सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

पॅरोलवर

पॅरोलवर
********
ती सुखाच्या शोधात गेली दूर दूरवर 
चार मोकळ्या श्वासासाठी 
पैसा पाणी उधळत 
चार दिवस स्वातंत्र्याचे सारे काही विसरत 
अवघडलेल्या नात्यातून सुटका करून घेत 
मनातून तिला जरी होते माहीत 
ते तिचे सुख पॅरोल वरचे आहे
बंदी शाळा घर तिचे वाट पाहत आहे 
तो. .
तो घरी एकटाच त्याच चक्रात फिरत 
बस लोकल चाकोरीत 
रोज त्याच त्याच पिळत 
होता तेच जीवन जगत 
त्याने तिला मुळीच फोन केला नाही 
कशी आहे म्हणून विचारले ही नाही 
तुरुंगाने का कधी स्वतःची 
द्यायची असते आठवण करून 
अन् अचानक त्याला ही आले कळून 
की तो सुद्धा पॅरोलवरच आहे म्हणून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

वाट

वाट
****
ती वाट चांदण्याची दिव्य पौर्णिमेची 
तुझिया दारीची आठवतो 

पाय थकलेले श्वास फुललेले 
मन आसावले दर्शनाला 

आठवे शिखर पूर्वेचा शृंगार 
मन निर्विकार शांत झाले 

आणि परतणे त्याच त्या देहाने 
घडले घडणे घडूनिया 

पुन्हा पुन्हा मन तेथे लूचू जाई 
कासावीस होई परततांना

तूच ठरविले तिथे येणे जाणे 
बहाणे गाऱ्हाणे खेळ सारा

बोलाव अथवा नको बोलावूस
देवा जे दिलेस तेही खूप

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

मरण हौस

 हौस 
********
माझी मरणाची  हौस 
दत्ता पुरणार कधी 
जरा जन्म ऐसी व्याधी 
सांग सुटणार कधी 

पोट टीचभर खोल 
रोज भरणे तरीही 
स्वप्न बेफाट बेभान 
नाही सरत कधीही 

किती फिरावे धावावे 
रोज तोच तोच दिस
व्यर्थहीनता जन्माची 
करे मज कासावीस 

कोडे सुटता सुटेना 
फोड फुटता फुटेना
दुःख ठसठस खोल
मुळी हटेना मिटेना 

किती करशील थट्टा 
किती पाहशील अंत 
झाली कुस्करी मस्करी 
उरी दाटलेली खंत 

जन्म विक्रांत ओंडका
वाहे कुठल्या डोहात 
देह चंदन बाभूळ 
नाही फरक पडत 

ओल जगाची देहात 
स्वप्न धूनीचे मनात 
येई उचलून घेई 
प्राण दाटले डोळ्यात
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

स्वीकार

स्वीकार
*******
जीवनाचा हट्ट कळे आभाळाला 
सूर्य ओघळला फांदीवर ॥

एक एक पान जळले प्रेमाने 
वसंताचे गाणे फुलावर ॥

आयुष्य टांगले होते खुंटीवर 
झटकून धूळ नेसू केले ॥

गेले मिरवीत असण्याचे भान 
उमटली तान कोकिळेची ॥

जरी अहंकार उभा पायावर 
कुबड्याचा भार भूमीवर ॥

अडकला जीव प्राणात बासुरी 
स्वीकार अंतरी सर्वव्यापी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

ऋणाईत

 ऋणाईत
*********
मज ज्ञानदेवे पदी दिला ठाव 
दावियला गाव आनंदाचा ॥

होतो अडकलो गहन काननी
कळल्यावाचूनी सोडविले ॥

सांगितली रीत संसार धर्माची 
मोक्ष पाटणाची खूण दिली ॥

काम क्रोध मोहे होतो लिबडलो 
शब्दात न्हाईलो दैवी तया ॥

जहाले उजळ मनाचे पदर 
प्रकाश पाझर ओघळला ॥

तयाच्या प्रेमाला नाही अंतपार   
ओघळे अपार कृपा मेघ ॥

जन्म जन्मांचा मी झालो ऋणाईत
दारीचा आश्रीत  सुखनैव॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

नरसोबाची वाडी


नरसोबाची वाडी
*************
होय मी तुला मिस करतोय 
माझ्या प्रिय नरसोबाची वाडी 
आणि गुरुद्वादशीला तर 
प्रदक्षिणाच पायात घोटाळती  
यायचो तेव्हा सोबत्यां सोबत 
किती हात असायचे हाती
विखुरले साथी आता 
आणि गेल्या विरून गोष्टी 
ते भल्या सकाळी धावत धावत
जाऊन गाठायचा काठ 
आणि स्नान कृष्णामाय मध्ये
व्हायचे मंगल घोषात गजरात
त्या प्रदक्षिणा दत्ता भोवती 
मारल्या होत्या किती 
पाय थकायचे ना मन हटायचे
प्रेम काठोकाठ भरून चित्ती
ती पालखीची तर  गंमत न्यारी
ते भक्त अधाशी ती दर्शन बारी
डोळ्याभरून न्याहाळाने किती
श्री मूर्तीची ती सुंदर स्वारी 
हा आता , चमत्कार वगैरे काही
तसा मुळी घडला नाही कधीही 
पेढे बासुंदी वांगी इत्यादींनी 
भरल्या पिशव्या आल्या घरीही . . .
पण प्रियतमांच्या झाल्या गाठी
देणे घेणे झाले सुखाचे 
गंभीर संवाद ज्ञान भक्तीचे 
बोलत घोट घेतले चहाचे 
मैत्र काही जोडले सख्य काही घडले 
जन्मोजन्मीचे कधी वाटले
जिवलग येथे भेटले 
होते ते सारे स्वप्नवत
कुठल्या जन्माच्या पुण्याईने 
गेले होते सारे घडत 
दत्तकृपाच त्यातून होती ओघळत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

Behind the veil

Behind the veil
*************
Oh, my sisters behind the veil,
please come out, out of the jail.
There is no light, no sun rays,
I'm losing you in dark caves. 
How many "yous", there's no count,
do mercy on you and come out.
You are always used like a doll,
you are used and pushed in walls.
The world of the men use tricks,
region, religions are the gimics.
You are a person, complete human.
don't be a slave, in the chain.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


 

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...