तत त्वम असी !
**********
ती नव्हती तेव्हाही जीवन होते ती आली तेव्हाही जीवन होते
ती गेली तेव्हाही जीवन होते
तिचे येणे असणे जाणे
जीवनाच्या परिघात घडत होते
आणि जीवनाचा केंद्रबिंदू
कुठलाही केंद्रबिंदू . .
त्याला तर अस्तित्वच नसते
लांबी रुंदी उंची या गणनेत
तो मुक्त असतो, म्हटले तर शून्य असतो
तरीही तो तिथे असतो,दिसतो
आणि जो असतो जो जाणवतो .
तो आहे असेच म्हटले जाते
कदाचित ती त्याच्यातून आली
त्याच्यात रमली आणि
त्याच्यातच विलीन झाली
पण ही तर सांख्ययोगातील
प्रकृती पुरुषाची सोपी व्याख्या झाली
व्याख्या सोप्या असतात
जरा घोकल्या की पाठ होतात
शेवटी तो आणि ती ची
काना मात्रा वेलांटी वगळली
तर उरते एकच त त ,
तत त्वम असी !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा