मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

अटळ

अटळ
****
गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची 
ती कृती भ्याड नामर्द रात्रीची 
अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची 
ती कृती उद्दाम  द्वाड दिवसाची
कसा काय धर्म कळणार तयाला 
दृष्टी जी न पाहते कधी सौंदर्याला 
ती मुद्रा शांत प्रशांत गौतमाची 
नभातील नितळ शुभ्र प्रकाशाची 
ते हास्य कोमल प्रेमळ गोरखाचे 
चांदणे ओघळले जणू पौर्णिमेचे 
कसा द्वेष नांदतो कुठल्या नसात 
काय जन्म वाहतो कुणाचा विषात 
तया सत्य प्रेम काहीच कळेना 
जणू जन्मा आली पुन्हा दानवसेना 
जया हाती शस्त्र येते आततायी 
तया गत रावणाची रे अन्य नाही 
भरले अपराध भरले रे शंभर
अटळ आता अटळ आहे रे संहार

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

अलिबाबाची गुहा

अलिबाबाची गुहा
*************

ती गुहा अलिबाबाची दिसते कधी पुन्हा 
शब्द परवलीचे पण नच बोलतो मी पुन्हा 

तेव्हाही ती परवल चुकलीच होती जरा 
उघडल्या वाचून दार गेलो होतो माघारा 

यदा कदाचित संधी मिळाली ही असती
ठेच अहंकाराला पण फार लागली होती 

विसरले स्वप्न ते आणि मार्ग धोपट धरला 
प्रत्येक डाव हातातला का नकळे मी टाकला 

आता व्यथा न अंतरात पण चुका त्या हसतात 
हरवल्या सिंधुत शिंप्या काय पुन्हा मिळतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

रिक्तहस्त


रिक्तहस्त
********
रिक्तहस्त जीवनाची 
खंत ही मिटत नाही 
अंतर्बाह्य कोंडणारा 
एकांत सरत नाही 

दिलेस तर मिळेल 
सुखाची ही धूर्त अट 
करताना पुरी इथे 
आले आयुष्य संपत 

काय हवे होते तुला 
आणि काय आहे हाती 
कुठे सुरू झाली असे 
कळेना ही विसंगती 

कोण तुज चालवतो 
नेऊनिया आड वाटा 
कोण तुज थांबवतो 
अडवून वहीवाटा 

थांबवावा वाटतो हा
उगा रेंगाळला खेळ
अर्थहीन वाटते ही 
वाहणारी नित्य वेळ

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

माई

माई
****
माझ्या व्याकूळ प्राणात 
फक्त तुझे गीत आहे 
बोलाव ग आता तरी 
प्रेम तुझी रीत आहे 

आलो होतो एकदा मी 
धाडलेस तू माघारी 
ती व्यथा नकाराची नि 
शिक्का असे माथ्यावरी

इथे यश अपयश 
असे काही नसे जरी 
आल्या विन प्राप्त घडी 
काही होत नाही परी 

कालातीत तू कालौघी 
माझी सरू आली वारी
म्हणूनिया माई माझे
हुरहूर दाटे उरी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .



बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

डीजे

डिजे 
****
बारा वाजू आले डोळे जड झाले 
पिसाटले ध्वनी जिणे जड झाले

कर्कश्य आवाज भरला जगात
पैसा फेकुनिया मुले नाचतात 

ही झिंग नृत्याची ही ओढ सुखाची 
दिशाहीन धाव फाटल्या मनाची 

चाले गदारोळ कर्कश्य संगीत
बधिरला मेंदू व्यर्थ उन्मादात  

कसली ही भक्ती देवाच्या रे दारी 
ही नच संस्कृती अगा ही विकृती 

आधी दहा दिन कान फाटलेले 
आता ह्या डिजेने प्राण उसवले 

कुठे हा चालला कळेना प्रवास 
धर्म नावाखाली चालला हैदोस 

वाटते तो बरा होता रे कोरोना 
शांति काठोकाठ भरली जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

पांडुरंग सालप( निवृत्ती दिना निमित्त)


पांडुरंग सालप (निवृत्ती दिना निमित्त)
****************************
या रुग्णालयांमध्ये 
पांडुरंग सानपला मी तीन रूपात पाहिले 
पहिले मी एमओ असताना 
तो वार्ड  बॉईजचं किंवा 
ॲम्बुलन्स अटेंडन्सच काम करत होता
त्या काळात त्याचे वागणे जेवढ्याच तेवढे  होते . पण तरीही त्याचे हलकेच ओळख देणे
आदराने गोड स्मित करणे
व नमस्कार करणे चांगलेच लक्षात राहायचे .
त्याच काळात रुग्णालयात 
अन रुग्णालयातील राजकारणात 
तो आपली जागा निर्माण करू पाहत होता .

त्याला दुसऱ्या रूपामध्ये मी पाहिले 
तेव्हा मी जेव्हा प्रशासनात कार्यरत होतो
त्यावेळेस तो राजकारणामध्ये बऱ्यापैकी प्रस्थापित झाला होता
आणि प्रस्थापित राहण्यासाठी 
सतत कार्यरत राहणे आवश्यक असते 
आणि त्यासाठी कामगार नेत्याला 
 प्रशासनाला धारेवर धरावेच लागते 
प्रशासनातील मर्मावर बोट ठेवावेच लागते 
प्रश्न माहीत असतात उत्तर माहित असतात
तरीही भांडावे लागते .
ती भूमिकाही पांडुरंग ने उत्तम निभावली .

पांडुरंग ची तिसरी भूमिका म्हणजे 
तो जेव्हा TK चे  काम करू लागला ती होय .
त्यांच्या या काळात मला
त्यांचा खूपच जवळून परिचय झाला  
युनियन लीडर्सचे काम बाजूला ठेवून
TK चे काम करणे तसे अवघडच होते
पण त्याने तो प्रामाणिक प्रयत्न केला .
कधी त्याच्यातला लीडर Tk ला वरचढ व्हायचा 
तर कधी TK हा कामगार नेत्यावर मात करायचा 
पण तरीही कारभार नीट सांभाळाला जायचा .

टि के ऑफिस ही अशी गोष्ट आहे की
तिथे सर्वांच्याच मनासारखा नाही करता येत
 काम करणाऱ्यांना उजवे माप दिले जाते 
तर त्रास देणाऱ्यांना डावे माप दिले जाते 
ती एक अलिखित संहीता असते

पण कामगार वर्गातील सर्व व्यक्तिमत्व 
त्याला नीट माहीत असल्यामुळे 
या काळामध्ये पांडुरंग सालप हा 
प्रशासनासाठी वरदान ठरला होता .

तर आपल्या पांडुरंगाची दोन रूप असतात 
एक विटेवर उभा असलेला साधा भोळा 
सावळा जनप्रिय लोभस .
तर दुसरा कुरुक्षेत्रातील अर्जुनाच्या रथावरला
धूर्त ,कुटनिती तज्ञ ,तीक्ष्ण नजर असलेला .

आणि ही दोन्ही रूपे आपल्याला 
येथे पाहायला मिळाली आहेत . .

तर आज आपल्या या पांडुरंग सालपचा , 
निवृत्तीचा सेवापूर्तीचा दिवस आहे .
खर तर पांडुरंगला रुग्णालयाशिवाय राहणे
फारच अवघड जाईल याची मला जाणीव आहे .
पण यापुढे पांडुरंगाचे चौथे वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळेल 
अशी मी आशा करतो आणि 
त्याला निवृत्ती दिनानिमित्त खूप शुभेच्छा देतो
 सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी रहा .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

अर्थ

अर्थ
****
ज्याच्या त्याच्या जीवनाचे
मार्ग ठरलेले असतात 
ज्याच्या त्याच्या जीवनाला
अर्थ काही असतात 

अर्थ मानलेला असो 
किंवा अर्थ ठरलेला असो 
ओघ सर्व झऱ्या-ओढ्यांचे 
शेवटी सागरातच जातात

अन् अर्था वाचून जगतात
त्याला खरेच अर्थ  नसतात?
विशाल वृक्षाची अज्ञात मुळेच
ज्ञाताला अर्थ देत असतात 

अर्थ शोधू म्हणणाऱ्याला 
अर्थ सापडतोच असे नाही 
कारण अर्थ शोधात नसतात 
अर्थ जगण्यात असतात 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...