बुधवार, ३ जुलै, २०२४

भाजी आणण्यावरून

भाजी आणण्यावरून 
****************
एक भाजी आणण्यावरून 
गढूळ होते वातावरण 
थकलेला तो थकलेली ती पण 
घरंगळले त्राण 
शक्ती गेलेली हरवून 
तो हलत नाही आपल्या जागेवरून 
तिची बोलणी या कानातून 
त्या कानात जातात वाहून
मग ती उठते कुढून चिडून 
काहीतरी ठेवते शिजवून 
त्याचा वाटा बाजूस काढून 
चक्क जाते मग निजून 
काहीही बोलल्या वाचून
प्रश्नास उत्तर दिल्या वाचून 
तोही जातो मग समजून 
मनामध्ये तसाच उबगून 
खावी न खावी भाजी 
थांबतो ठरवल्या वाचून 
खाल्ले नाही काही तर 
भांडण वाढणार असते 
अन खाणे ही तर खरोखर 
त्याचीच हार असते 
मानापनाच्या संभ्रमात 
अखेर भूक जिंकते 
अन उद्याचे भांडण 
पोटामध्ये विझून जाते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २ जुलै, २०२४

पिसाळणे

पिसाळणे
******
जनावर पिसाळू देत कितीही 
ते सांभाळता येते बांधता येते 
पण माणूस पिसाळला की .
फारच अवघड होते 
त्याला न बांधता येते 
न ताडता येते न सांगता येते

माणूस पिसाळला म्हणजे 
त्याला कुत्रे चावलेच असे काही नसते 
माणूस पिसाळला म्हणजे 
त्याला रेबीज झालाच असे काही नसते

कुत्रे न चावता माणूस
तेव्हाच पिसाळत असतो
आणि जगावर भुंकत असतो
जेव्हा तो स्वतःलाच चावत असतो

माणसाचं एक नवल असते 
त्याला आपण पिसाळलो 
हे थोडेसे कळत असते 
पण त्या पिसाळल्याचे कारण 
त्याला सापडत नसते 
कुत्रं सापडत नसते 
माकड सापडत नसते 
मांजर सापडत नसते 
म्हटले तर ते त्याच्या आतच असते 
म्हटले तर कुठेच नसते .

त्याचं ते पिसाळलेपण 
एक शाप असतो त्याच्या स्वतःसाठीही 
आणि भोवतालच्या जगासाठी ही
त्याला उ:श्याप नको असतात 
किंबहुना त्याला उ:शापाची तमाही नसते
खरंतर ती एक अंतहीन नरक यात्रा असते

अशावेळी त्याच्यासाठी मनात उमटते 
ती फक्त एक प्रार्थना .
मनात दाटते करुणा 
त्याच्या न संपणाऱ्या संचितासाठी
त्या  त्याच्या आत जळणाऱ्या वणव्यासाठी 
आणि सभोवतालच्या झाडासाठीही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १ जुलै, २०२४

दत्ताविण




दत्ताविण
**** *
अन्य काही नको  मज दत्ताविन 
होऊनी अभिन्न राहो मन ॥१

नको रे वैभव यश कीर्ती मान
दुःखाचे कारण मनास या ॥२

तव पाऊलास जडो माझे चित्त 
जाणीवे सकट जग सुटो ॥३

रहावे डुंबत तुझिया प्रेमात 
शून्याच्या घरात सर्वकाळ ॥४

जन्मास आल्याचे  घडावे सार्थक 
संता दारी भीक प्रेम मिळो ॥५

असावा विक्रांत दत्त मिरवत 
जिणे ठोकरत कामनांचे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ३० जून, २०२४

देहाचे आकाश

देहाचे आकाश
************
दत्ताचिया पदी वाहूनिया भक्ती 
पातलो निश्चिती आता रे मी 
जहाला शेवट अवघ्या यत्नांचा 
काही करण्याचा आव नाही 
ठेवील तो जैसा तैसा मी राहीन 
कृपेची लेईन वस्त्रे सदा 
असो संसाराचा दारी ताप वारा 
आपदांच्या धारा अविरत
देह जगणारा जगू देहात 
संकल्प मनात नसलेला 
दत्त बोलविता दत्त चालविता 
कर्ता करविता दत्त व्हावा
विक्रांत जगाचा सुटो कारावास 
देहाचे आकाश दत्त व्हावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी
*******
शब्दा शब्दातून ओघळते कृपा 
ज्ञानदेव रूपा कान पाही ॥१
कैवल्याचे शब्द शब्दची कैवल्य 
होतो मनोलय ऐकतांना ॥२
उरते स्पंदन एकतारी मन 
सुखे कणकण आंदोलीत ॥३
 शब्दांचे लावण्य अद्भुत अपार 
ज्ञाना अंतपार लागतो ना ॥४
किती किती वाणू ग्रंथ ज्ञानदेवी 
अनावर होई वाचा माझी ॥५
मराठी होऊन जो न ग्रंथ वाचे 
फाटक्या भाग्याचे दरिद्री ते ॥६
विक्रांता भेटला ग्रंथ महामेरू 
कृपेचा सागरू ज्ञानदेव ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २९ जून, २०२४

आशीष

 आशीष
*****

तिची गाणी त्याच्यासाठी 
त्याला कळणार नाही 
पांघरला जीव देही
कुणा दिसणार नाही ॥

वेल सखी वृक्षासाठी 
मिठी सुटणार नाही 
वादळाचे भय मनी 
साथ तुटणार नाही ॥

वृक्षावरी लोभ गाढ
वेल सोडणार नाही 
कोसळेल देह परि
प्रीत हरणार नाही ॥

असते रे प्रीत अशी 
कुणा कळणार नाही 
काळजाची आस वाया 
कधीच जाणार नाही ॥

आषाढाचा ऋतु जरी 
आभाळात हरवतो
सुखावल्या वेलीवरी
सान  फुल फुलवतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


 .

प्रदीप पुजारी

प्रदीप पुजारी 
*********"
नितळ प्रसन्न पाण्याचा झरा आहे 
प्रदीप पुजारी 
सदैव हसमुख आणि प्रसन्न मनाचा 
अजातशत्रू चतूर पापभिरू प्रसंगावधनी 
प्रामाणिक आणि कष्टाळू 
खरंतर तो म तु . अगरवालचा
 इनसायक्लोपीडिया आहे
 इथली प्रत्येक व्यक्ती चांगली की वाईट 
बरी की वाया गेलेली आळशी की बिनकामाची 
 कष्टाळू की  किमानदार 
त्याचा अंदाज न चुकणारा 
त्याचा सल्ला सदैव उपयोगी पडणारा 
त्याचे बोलणे सदैव नम्र मृदू मवाळ 
नैसर्गिक मधाळ 
त्याची विनंती धुडकावणे तर
ब्रह्मदेवालाही जमणार नाही 
त्याला काळ वेळ माणसे प्रसंगाची 
अचूक माहिती असूनही ,
आतील व बाहेरील ज्ञान असूनही 
त्याचे प्रदर्शन ते करीत नसत
**१
गेल्या 25 वर्षातील रुग्णालयातील
साऱ्या महत्त्वाच्या घटना त्यांना माहित आहेत 
त्याचे कारणे माहित आहेत 
त्याचे व निकाल व तोडगे त्यांना माहित आहेत  
पुढे येऊ घालणारे कॉमप्लिकेशनही माहित आहेत
 इथे प्रत्येकाला प्रदीप हा आपला 
आपल्या गोटातला माणूस वाटतो 
प्रत्येक प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याला 
प्रदीप उजवा हात वाटतो 
तो त्यांची सारी गुपित मनात ठेवायचा 
किंबहुना प्रत्येक प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याचा
तो हनुमान होता तो विदुर होता इसाप होता 
चाणक्य होता आणि कृष्णही होता 
समोरचा सीएमओ कसाही असो 
अगदी धृतराष्ट्र असला तरीही 
तो त्याच्या हिताच्या गोष्टी त्यांना सांगायचा 
ते सांगताना तो इसाप नीतीचे धडेही द्यायला 
कारण त्याला माणसाच्या चांगल्या व वाईट
 दोन्ही गोष्टी माहित असायच्या 
साम-दाम भेट दंड या 
जगातील रिती पक्केपणी ज्ञात होत्या 
आणि  कुणी ऐकत नसेल तर ते सोडूनही देणारा
मनात न ठेवणारा वाईट वाटून न घेणारा 
तटस्थता हा गुण ही त्याच्यात आहे 
**२
तसा प्रदीप पक्का बैठकीतला
 समर्थांचा आकाश हृदयात बांधून घेतलेला 
ओंजळीत जमलेले ते आकाश 
कौतुकाने मिरवणारा दुसऱ्याला दाखवणारा 
आणि वाटणारा ही
त्याचे ते इवलालेसे सत्संग मन प्रसन्न करून 
टाकणारे थंडगार वायूच्या झुळूकीगत .
सारं काही  विसरवणारे 
खरंतर 72 नंबर आणि प्रदीप यांचे नाते 
म्हणजे म्यान आणि तलवारीचे होते 
टाळ आणि मृदुंगाचे होते 
फाईल व पेपरचे होते 

प्रमुख वैद्यकीय अधिकारी येत होते जात होते 
पण बहात्तर नंबरच्या खुर्चीशी
प्रदीपचे इमान चिरस्थायी होते 
अगरवाल मधील सर्वांचा लाडक्या 
आवडत्या माणसासाठी जर मतदान केले 
तर प्रदीप त्यात पहिला नंबर येईल 
या त मला मुळीच शंका नाही 
**३
आता प्रदीप रिटायर होतोय
अर्थात ते खरे वाटत नाही 
पण त्याची ती शीडशीडत चपळ 
लगबगीने जाणारी हातात फायलीपी 
पिशवी सांभाळणारी अशी मूर्ती 
आपल्याला रोज ड्युटीवर दिसणार नाही 
पण त्यांनी लावलेल्या लळा आपुलकी प्रेम 
हे अबाधित राहील 
ते प्रेम त्यांना इकडे बोलावीत राहील 
आणि आपली भेट घडत राहीन 
यात संशय नाही 
या जुळलेल्या मैत्रीच्या प्रेमाच्या स्नेहाच्या
तारा झंकारत राहो 
तसेच त्यांना निवृत्तीनंतर सुख समाधान 
आनंद राहो त्यांची प्रकृती आरोग्य राहो 
त्यांच्या समर्थांच्या बैठकी रंगत राहो 
हीच प्रार्थना
**४
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...