गुरुवार, २९ मे, २०२५

लव्ह , लॅब आणि रिपोर्ट

लव्ह , लॅब आणि रिपोर्ट
*******************

रक्त माझे आज तुझ्या लॅबमध्ये येणार आहे 
बघ निरखून त्यात नाव  तुझे असणार आहे ॥

पाहील्याविना कुठले कुणाचे हे नमुने आहे
माहीत मला काम तू भराभर करणार आहे ॥

जर कदाचित विसरशील तू नाव ते बघणे 
हरेक पेशी तरीही तुला ओळखणार आहे॥

बघत आहेस तू ते त्यांनाही कळणार आहे 
पाहता तू त्याकडे रंग त्यांचा बदलणार आहे ॥

दाखव जरा ओळख त्या भेट तर घडणार आहे
चुकू दे मान्य मला रिपोर्ट तुझा चुकणार आहे ॥

होय ग नक्कीच रोग भलता दिसणार आहे
पण मी कधी काय केली तुझी तक्रार आहे ॥

हवा कुणाला उपचार इथे प्रेम आजार आहे
बरा न व्हावा कधीही जीवनाचे उपकार आहे. ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २७ मे, २०२५

लास्ट स्टेज कॅन्सर


लास्ट स्टेज कॅन्सर 
*************************
आस जगण्याची सुटता सुटेना
झिजतोय देह मन स्वीकारेना 

अडकला जीव पुन्हा प्रतिबिंबी
तडकली काच  आकळेना बिंबी

सोड बाई आता फाटलेली खोळ 
सोसते का दुःख पाहवेना हाल 

असतो का दुष्ट देव मरणाचा 
वेदनेचा डोह किंवा प्राक्तनाचा 

फाटलेला खिसा बेजार लाचार 
निरोप देण्यास उत्सुक अपार 

तया प्रेम नाही असे मुळी नाही
मागे उरणाऱ्या हिशोबाची वही 

मृत्यूहून अशी प्रतीक्षा मृत्यूची
पाहणे ही जणू सजा स्वकीयांची
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २६ मे, २०२५

पाऊस

पाऊस
*******
घेवून आभाळ डोक्यावर
वारा भणाणत येत आहे
घालीत सडा जगभर 
रानोमाळ उधळत आहे ॥

चिरपरिचित तरीही नुतन
धून कानी पडत आहे 
मातीवरती पाय ओले 
झिम्मा फुगडी खेळत आहे ॥

माझ्या मिठीत स्वप्न तुझे 
पुन्हा पुन्हा अंकुरत आहे 
कणाकणातील  गूढ ऊर्जेत 
घट सुगंधी फुटत आहे ॥

ते विजेचे नृत्य नव्हे गं 
जणू माझेच मनोगत आहे 
तुझ्या कुरळ्या केसात गर्द
श्वास होवून उधळत आहे ॥

झरे फुटले कातळातले
साद जीवनास देत आहे 
वृक्ष जुना तो पुरातन मी
अश्वस्थासम हिंदोळत आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २४ मे, २०२५

उंबरा

उंबरा 
*****
क्रमप्राप्त आहे आता उंबरे तुटणे 
सहाजिकच झाले आहे 
आता घराला उंबरे नसणे ही
लिव्ह इन रिलेशन चा जमाना जात आहे 
लिव्ह इन रिलेशन बेंचिंग मागे पडत आहे
लिविंग अपार्ट टुगेदर चा जमाना येत आहे
काळाची ही गरज आहे का ?
स्वार्था ची परिसीमा आहे का ?
स्वैराचाराच उत्कर्ष आहे का हा?
कळत नाही पण 
सारेच विवादाचे विषय आहेत 
स्त्री पुरुषाला एकमेकांची गरज असणे 
आणि एकमेकांवरती वर्चस्व ही नसणे
एकमेकांपासून मिळणारे सुख हवे असणे 
पण त्या सोबत राहण्यामुळे 
येणाऱ्या जबाबदाऱ्या नको असणे
अशा विचित्र मानसिक अवस्थेमध्ये 
ही पिढी जात आहे.
आणि आमची पिढी अजूनही 
उंबऱ्याच्या आठवणी उगाळत आहे.
कदाचित एखाद अर्धी पिढी अजून 
पण त्या नंतर.?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २३ मे, २०२५

ओंजळ

ओंजळ
******
दत्ता किती जमवावा 
सांग शब्दज्ञान ठेवा 
किती कुठे भटकावे
या गावाहून त्या गावा

चित्रिची गाय जाणली 
दूध लागू दे ओठाला 
कंटाळलो त्रिगुणा या 
गुणातीता ये भेटीला 

झाले गीता भागवत 
तत्वज्ञान वाचूनिया 
भारावलो आनंदलो
कथा गोड ऐकुनिया

पाण्याविन कोरडा जो
काय करू त्या आडाला 
ओल खोल दे भावाची
झरा लागू दे  भक्तीला 

कुणी पाणक्या कृपाळू 
वा भेटू दे रे वाटेला 
ओंजळीने शांत व्हावा
जीव हा तहानलेला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २२ मे, २०२५

प्रेम

प्रेम
****
एकदा प्रेम झाल्यावर 
जे विसरलं जातं 
ते काय प्रेम असतं 
एकदा दिवस उजेडला की 
सारं जग प्रकाशाचं असतं 
तिथं माघारी फिरणं नसतं 

कुठल्यातरी वेलीवर 
कळीचं आगमन होतं 
तेव्हा तिचं फुल होणं 
जसं निश्चित असतं 
तसंच प्रेमाचं असतं 

ते त्याचं सुगंधानं बहरून जाणं 
रंगानं आकाश मिठीत  घेणं 
हे जसं निश्चित असतं 
तसंच प्रेमाचं असतं 

प्रेमाचं  खरं खोटंपण कळण
फारच सोपं असतं 
मागीतल्या वाचून जे 
फक्त देतच असतं 
प्रकाश अन् सुगंधागत 
वर्षाव करीत राहतं 
तेच खरंखुरं प्रेम असतं 

अपेक्षांच्या बुरख्यात 
जे भुलवत राहतं
ते काहीतरी वेगळंच असतं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २१ मे, २०२५

मौन

मौन
****
मी रे माझ्यात एकटा 
चाले प्रकाशाच्या वाटा 
दिसे अंधार भोवती
सारा जाणूनिया खोटा 

मुग्ध एकांत कोवळा 
माझेपण नसलेला 
शत होऊनिया लाटा 
जसा सागर वेगळा 

वाहे अनंत हा वात
कधी वादळी वा शांत
नभा ज्ञात नच काही
राहे उगा ते निवांत.

का रे मिरवावे उगा 
क्षण स्तब्ध मनातले
नच बोलणे ऐकणे 
मौन प्राणात दाटले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...