सोमवार, १० मार्च, २०२५

डॉ उषा म्होप्रेकर मॅडम (श्रद्धांजली )



डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस  (श्रद्धांजली )
************************
चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता  
धारण केलेले व्यक्तिमत्व होते 
म्होप्रेकर मॅडमचे 
ती शीतलता प्रियजनावर ओसंडणारी 
अविरत निरपेक्ष आणि भरभरून 
जी अनुभवली आहे आम्ही सर्वांनी
आणि ती तप्तता जी नव्हती कधीच 
जाळणारी पोळणारी छळणारी 
परंतु होती सुवर्णतप्त 
कर्तव्यनिष्ठतेच्या पदाच्या अधिकाराच्या सन्मानातून आलेली

प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून 
एम टी  अगरवाल हॉस्पिटलमध्ये 
त्यांनी केलेले काम 
होते अतिशय प्रामाणिक 
स्वच्छ आणि पारदर्शक  
कोणाच्या एका रुपयाचे मिंधेपण नसलेले
स्वच्छ निष्कलंक जीवनाचा त्या आदर्श होत्या 

प्रमुख वैद्यकीय अधिकारी या पदाचा 
त्रास त्यांनी तेवढ्याच सामर्थपणे पेलला 
जेवढा त्या पदाचा आनंद त्यांनी घेतला
मित्र आप्तेष्टा सोबत अतिशय मनमोकळेपणा
 प्रामाणिक लोकांबद्दल प्रचंड आस्था 
 ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती

काही लोक त्यांना खरोखर
मनापासून आवडायचे नाहीत 
परंतु त्यांना दूर ठेवूनही 
त्यांच्याबद्दल कुठलीही सूड बुद्धी आकस 
न ठेवता  वागल्या त्या.

एक अतिशय उदार मित्रप्रिय 
स्वाभिमानी करारी निष्कलंक 
निर्भय प्रामाणिक व्यक्तिमत्व 
आज आपल्याला सोडून गेले आहे . 
अशा व्यक्तींचे जाणें हे मित्रांसाठी 
आप्तांसाठी  फार मोठे नुकसान असते 
पण समाजासाठी एक हानी असते
या माझ्या प्रिय बॉसला आदरांजली .
परमेश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

रविवार, ९ मार्च, २०२५

वेध

वेध
****
क्षणात एका नसतो आपण 
जेव्हा सरते ठरले जीवन ॥१

कधी कुणाला कळल्या वाचून 
दिवा जातसे तमी हरवून ॥२

या असण्याला अर्थ असावा
अन् जाण्याला शोक नसावा ॥३

कधी न थांबतो काळ चालला 
जन्म मृत्यू गाठीत अडकला ॥४

जगी दिसे हा खेळ चालला 
कळल्या वाचून अर्थ बुडाला ॥५

काय पुन्हा ते असेल जन्मणे
ठाव जरी ना तरीही मानणे ॥६

 प्रश्न उरीचे सुटल्या वाचून
कुणी फिरे उगाच वणवण ॥७

मिटले पदरव जिथे प्रश्नांचे
वेध लागले मज त्या तीराचे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..


शनिवार, ८ मार्च, २०२५

पारिजातक

 पारिजातक
*********
महाडला असतांना शेजारच्या 
रवळेकरांच्या अंगणातील 
पारिजातकाची फुले
कोकणेच्या पाण्याच्या टाकीवर पडायची
अन् भाडेकरू असल्याने 
लाभ तिकोनेंना व्हायचा .

पारिजातकाच्या या खोडकर सवयी बद्दल 
फार पुढे कळले .
पण ती माझी पहिली ओळख 
पारिजातकाच्या फुलांची .
तो मंद सात्विक स्वर्गीय गंध 
जेव्हा भरला तना मनात 
तेव्हापासून मी झालो कायमचा ऋणी त्यांचा 

पारिजातकचा तो कोमल मृदुल हळवा स्पर्श
जाणवतच नाही हाताला
जणू तो जाणवतो सूक्ष्म देहाला 
खरतर स्थुळपणे त्याला नजरेचाच स्पर्श 
पुरा असतो आपला

ती फुले जणू जीवन जगत असूनही
जगाला न जाणवणारा संघ असतो 
सौम्य शालीन संन्याशांचा 
विरक्त भगवे वस्त्र देहावर ल्याईलेला 

परडी भर फुले देवाला वाहिली की 
देवघर रूप गंधानी भरून जाते
पण दुसऱ्या दिवशी 
त्यातील एकही फुल चटकन दिसत नाही .
जणू अस्तिव शून्य करून  मिटतात ती
प्रभू चरणाशी .
अन्  उरतात 
हवेच्या झुळकीने क्षणात उडणाऱ्या काही
धूसर पार्थिव स्मृती .

पारिजातक मला देत असतो एक धडा 
विरक्त तरीही सुंदर शालीन जीवनाचा 
क्षणात आयुष्य जगायचा .
अन्  सर्वस्व उधळायाचा  .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..


गुरुवार, ६ मार्च, २०२५

नर्मदा माईस (लळे)

नर्मदा माई (पुरवी ग लळे)
*********
माई सुख माझे मजला दिसते
कुठे जायचे ते गंतव्य कळते ॥१

तुझिया किनारी जन्म हा सरावा 
ठसा मी पणाचा पुसूनिया जावा ॥२

तुझिया संनिधी देह हा पडावा 
कण कण माझा तुझा अंश व्हावा ॥३

हळू हळू सारे इथले सुटावे 
पाश मी बांधले पिळ ही तुटावे ॥४

म्हणतात साधू सारे तू ऐकते 
मनातील आस सदा पुरविते ॥५

तव तीरी यावे तव रूप व्हावे 
तुझ्यासाठी जन्म पुन: पुन्हा घ्यावे ॥६

इतुके मागणे मागतो कृपाळे 
माय लेकराचे पुरवी ग लळे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ५ मार्च, २०२५

अट

अट
***
कधी शब्दावाचून कळते प्रीत
कधी शब्दावाचून अडते प्रीत ॥१
करून दूर ते लाखो अडसर 
मौन फुलांनी हळू भरते अंतर ॥२
नजर नजरेस भिडल्यावाचून 
स्पर्शात झंकार उठल्यावाचून ॥३
आत कळते कुणा खोलवर 
जीव जडला असे कुणावर ॥४
पण बंद वाटा कधी झाल्यावर 
होय हरीणीची व्याकुळ नजर ॥५
जीवलग असे पैल तीरावर 
प्रवाहाला नच दिसतो उतार ॥६
काय करावे ते नच कळते 
स्वप्न समोर परि ना मिळते ॥७
त्या विरहाचे तप्त आर्त सुर 
चांदण्यास ही करतो कापूर ॥८
वर्षा गीत ते ग्रीष्मास कळते
पळसही फुलतो उकलून काटे ॥९
होते पखरण  ग्रीष्म फुलांची  
नदी आटते जन्मों जन्माची ॥१०
पण ते गाणे व्हावे बहु कातर 
जणू याचीच वाट पाहे चराचर ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



मंगळवार, ४ मार्च, २०२५

नटपण

नटपण 
*******
स्टेज बदलते नाटक बदलते 
पात्र बदलतात प्रवेश बदलतात 
पण नट 
नट तोच असतो तसाच राहतो 
संवादात घुटमळलेला 
वेशभूषेत अडकलेला 
अन्  ते पाठांतर येते ओठी उगाच 
कुठून तरी कुठल्यातरी क्षणी 
जे पाहणार नसते ऐकणार नसते कुणी 
हे मनातील नाटक संपणे 
किती कठीण असते नाही.

खरंतर एकच नाटक 
तरी किती वेळ करायचे
जास्तीत जास्त रौप्य महोत्सव होणे 
म्हणजे खूपच झाले की
आता नवे नाटक नवे संवाद 
नवे पाठांतर हवे असते .

नवे नाटक गाजेलच असे काही नाही 
चालेलच असे काही नाही 
पण नटाचे नटपण स्वस्थ बसत नाही 
ते राहते नव्या संहिताच्या शोधात 
दिग्दर्शकला गळ घालत 
अन् घेऊ पाहते तोच गर्भ पिवळा 
सोनेरी प्रकाश झोत अंगावर 
तो जिवंत असण्याचा आभास
हवा असतो त्याला आपल्या मनावर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita

https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १ मार्च, २०२५

जाता जाता


जाता जाता
**********
जाता जाता शेवटी शेवटी टेकवला माथा 
त्या म तु अगरवाल रुग्णालयाच्या 
शेवटच्या पायरीवर 
अन भास झाला मला 
गिरनारच्या पायरीचा क्षणभर
तो तसाच आशीर्वाद हळुवार 
विसावला मस्तकावर 
तो तसाच भास उमटला माझ्यावर
स्पर्श  त्या हातांचा डोक्यावरून फिरणारा 
जाणवला मला पुन्हा एकवार 

तर इथेही तूच होतास  सतत माझ्यासोबत
 साऱ्या वादळात मला साथ देत 
कृतज्ञतेने थरारले मन हृदय आले भरून 
डोळ्याच्या कडा ओलावून निघालो मी तिथून 
मग तू मला दिसला का नाहीस आजवर 
उमटला प्रश्न मनात 
आणि असंख्य चेहऱ्यांनी
मनाचा गाभारा गेला उजळून 
दत्तात्रया किती जपलेस तू मला 
सांभाळलेस किती रूपातून 
हे रुग्णालयच गिरनार करून 
हे करुणाकरा मी उगाच तळमळत होतो 
साऱ्या पौर्णिमा व्यर्थ जातात म्हणून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...