गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

रान




देही पांघरून उन
वृक्ष सोनेरी  कोवळे
छाया उदास तरीही
थोडी पायाशी रेंगाळे

जन्म हिरवा पोपटी
दृष्ट लावतो जीवाला
साऱ्या रानात पसारा
काट्यां कुट्यांचा पडला

बाई वेचते जळण
काटे बोटात रुतले
चार चिंध्यानी मन
ऊन भाकरी हसले

फुले चारच दिसांची
गंध धावे रानोमाळ
रान टपून बसले
कसा करावा सांभाळ  

भूक चिवट चुकार
घेते ओढून तोडून
फळ पिकण्या आधीच
जातो बहर मरून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

साद




तू साद घाल रे जीवा  
म्हटला सखा मजला
पण म्हणजे कुणाला
काहीच कळेना मला

साद ही जीव घालतो
असे वाटायचे मला
जीवास साद घालतो
तो असे कोण वेगळा ?

नाही म्हणजे मी तसा
फार हुशार नाहीये
खरच सांगतो आत
दिवा पेटत नाहीये

डोळे बंद केले अन
शोधू लागलो तयाला
कुठे आहे जीव राव
पाहू म्हटलो आतला

खूप डोके आपटले
साक्षी द्रष्टा गोळा केले
माझ्यावाचून वेगळे   
कुणी नाही सापडले

इथे कुणी आत नाही  
बाहेर वा कुणीतरी
जीव वगैरे मित्राला  
भ्रम झाला काहीतरी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

कातरवेळी



हा अंधार असे कसला
दशदिशा उगा भरलेला
तो स्वर्ग हरवला कुठे
मी माझ्यातच जपलेला

हे बेभान वावटळ उरी
गगनात धुराळा भरला
शत रात्री कुठे सजलेला
तो चंद्र कुठे कोसळला

कुणी म्हणे कातरवेळी
भान सारे हरवून जाते
कणाकणात दाटलेला रे
आकांत असे हा कसला

तो प्रकाश काचा फुटला
मज म्हणे थांबू कशाला
का लाटेत हरवून गेला
दीप जळात कुणी सोडला

घे नेत्रात सजवून रात्र
जगण्याचे भान जर आले
दे जळात सोडून देह
स्वप्न उगाच कुणी मोडले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

बापू बाबा सोडा आता

बापू बाबा सोडा आता 
चाला आपला रस्ता  
गल्लोगल्लीअसे हा सस्ता 
माल पडलेला ।।

कुणी वदतो मी दत्त  
तू आहेस माझा भक्त 
रे तुझ्यासाठी सतत 
जन्मासी आलो ।।

कुणी वदतो मी कृष्ण
येई मजला शरण 
मी तुझा भार वाहीन
करू नको चिंता ।।

कोपऱ्यात हा बोका बसला
दुधावरती ठेवून डोळा 
त्यावरती जो विश्वासला 
त्याचा देव बुडाला ।।

लुटे धनाला लूटे मनाला 
लावून आपल्या सेवेला 
अन मग ठण ठण गोपाला 
येईल तुझिया हाता ।।

गुरु मान रे गुरु दत्ताला 
ज्ञानदेव अन समर्थाला 
तत्व भेटेल तव हृदयाला 
कळले विक्रांतला ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

अतिरेकी





कश्यासाठी मरतात
ते कश्याला मारतात
अनाठायी धारणांना
उरी असे वाहतात

मेंदूमध्ये घुसलेला
कडवट परभार
धूर्त कुणी त्यात भरे
सूडाचाच तो विखार

पोटासाठी इथे कधी
कुणी होतात लाचार
दारिद्र्यी मरण्याहून  
बरा मृत्यूचा स्वीकार

मरणारा मानव नि
मारतो तोही मानव
भाऊ बाप लेक पती
उरामध्ये जपे गाव

एक मत एक पथ
इथे रे होणार नाही
धर्म अर्थ अधिकार
व्यर्थ ठरणार नाही

सांत्वनात जाणाऱ्याच्या
उरामध्ये सुरा शिरे
जळूनिया माणुसकी
जग सारे सरफिरे

तेच युद्ध तेच रक्त
उगो युगी वाहणारे
माता पिता सखी रडे
पडे उघडी लेकरे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

दत्ता हृदयी






कुणा विचारून  
लिहितेय कोण,
कळल्यावाचून ,
जग चाले।।

विकारी विचारी
वाहते जीवन ,
हिशोबा वाचून
उगा खर्च।।

निजणे उठणे
पर्याय तुजला 
त्यावर ठरला
पथ पुढे  ।।

कळून नकळे
कुणाचिये बळे
स्थिरावले चळे
चित्त कैसे।।

देई रे दातारा
प्रकाश डोळ्याला 
अंधार दाटला
हटो सारा ।।

विक्रांत हृदयी
घेवून दत्ताला
जाहला मोकळा
आपोआप।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...