बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

दत्त चाकरी



काही माझे न्यून दत्ता घे साहून
पदरी ठेवून चाकरला ||
करतो आळस बसतो उदास
निरर्थात रस घेतो कधी ||
पडूनिया भुली विसरतो काम
घेणे तुझे नाम संगितले
मनाच्या संगती करे नशापाणी
राखण सांडूनी जाणिवेची ||        
बोलविल्याविन घेतले वाहूनी
जगाते पाहुनी अर्थहीन  ||
पायाची शपथ वाहतो विक्रांत
मज हवा फक्त तूच दत्ता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in

                                                                                                                                           

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

निरुपाय जगण्याचे वाहतांना कलेवर




निरुपाय जगण्याचे वाहतांना कलेवर
माणूस चढवतो स्वप्नवेल काळावर

हताशा निराशा यांनी हात बांधलेले
माणूस चढवतो दिवास्वप्न डोळ्यावर

कुठे तरी जगाच्या ओसाड कोपऱ्यात
चाचपडते अस्तित्व अहंच्या कड्यावर

आज काय उद्या काय जरी न ठावे
हिशोबी जमाखर्च नि बांधतो उरावर

नाहीच कुठे काय सापडले तया तर
पारायणी पोथी ती पुन्हा येतेच बाहेर

असे स्वप्न शेवटी डोळ्यात उजेडाचे
नाकारतो अंधार ठाम दाटला सभोवार  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

जन्म जाहला पुन्हा विरागी




घट्ट वाटा हळवी वळणे
क्षितिजावरती काही स्वप्ने  
हातात हात होते झुलणे
वाऱ्यावरती मुग्ध जगणे
================
जाणून तुला न जाणतो मी
पाहून तुला न पाहतो मी
एक मितीच अनाकलनीय
माझ्यातच जणू जगतो मी
================= 
कोण धावले मोही कुठल्या
कोण रंगले रंगी कुठल्या
कुणा सावल्या निळ्या डसल्या 
प्राणा मधल्या तृष्णा निजल्या 
==================
कुणास शिवले अहं उरगी
कुणी भाळले गंध सुरंगी  
कधी करुणा होवून जागी 
जन्म जाहला पुन्हा विरागी 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

गुरुपदी होता भेटी






गुरुपदी होता भेटी
पुन्हा मागे फिरू नको
जीव देई तया दारी
पायरी ती सोडू नको

हजार बसो ठोकरा
माथा फुटो पुन:पुन्हा
जन्म लावूनी पणाला
करी सार्थक जीवना

सापडता श्रेय तुज
दवडू नकोस तयाला
मानपान रितीभाती
ठोकर मार जगाला

तिथे चुकता चुकीने
व्यर्थ जाईल रे जिणे
जन्म मृत्यूत धावणे  
प्रारब्धी केविलवाणे

हेच माझे सारे काही
पटो हृदयाची ग्वाही
मिळो संजीवनी जीवा
अन्य कुठे जाणे नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

काही वेदना

वेदना
*****
या डॉक्टरी पेशात
मी पहिल्यात
असंख्य वेदना
तरीही प्रत्येक वेळी
मला दिसली
तेवढीच धारधार
प्रत्येक वेदना
मी पाहिली
देहाच्या वेदनेने
तडफडणारी माणसे
ठेचाळलेली रक्ताळलेली
थरथरणारी माणसे
घट्ट पोट धरून
डोके आवळून
विव्हळणारी माणसे 
आणि एखाद्या वोवेरान
एखाद्या बस्कोपेन
वा एखाद्या पँनफोर्टीने
स्वस्थ होणारी माणसे 
कृतज्ञतेने हसणारी
धन्यवाद देणारी माणसे
वेदनेचे परीहारीत होणारे हे रूप
देते एक अर्थ माझ्या जीवनाला .....
कधी पाहीलीत मी
जीवलगांच्या जाण्याने
साऱ्या विश्वाची वेदना
डोळ्यात भरून
काळीज फाटणारा
आक्रोश करणारी माणसे
या जगाची अन जगण्याची
सारी गणिते क्षणात
चोळामोळा करणारी ती वेदना
तिचा इलाज
तिचा उतारा
मला कधीच भेटला नाही
त्या असंख्य अनाम
आक्रोशांनी अन वेदेनेनी
भरलेले माझे हृदय
मी नेवून बुडवले
कधी संगीतात
कधी सुखभोगात
कधी ग्रंथात संतचरित्रात
तर कधी मंत्र पठणात
अगदी वेदांतात
अन उपनिषदातही
तरीही ती वेदना तशीच आहे
अविचल कोरडी सनातन ...
कधी मी पहिले कुणाला
कित्येक प्रहर कळा सोसतांना
तन मन पिळवटून निघतांना
जन्म मृत्यूच्या हिंदोळ्यावर
स्वत:ला लोटतांना
कुशीतील चैतन्य
जीवनात सोडतांना
अन वेदनेला आलेले फुल
अलगद वेचतांना
पाहिले एक अपूर्व समाधान
डोळ्यात ओघळतांना
अगदी कडेलोट होवूनही
वेदना अशी हसतांना ...
***
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

आळंदी वल्लभा






आम्हा भेटती माऊली
स्वर गजरी लागुनी
सवे येवून तुकोबा
हरी विठ्ठली सजुनी

आम्हा जाळतो अभंग
आर्त घुसनी विराणी
जीव होतोच व्याकुळ
नाद टाळ मृदुंगानी

ओठी ओघळती ओव्या
हार मोत्याचे होवुनी 
माय भेटती कितींदा
मिठी गळ्यात घालुनी

डोळा ओघळते पाणी
काही कळल्या वाचुनी
भाग्ये हरखतो किती  
तया भाषेत जन्मुनी

आन नकोच ग काही
अर्थ प्रकाशो जीवनी
शब्द वेचलेले दिव्य
होवो जीवन वाहणी

घेई आळंदी वल्लभा
मूढ विक्रांता व्यापुनी
कण इवला मातीचा
क्षण पदाला स्पर्शुनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/










शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

ध्यान







लोक कवितेचे विडंबन करतात मी  रूपांतरण केले आहे मूळ कविचे नाव मला माहित नाही कळले तर आनंद होईल .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
***************************************
बसून थोडे गुंगणार असु
तरच ध्यानाला अर्थ आहे
एवढे बसून रंगणार नसु
तर आख्खा तास व्यर्थ आहे


मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात उपवास करतो
अन कांदा लसूण टाळतो


ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
ध्याना फक्त पहात रहावं
स्वप्न रंग त्यात भरू नये


वेळच्या वेळी ओळखावी
आपली आपण जिंदगानी
लाज सगळी सोडुन देऊन
म्हणत बसावी देव गाणी


बसून धुंद झाल्यानंतर
काय करतो ते कळत नाही
काळवेळ अन तासामधली
टोटल कधी जुळत नाही


आपला मार्ग आपण सांभाळावा
दुसर्‍याला घेऊ देऊ नये
दुसर्‍याचा देव  उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये


अशीही वेळ असते जेंव्हा   
विश्वास आपला हरवतो
म्हणून आपण शोधाया जातो
तर नेमका रस्ता तिथेही नसतो


आपला संग आपण करावा
दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
आपली माळ आपले आसन
दुसर्‍याच्या हातात देऊ नये


असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख देवात बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
नाम ध्यानात उडून जातं!


एकदा ध्यानात बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय, माझी काय
ईर्षा कधी करू नये


तुला जायचंच असेल तर निघून जा ,
भांडणासाठी भांडू नकोस
घ्यायचे नसेल तर नाम घेवू नको ,
पण देवास कधी सांडू नकोस


सगुण घ्यावी  निर्गुण घ्यावी
उपासना पण, सोडू नको
उंच मूर्ध्यनी उडण्यासाठी
इच्छा हवी उगा अडू नको!


प्रभू नाम कितीही घ्यावे
फार कधीच वाटत नाही
नेमी आपल्या चिकाटी हवी
आयुष्यभर जी घटत नाही       

         
ध्यान असतं आगळा उत्सव
त्याचे नाटक होऊ नये
ध्यानात तर आपण कधी
कर्ता मालक  होऊ नये


घरी बसून ध्यान करायचे
खूप सारे फायदे असतात
मठामधे नित्य पाळायचे
काटेकोर कायदे असतात


आम्ही कधीच ध्यानामधे
दुःख आमचं बुडवत नाही
ध्यान नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही


हवा तितका बसतो आहे
कोण म्हणतंय ' का जातोय खोल ?'
माझ्या मित्रा, ये माझ्या सोबत
बसून अनुभव, नंतर बोल!


प्रत्येक संगातआपण बोलवावे
काही ' ' मानणारे मित्र
समूह ध्याना नंतर आपल्याला
चौकस प्रश्न  विचारणारे मित्र


भक्तीत मस्त त्यांनी  समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
नामाचा या मोह टाळू नये

 
मंदिरी लागेल त्या घुसत असतो
कीर्तनी लागेल त्या गात असतो
तेव्हा माझी काळजी सदा
प्रभू प्रेमाने तो घेत असतो


काय होतंय, कुठे होतंय
काही केल्या वळत नाही
एकदातरी वेळ अशी येते
ध्यान ध्याता कळत नाही


प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं  आपला
सांभाळायचा असतो ध्यास...
*समस्त  ध्यान प्रेमी भक्त मित्रांना
परिवर्तीत करून,

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...