सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

गणपती

गणपती
******
कुठे कुठे रूप तुझे
कितीदा मी न्याहाळतो 
तोच भाव तीच श्रद्धा 
जीव उमलून येतो ॥ १

सजावट मुळी सुद्धा 
मन हे पाहत नाही 
तुझ्या डोळी हरवतो 
काळ तो उरत नाही ॥ २

क्षण एक दोन तीन 
पांगुनिया कोश जाती 
लखलखे वीज एक 
पंचप्राण पेट घेती ॥ ३

मृतिकेचा देह माझा 
मृतिकेला दूर सारी 
विरुनी भास आभास 
तूच दिसे मुलाधारी ॥ ४

पालटती युगे किती 
जन्म किती उलटती
तुला मला पाहतो मी 
वर्तुळात कोटी कोटी ॥ ५

असणेही व्यर्थ होते 
नसणेही अर्थ देते 
कळते ना काही जरी 
जाणणे ते शून्य होते ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
//kavitesathikavita.blogspot.  
☘☘☘☘ 🕉️

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

स्मृति

स्मृती
***
तुझ्या स्मृतीचे तुषार 
खिळलेल्या मनावर
कोरड्या ऋतूत साऱ्या 
हिरवळ देहावर ॥१
आकाशाचे वैर जरी 
वाहते प्रारब्ध शिरी 
मोजून सुख एकेक
ठेवले भरुनी उरी ॥२
जरी अट्टाहास नाही 
पुन्हा चिंब भिजायचा 
भरुनिया घेतला मी 
स्पर्श तुझ्या असण्याचा ॥३
अस्तित्वा ठाऊक नाही 
मुळे किती खोलवर 
त्याही पलीकडे कुठे 
जीव धावे अनावर ॥४
नसणेही तुझे होते 
असणे हे माझ्यासाठी 
पानोपानी चित्र तुझे 
दिठिविना देखे दिठी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

देव्हाऱ्यात

देव्हाऱ्यात
*******
देव्हाऱ्यात किती रुप ती सगुण  
ठेवली मांडुन आवडीने ॥१

लंगडा श्रीकृष्ण वाघावरी देवी 
उपदेश देई दत्तात्रेय ॥ २

गोड गणपती देव पशुपती 
माता सरस्वती सुंदरशी ॥ ३

गुरुदेव स्वामी ज्ञानदेव साई 
कुलदेवीआई गजानन ॥ ४

खेळता रंगता भरले अंगण 
भरे ना रे मन काय करू॥ ५

शेजघरातून आई बोलावते 
जावे न वाटते यातून परी ॥ ६

याद देई सांज सरू आला खेळ 
निजायाची वेळ निराकारी ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

चित्र काढणे

चित्र काढणे
*********"
तू आणि मी काढलेली चित्र 
फाटतात विटतात हरवून जातात 
अस्तित्वाचा अंशही मागे न ठेवता 
कधी कधी तर त्यांना 
चार डोळ्यांचे दर्शनही घडत नाही 
तेवढी भाग्यवान अन मौल्यवान नसतात ती 
पिकासो व्हिन्सेंटगॉग लिओनार्दो मायकल इंजीलो  सारखी मिलियन डॉलर होणारी 
किंवा रविवर्मा अमृता जेमिनी हुस्सेन
दलाल आबालाल वा मांढरेच्या चित्रांसारखी 
अंतर्बाह्य सुखवणारी वा हादरविणारी.

तशी आपली चित्रकला संपली
त्या चपट्या रंगाच्या डब्यात क्रेयानच्या खडूत
व कॅमलिनच्या ट्यूबच्या खोक्यात
तरीही ते रेघोट्या मारणे चालूच राहते 
कधी वहीच्या पाठीमागे 
कधी कागदाच्या तुकड्यावर 
कधी फाईलीच्या माथ्यावर 
कधी चक्क कोऱ्या कागदावर कॅनवासवर 
खरंतर त्या चित्राला काहीच महत्त्व नसते 
महत्त्व असते ते चित्र काढण्याला 
कारण चित्र काढतच नसतो आपण ..
चित्र काढले जात असते ते एक घडणे असते. 
डूइंग चा अंत होतो तिथे
अन हॅपनिंगचा प्रांत सुरू होतो 
आणि हॅपेनिंग मध्ये नसते मन 
म्हणून नसतात भावना नसतो काळ 
असलास तर असतो वर्तमान केवळ 
बोटात हातात डोळ्यात एकवटलेला 
तरीही शरीर नसलेला 

तेव्हा ती उत्स्फूर्तता सृजनता भेटते आपल्याला .
ते चित्त लहान शिशूचे न शोधता
 पुन्हा गवसते आपल्याला 
आनंदाचा एक झरा घेरून राहतो जीवनाला. 
ते चित्र काढणे एखादी
कविता लिहिण्यासारखे असते 
पदर पसरून प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहणे 
आणि फक्त ती  फुल झेलणे 
ती मनात पडणारी शब्द फुले
त्यांनाअलगद अक्षरात मांडणे 
तिथे ही ते वाट पाहणे थांबणे
किती अप्रतिम दुर्लभ विलक्षण असते 
ते ही एक चित्र काढणेच असते 
कारण ते ही हॅपनिंग असते
(त्यामुळे कवी चित्र काढू लागला 
किंवा चित्रकार कविता लिहू लागला 
तर मला फारसे नवल वाटत नाही.)
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

बंद दार

बंद दार
****
कधी दारे होतात बंद 
खूप दिवस न उघडल्या गेल्याने 
बिजागऱ्या गंजून
तर कधी केली जातात बंद 
हेतू पुरस्पर जाणून बुजून
कडी कोयंडा घालून 
दिलेली साद ऐकूनही न ऐकून 

दार लावले गेले किंवा लागले गेले 
तरी त्याला फारसा अर्थ नसतो 
दार बंद झाले की तेथे 
घुटमळू नये पुन्हा कधी 
मग भले तिथे होणार नाही 
कधी तुमचा अपमान
दिले जाणार नाही 
कधी तुम्हाला हाकलून 

पण  बंद दार असते 
स्वरूप नकाराचे 
टाळलेल्या स्वागताचे 
अन् स्वाभिमानाला 
ताटकळत ठेवण्यासारखी 
दुखरी ठेच लागत नसते कधी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

बाप्पाशी गप्पा

बाप्पाशी गप्पा 
************
मी न मागताही तू झालास 
माझ्यासाठी सुखकर्ता 
झोळी भरून गेली तुझ्या कृपेने 
मी न सांगताही तू नेलीस 
विघ्ने माझी होत विघ्नहर्ता
टळल्या आडवाटा अन् आडवळवणे
आणि ती दु:ख 
ती येणारच होती स्वाभाविकपणे 
सांभाळलेस त्यात मला
पाठीशी राहून खंबीरपणे

तशी तर तुझी सेवा
फार अशी नच झाली माझ्याकडून
 कधी अथर्वशीर्ष कधी संकटमोचक स्तोत्र 
तर कधी धरत सोडत केले चतुर्थी व्रत
कधी अष्टविनायकांचे दर्शन
तेही घेतलेस तू मान्य करून 

पण एक सांगू बाप्पा 
आता बाहेर काढ मला 
या सुखदुःखाच्या मिरवणुकीतून 
खूप गुलाल उधळला खूप नाचलो खेळलो 
गर्दीत धावलो पडलो मन भरले आता 
जीवनाचे सार कळले 
खरंतर तूच शिकवले सारे
आता तुझ्या त्या आदी रूपात 
ओमकारात मला विसावू दे मला .
त्या तीन मात्रांच्या पलीकडे असलेली 
तुझी गूढ अविट शब्दातीत स्वरातीत 
अर्धमात्रा तिथे  घेऊन चल मला

देवा तूच शिकवलेस मला 
की तू प्रयत्न साध्य नाहीस 
प्रार्थना साध्य आहेस 
तू पुरुषार्थ प्राप्त नाहीस 
समर्पण बाध्य आहेस 
ही शरणागती हे समर्पण 
ते ही येते तुझ्याच कृपेने उमलून
ते आले की नाही माहित नाही मला
जर अजूनही असेल त्रुटी त्यात 
तर उणे ते पुरे करून घे आता 
रूपातून अरूपात अन
अंधारातून प्रकाशात ने मला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

संसार

संसार
******
तसाही संसार असतो नासका
परंतु नेटका करावा रे ॥१

सुख संसाराचे चार दिवसाचे 
ओझे वाहायाचे तदनंतर ॥२

येतसे मोहर पडे भूमीवर 
फळे दोन चार देऊनिया ॥३

नवी नवलाई तिला असे अंत 
करावी ना खंत जाताच ती ॥४

पुढे भांडाभांडी होते रुसाफुगी 
तरीही जिंदगी चालायची ॥५

सारे सुख इथे कुणाला मिळाले 
हातात भेटले आकाश फुल ॥६

पाहू गेले तर असतो संसार 
खरेच जुगार हरण्याचा ॥७

पण ती ही खेळी मानता दैवाची 
अवघ्या दुःखाची धार जाते ॥८

हरण्याचे दुःख जिंकण्याचे सुख 
होऊनी कौतुक उरते रे ॥९

असे तोवर तो शेवटचा जागा 
प्रेमाचा धागा धरावा रे ॥१०

अंती देवा हाती प्रारब्धाची गती 
मानुनिया शांती मनी धरी ॥११

अर्थाविना इथे काही न घडते
जग हे चालते शक्ती हाती ॥१२

करून सायास सारे जुळण्याचे
दुःख तुटण्याचे करू नये ॥१३

आणि स्वाभिमान मनात ठेवून 
छळाचे विदांण साहू नये ॥१४

जगण्यावाचून सुंदर आणिक
जगात अधिक नसते काही. ॥१५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...