गुरुवार, २२ मे, २०२५

प्रेम

प्रेम
****
एकदा प्रेम झाल्यावर 
जे विसरलं जातं 
ते काय प्रेम असतं 
एकदा दिवस उजेडला की 
सारं जग प्रकाशाचं असतं 
तिथं माघारी फिरणं नसतं 

कुठल्यातरी वेलीवर 
कळीचं आगमन होतं 
तेव्हा तिचं फुल होणं 
जसं निश्चित असतं 
तसंच प्रेमाचं असतं 

ते त्याचं सुगंधानं बहरून जाणं 
रंगानं आकाश मिठीत  घेणं 
हे जसं निश्चित असतं 
तसंच प्रेमाचं असतं 

प्रेमाचं  खरं खोटंपण कळण
फारच सोपं असतं 
मागीतल्या वाचून जे 
फक्त देतच असतं 
प्रकाश अन् सुगंधागत 
वर्षाव करीत राहतं 
तेच खरंखुरं प्रेम असतं 

अपेक्षांच्या बुरख्यात 
जे भुलवत राहतं
ते काहीतरी वेगळंच असतं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २१ मे, २०२५

मौन

मौन
****
मी रे माझ्यात एकटा 
चाले प्रकाशाच्या वाटा 
दिसे अंधार भोवती
सारा जाणूनिया खोटा 

मुग्ध एकांत कोवळा 
माझेपण नसलेला 
शत होऊनिया लाटा 
जसा सागर वेगळा 

वाहे अनंत हा वात
कधी वादळी वा शांत
नभा ज्ञात नच काही
राहे उगा ते निवांत.

का रे मिरवावे उगा 
क्षण स्तब्ध मनातले
नच बोलणे ऐकणे 
मौन प्राणात दाटले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


मंगळवार, २० मे, २०२५

आत्मविचार ( रमण महर्षी )

आत्मविचार
(रमण महर्षी आधारित)
*********

एकच विचार करा हा विचार 
आत्मविचार शुद्ध बुद्ध ॥१

एकच विचार करावा साचार 
बाकींना नकार द्यावा नित्य ॥२

"कोण मी" असून? आलोय कुठून ?
पहावे शोधून नित्य मनी ॥३

वृत्तीचा उदय येताच घडून 
राहावे जडून मुळापाशी ॥४

शून्याच्या विहिरी जावे तहानले
लोटावे आपले अस्तित्वही ॥५

त्या विना नाही दूजी सोय काही 
तहानला होई तृप्त तेवी ॥६

होऊन निवांत राहवे बसून 
आपले पाहून आत्म् तत्त्व ॥७

जयास कळले आतले पाहणे
तयाचे जगणे सार्थ काही ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १९ मे, २०२५

दुःख

दुःख 
*****
दुःख साचले मनात 
नको अडवून धरू 
पाणी वाहू दे ग डोळा 
नको कढ उरी भरू ॥१
दुःख चुकले कोणाला 
राजा अथवा रंकाला 
पहा उलटून पाने 
आले प्रत्येक वाट्याला ॥२
दुःख भेटले सीतेला 
जन्म वनवास झाला 
दुःख वाटा द्रौपदीला
जन्म वणवाच झाला ॥३
दुःखे शिणली विझली 
शिळा अहिल्या ती झाली 
राजा सवे तारामती 
किती फरफट झाली ॥४
हि तो दुःखाची शिखरे 
जणू दिसती सागरी 
लाखो पहाड पर्वत 
खोल असती दडली ॥५
खेळ दुःखाचा हा असा 
युगे युगे रे चालला 
पूस डोळ्यातले पाणी
हास हरवून त्याला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १८ मे, २०२५

पळस

 पळस
****
तो आकाशात
झेपावणारा पळस 
सुंदर आणि हिरवागार 
जेव्हा कोसळला भूमीवर 
झेलत घाव देहावर 
मग त्या विशाल पानांनाही 
धरला नाही तग
काही काळ लहरून 
साहून उन्हाची धग 
गेली तीही होत मलूल 

वर्षभर वाढणारे झाड 
क्षणात गेले होते पडून 
पदपथावरील दिव्याचा प्रकाश 
अडतोय म्हणून 
तेव्हा हुंदक्यांनी 
गेला होता सारा परिसर भरून 
आणि माझ्या डोळ्यांनी 
त्याला साथ दिली रात्रभर जागून 

उद्या त्या झाडावर बसणारा 
नाचरा बुलबुल काय म्हणेन
सात भाईंचे कलकलाटी 
खोटं भांडण कुठे रंगेन 
मलाच कळत नव्हते
त्यांना काय सांगायचं ते 

तसे झाड पाडायला 
कुठलेही कारण पुरे असते माणसाला 
शहरातील मेट्रो असो 
देवाची लाट असो 
वा दिवा प्रकाशाचा अडथळा असो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १७ मे, २०२५

तिसंगी गावची जत्रा

तिसंगी गावची जत्रा
***************
हिरव्या ओसाड गावी 
लोक थकली वाकली 
बाळखेळ पावुलांना 
माती होती आसुसली ॥१
शेत तापली धुपली 
रान गवत वाढली 
हात राबणारे परी 
दूर कुठल्या शहरी ॥२
वारा मोकळा भरारा 
वृक्षी पाखरांचा मेळा
कणकण नटलेला 
रम्य निसर्ग सोहळा ॥३
लोक होऊन चाकर 
गाव सोडूनिया गेली 
नाळ खोलवर परी 
ओढ अनावर ओली ॥४
येती जत्रा उत्सवाला 
लाट डोई झेलायला 
पाय होऊन बेभान 
नाचवती पालखीला ॥५
माय काळकाई पाही 
डोळे भरून लेकरा 
तिला ठाव असे सारा 
विश्व प्रारब्ध पसारा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १६ मे, २०२५

पायवाट

पायवाट
******
हळूहळू मनात धूसर होणारी तुझी प्रतिमा 
आणि शब्दांना लागलेली ओहोटी 
याच्यातील सरळ संबंध नाकारत नाही मी 
प्रत्येक खेळाला एक शेवट असतो 
प्रत्येक नाटकाला एक अंत असतो 
खरंतर हारजीत सुखांत दुःखांत 
याला काहीच महत्त्व नसते 
पण तरीही घडतच असते हसणे रडणे, 
स्मृतीच्या अनैच्छिक वावटळात 
भरकटतच असते मन 
तश्या येतात तुझ्या आठवणी 
पण त्याची आता होत नाहीत गाणी 
कदाचित ऋतूची करामत असेल ही 
काळाच्या वर्षावात हरवून जातात 
अनेक सुंदर पायवाटा ही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...