गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

एआरटी सेंटरला काम सुरू केले तेव्हा.

एआरटी सेंटरला काम सुरू केले तेव्हा. 
****************************

मी पाहत आहे 
अनेक शापित राजकुमार आणि राजकुमारी 
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेली 
न केल्या पापाची परतफेड करत असलेली 

त्यांच्या चेहऱ्यावर असते प्रसन्न प्रफुल्ल हास्य
पौर्णिमेच्या चांदण्याचे कवडसे पाझरणारे
किलबिलत सभोवती स्वर्ग निर्माण करणारे

मी पाहत आहे .
पालक चुकलेले सावरलेले पथावर आलेले
काळजाच्या तुकड्याला हातावर सांभाळणारे
तेच दिव्य मातृत्व अन् पितृत्व अंगात बाणलेले

या महानगरातील अपार कष्टात हरवून गेलेले
तरीही स्वप्न सोनियाची लेकरात पाहणारे
साधी सरळ झुंजार कळीकाळाशी भिडलेले

मी पाहत आहे 
मलाच त्यांच्यामध्ये वावरताना बोलतांना 
विस्मय चकित असा त्यांचा लढा पाहतांना 
किती शिकवतो आहे अजून मला तू जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 







मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी 
*******""
तुझ्यासाठी माझे येणे
तुझ्यासाठी माझे गाणे
बाकी मला मुळी नाही
जगताशी देणे घेणे

मानेवरी ओझे तुझ्या
ओठ कुलूपात बंद
भूमीवर खिळलेल्या
डोळियात परी बंड .

जरी तुझ्या वर वर 
रिवाजात हालचाली 
परी मज कळू येते
गूढ तुझी देहबोली

बोलण्यात शब्द जरी
शब्दात बोलणे नाही
पाहण्यात तटस्थता
सलगीचा आव नाही 

तरी मज दिसतात 
धुक्यातील चित्र काही 
ओझरत्या कटाक्षात 
बहरती दिशा दाही

तुझे हसू टिपूनिया
जातो पुन्हा दूर देशी .
परी येणे ठरलेले 
भिजलेल्या एका दिसी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

आस्थेचा दिवटा

आस्थेचा दिवटा
************
तुजला आवडे खुळा भक्तीभाव 
तयाचा अभाव माझ्याकडे ॥१

देवा मी वाचले ग्रंथ ते अपार 
तत्वज्ञानी थोर वारंवार ॥२

देवा मी ऐकले प्रवचने फार 
तार्किक आधार लाभलेले ॥३

खुरटली भक्ती जगती आसक्ती 
अशी काही वृत्ती आहे जरी ॥४

परी मी आस्थेचा घेऊनी दिवटा
धुंडीतसे वाटा तुझ्या देवा ॥५

येईल रे कधी तुझिया गावात 
अथवा मार्गात पडेलही  ॥६

पडलो जर मी ठेव उचलून 
मागील पुसून सर्व काही ॥७

बस इतुकाच मजला वर दे
वाटेत राहू दे  तुझ्या सदा ॥८


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

दोस्त

दोस्त
******
दोस्त जितने भी है 
उतने हमे काफी है
एक चांद एक सुरज 
दुनिया के लिए काफी है 
हमे क्या मतलब है 
सितारे तो अनगिनत है 
जो अंधियारा दूर करे 
बस वही अपने हमदर्द है
***"
डॉ.विक्रांत तिकोणे 
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाटक

नाटक
*****
कैसे या मनाला स्थिर मी करावे 
नामी गुंतवावे कळेची ना ॥१

कैसे या मनाला ध्यानी बसवावे 
स्वरूपी भरावे कळेची ना ॥२

किती या मनाला नित्य समजावे 
बोधी ठसवावे जमेची ना ॥३

मनोबोध झाला दासबोध झाला 
ज्ञानदेवी याला नित्य नेले ॥४

संतांचे अभंग चरित्र पावन 
नेऊनिया स्नान घडविले ॥५

परी त्यात करी रसाचे ते पान 
वरवर छान रमतसे ॥६

दत्ता अवधूता शरणागतीचे
नाटक हे याचे दिसे मज ॥७

नाटक सुटेना छंद ही मिटेना 
छळे रीतेपणा अंतरीचा ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

चवथीची चंद्रकोर

चवथीची चंद्रकोर
**************
उशिराच येते क्षितिजावर हलकेच जाते पार 
ती चवथीची चंद्रकोर लावूनीया जीवास घोर 

आधीच रूप  इवले सावुली ओढून बसते
भरता भरता डोळीयात धूसरसे होवून जाते

ती येतसे तेव्हा निळुलेआकाश होते साजरे 
प्राणात रस तरुवेलींच्या जीवन जाते उधाणले 

ती तिची खोड परी वाट पाहत ठेवायची 
हलकेच स्पर्शातून रात्र पुलकित करायची 

मिटणाऱ्या डोळ्यात हळू निज पांघरून जायची 
अनंत स्वप्ने वेगवेगळी गात्रात गीत फुंकायची

येवूनिया दान पदरात जरी देते अपूर्णत्वाची
पण पालवते उराशी आस एक पूर्णत्वाची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 





शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

दत्त दत्त

व्याप्त दत्त
*********"
वाजते मनात झांज दत्त दत्त 
लय पावलात होती दत्त दत्त

वारा सभोवत गुंजे दत्त दत्त 
वृक्ष झुडूपात  साद दत्त दत्त

सूक्ष्म परिमळ देहाला स्पर्शत 
पुलिकात शब्द होतो दत्त दत्त 

रुतुनिया खडे इवले पायात 
हसून सांगती म्हण दत्त दत्त 

जय गिरनारी वदणारे भक्त 
भारलेले धुके दव दत्त दत्त 

दिव्य तारकात दूर क्षितिजात 
उंच गगनात व्याप्त दत्त दत्त

हरपले मन दत्त रूप होत
अवघे जगत केवळ श्री दत्त
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...