गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

मरण हौस

 हौस 
********
माझी मरणाची  हौस 
दत्ता पुरणार कधी 
जरा जन्म ऐसी व्याधी 
सांग सुटणार कधी 

पोट टीचभर खोल 
रोज भरणे तरीही 
स्वप्न बेफाट बेभान 
नाही सरत कधीही 

किती फिरावे धावावे 
रोज तोच तोच दिस
व्यर्थहीनता जन्माची 
करे मज कासावीस 

कोडे सुटता सुटेना 
फोड फुटता फुटेना
दुःख ठसठस खोल
मुळी हटेना मिटेना 

किती करशील थट्टा 
किती पाहशील अंत 
झाली कुस्करी मस्करी 
उरी दाटलेली खंत 

जन्म विक्रांत ओंडका
वाहे कुठल्या डोहात 
देह चंदन बाभूळ 
नाही फरक पडत 

ओल जगाची देहात 
स्वप्न धूनीचे मनात 
येई उचलून घेई 
प्राण दाटले डोळ्यात
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...