही तो आकार
माझी प्रकाश देवता 
परी हृदयी तो दिसे 
दीप अजून तेवता 



© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

मजसाठी कधी धावतील

मजसाठी कधी धावतील सांग श्री गुरुदत्ता
मजलागी कधी पावशील सांग श्री गुरुदत्ता
अजान मूढ बालक मी लागलो तव चरणा
घे उचलुनी प्रेमाने तू रे तुझाच मी आहे ना
धडपड चाले जगी माझी एक तुला भेटण्या
जन्म जीवन जगण्याची या कारणे शोधण्या
पाप जळू दे पुण्य घडू दे होऊ दे रे तव करुणा
हाक मारून थकला विक्रांत धाव पतीत पावना
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

कृष्णा काठ

कृष्णाकाठ
*********

ओली वाट ओली पहाट
ओला ओला कृष्णा काठ
ओला वृक्ष ओली पाने
ओल्या तळी देव गाणे
ओले हात ओली फुले
चिंब ओले गर्द डोळे
ओले ओठ शब्द ओले
व्याकुळले खुळे डोळे
ओले तन ओले मन
अासावले ओले स्वप्न
चिंब भिजला जन्म सजला
हवे काय या विक्रांतला
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

तुझे स्वप्न

तुझे स्वप्न
**********
तुझे स्वप्न हे
अर्धे अधूरे
तरी साजरे
आहे काही
.
डंख तुझा तो
मधू विखारी
तया निवारी
औषध  ना
.
प्रेमातून त्या
होता सुटका
घट फुटका
माझ्या हाती
.
लखलखते 
तप्त सुवर्ण
गेलो होऊन
जरी काही
.
मूर्त जाहलो
सुवर्ण राशित
परि बंदिस्त
कर्मगती
.
म्हणतो आता
ये सोडव रे
अवधूता रे
विक्रांत या
.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

हे वृक्षांनो (आरे कॉलनीतल्याही)





हे वृक्षांनो (आरे कॉलनीतल्याही)

हे वृक्षांनो
माफ करा आम्हाला
वाढतेय आमची प्रजा
वाढताहेत गरजा
नाही थांबवता येत
कत्तल तुमची आम्हाला
सत्तेमधील समीकरणे
धनिकांचे घर भरणे
जणू काही हे सारे
मान्य आहे आम्हाला

पर्याय असतात सापडतात
जर शोधले तर
युरेका नावाचा हर्षवायू
कधी लागतो हाताला

पण धनदांडगे कॉन्ट्रॅक्टर
टक्क्यांवर पोसली जाणारी
त्यांची बुभुक्षित पिलावळ
हसते ठेंगा दाखवून आम्हाला

मरा तुम्ही ठिकऱ्या पडत
पडा तुम्ही फांद्या तुटत
तुमचे ते हिरवे जग
जल्लाद म्हणू देत आम्हाला

त्या तुमच्या मरणात आम्ही
अधोरेखित केले आमचे मरण
शेवटी चिता आणि शवपेट्या ही
तुम्हीच होताना आम्हाला
*

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...