गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

निरोपाचे गाणे


निरोपाचे गाणे
***********
घेताना निरोप सुटतात हात 
ओढ विलक्षण जागे अंतरात ॥

सुटता सुटता दृढ होते गाठ 
उसळते लाट पुन्हा हृदयात ॥

पुन्हा गळा भेट मिठी होते घट्ट 
पुन्हा कढ येतो डोळीयात दाट ॥

श्वासात वादळ पुन्हा उसळते 
उरी धडाडणे कानावर येते ॥

नको ना जावूस बोलतात डोळे 
परी रीवाजात उगा हात हाले ॥

ऐसे निरोपात जन्मा येते गाणे 
अन् खोल होते प्रेमाचे रुजणे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

तुझ्यात जगणं

तुझ्यात जगणं
***********

जावोत तुटून अवघीच दारं 
आणि अडसर  दत्तात्रेया ॥१

भिंती पडू देत छत उडू देत 
मज येऊ देत तुझ्याकडे ॥२

प्रश्न भरले जे कधी न सुटले 
मनात दाटले कोंदाटून ॥३

जावोत सुटून ठिकऱ्या होऊन 
तुजला भेटून दत्तनाथा ॥४

रात्रंदिन मग तुझ्यात जगणं 
यावे रे घडून अवधुता ॥५

नकोच काही मजला अजून 
तुझिया वाचून या जगाती ॥६

माझ्या स्वप्नात जाग सुषुप्तीत 
रहा उमटत  तूच फक्त ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

क्रियमानी गाठ


गाठ  क्रियमानी
**************
कळतात मला तुझे डोळे 
कळतात अन भाव खुळे 
माहीत नसेल तुला सखे
तूच स्वप्न  माझ्या मनातले ॥

प्रत्येक हसू तुझ्या ओठातले 
बघ या मनी मी जपून ठेवले 
आणि तुझे ते प्रत्येक पाहणे 
धुंदी जगण्याची देऊन गेले ॥

तसा फारसा हा मोठा नाही 
प्रवास तुझा नि माझा बाई 
करी बांधाबांध मी सामानाची 
मधुर हासून तू निरोप देई ॥

आहे क्रमप्राप्त तुज भेटणेही 
परी कधी कुठे ते ठाऊक नाही 
कुणा कुणाला कळल्या वाचून 
गाठ बांधली क्रियमानी मी ही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

नरहरी गुज


नरहरी गुज
*********
अवघे चरित्र गुरूंच्या लीलेचे 
लिहिले सिद्धाने प्रेमची जीवीचे ॥१

स्मरण्या गुरुला नमिण्या गुरूला 
मिळाले साधन शरणागताला ॥२

पाहता परी त्या दिसती लहरी 
अथांग अफाट भरल्या सागरी ॥३

सोडून तयाला खोल उतरावे 
सागर हृदयी तळाशी भिडावे ॥४

मोक्षाची शिंपले सोडून देऊन 
भक्तीचे मोती ते घ्यावेत शोधून ॥५

मग तो अवघ्या गुणाचा सागर 
करितो कल्याण भक्ताचे साचार ॥६

नरहरी गुज विक्रांता कळले 
तया पदी दृढ चित्त हे धरले ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

झिला


झिला
*****

फेंदारून मिशा बोले वसा वसा 
जणू काही त्याच्या घरचाच पैसा ॥ १

खरे काय खोटे त्याला न कळते 
पैसा द्या म्हणता डोकंच फिरते ॥ २

तया मिळे बहू सरे ना पगार 
परी जगू दे रे लोका हातावर ॥ ३

तया हाती शिक्का पेन धारधार 
म्हणून करे तो साळसुद वार ॥ ४

देताना चोरांना होतसे उदार 
उपाशी मारतो आणि हक्कदार ॥५

नाव गोड परी तोंड कडवट 
कोयनेल स्त्रवे जणू की मुखात ॥ ६

देई रवळनाथा थोडी बुद्धी याला 
तुझ्याच गावचो असो ना हा झिला ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद
**************
तुम्ही जर मला भेटला नसता 
तर हा मार्ग आतला 
मला कधीच कळला नसता 
ती तुमची भेट होती ठरलेली 
की होती आकस्मिक मजला न माहित 
या मार्गावरून चालताना 
भेटले बरेच काही कळले बरेच काही 
मुक्कामाचे पेणे अजून ही दिसत नाही
तरीही काही हरकत नाही
हे चालणेही खूप सुंदर आहे 
तुम्ही दाखवलेली ही वाट 
खरंतर राजमार्ग नाही 
आपणच आपल्या पावलांनी 
पाडत जायची आहे ही वाट 
आपली स्वनिर्मित पाऊलवाट 
म्हटलं तर मी एकटा आहे 
म्हटलं तर हरघडी तुमची सोबत आहे 
जरी वृक्ष कुठेतरी कुणाच्याही 
अंगणात रुजला वाढला 
आपल्याच धुंदीत बहरला 
तरी त्या लावणाऱ्या हाताचे ऋण !
ते तर प्रत्येक पानावर असते 
तसेच तुमचे ऋण आहे माझ्यावर
स्वामी विवेकानंद !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

तुझिया डोळ्यात

तुझिया डोळ्यात
************

तुझिया डोळ्यात दिसे मज गीत 
सुरावते मग माझिया मनात ॥१

शब्द हरवला भाव मनोहर 
ऐकू येतो मग कानी हळुवार ॥२

किंचित लाजरा जरा संकोचला 
स्पर्श अधीरसा होतो सुखावला ॥३

अमूर्त कविता माझी मी बघता 
विसरतो कसा वाहवा म्हणता ॥४

स्तिमित होऊन जग विसरून 
गीत पूर्ण होते तिथे हरवून ॥५

कविता जगणे लिहिल्या वाचून 
असे काही मग येतसे घडून  ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...