सोमवार, ३ जुलै, २०२३

पद

पद
*****

ते तुझे साजरे पण 
डोळ्यात मावत नाही म्हणून 
मी घेतो डोळे मिटून 
पण आतही असतेस तूच सजून 
केस मोकळे सोडून 
हातात दिवा घेऊन 
सुवर्ण स्निग्ध प्रकाशात 
गेलेली न्हावून 
झंकारतो इथला कणकण 
दिपून जाते तनमन 
एक भाव येतो उचंबळून 
कुठल्याही अर्था वाचून 
पाहता पाहता तुला असे 
माझ्या शब्दांचे गाणे होते 
माझ्या गळ्यात पद येते 
आणि तुलाच स्तवत राहते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, २ जुलै, २०२३

तऱ्हा

तऱ्हा
******

हा खेळ ओढा ओढीचा 
हा खेळ रस्सी बळाचा 
हा खेळ बुढ्या आज्याचा 
हा खेळ नव्या नातवाचा 

कुणीतरी इथे जिंकतो 
कुणीतरी इथे हरतो 
असे आम्ही वाटून घेतो
पण तो भाबडेपणा असतो 

इथे कोणीच जिंकत नाही 
इथे कोणीच हरत नाही 
ही भानगड काय कसली 
कधीच आम्हा कळत नाही 

हा ही खरा तो ही खरा 
खाडीत टाकल्या विचारधारा 
हा ही खोटा तो ही खोटा 
लग्ना वाचून जुळल्या खाटा 

झाकून घे रे डोळे पोरा 
पाहू नकोस नग्न थोरा 
जाणून घे रे पण हे जरा 
दुनियेची या अशी तऱ्हा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

जग

जग
*****

मनाचेच जग मनाचाच खेळ 
मानले म्हणून जगणे केवळ ॥

सुखाची कहाणी दुःखाची वाहणी 
कुणी ना पाहती मेले जिते कुणी ॥

असूनही जर इथे मी रे नाही 
कशाला हा भार कोण मग वाही ॥

नसले अस्तित्व मिटणेही खोटे 
सांभाळणे काय मग मी रे इथे ॥

शून्याच्या छिद्राला लावतो ठिगळ 
दत्त जाणिवेत आक्रोश निष्फळ   ॥

विक्रांत नावाच्या आधीचे रे तत्व
शोधणे असे का जे न हरवत ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘


शनिवार, १ जुलै, २०२३

प्रवास

प्रवास
******

प्रवासाचा माझ्या आता अंत व्हावा 
थकल्या पावुला विसावा मिळावा 

धावाधाव व्यर्थ केली जरी काही 
कुठे पोहोचलो तेही ठाव नाही 

भरली गाठोडी मिरवती कुणी 
आणिक ऐटीत जातात निघूनी

तयाचे कौतुक नव्हतेच कधी 
जोडत शोधत होतो मी रे साथी 

तेही हरवले वाटे निसटले 
एकटे कोंडले मी पण उरले 

बहुत पाहिले जीवन कळले 
निरर्थ केवळ वाहणे जाणले .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, ३० जून, २०२३

डॉक्टर शरद अरुळेकर

डॉक्टर शरद अरुळेकर
****************
काही लोक 
कित्येक वर्ष सोबत राहतात 
पण तरीही दूर दूरच राहतात 
तर काही लोक 
अगदी थोडाच काळ सोबत राहतात 
पण जिवलग होतात 
त्यातीलच एक माझा मित्र 
 डॉ.शरद अरुळेकर

दुसऱ्याची मन जपायची 
जिंकायची ही त्याची हातोटी  म्हणजे
काही जोपासलेली कला नव्हती
हा त्याच्या स्वभावाचा एक भाग होता
पानाचे कोवळेपण 
फुलाचे हळवेपण 
कळ्याची मृदुलता 
पाण्याची शीतलता 
जशी नैसर्गिक असते 
तसे त्याचातील हा गुण आहेत

फार कमी लोकांमध्ये ते असतात
अन् अधिकारी लोकांमध्ये क्वचित असतात

ते करताना शरदचा त्यात 
कुठल्याही प्रकारचा अविर्भाव नसतो 
आपण काही फार मोठे करतो 
असा आव नसतो 
ते त्यांचे जगणे असते 
शरद हा प्रेम कुळातील अन
संत कुळातील  माणूस आहे.
असे मला नेहमीच वाटते

या माणसाशी बोलताना जाणवते 
ही त्याची नम्रता ऋजुता कामसुपणा 
आणि ज्याप्रमाणे 
हिऱ्याच्या एका पैलू वरूनच 
त्याची किंमत कळावी 
तसा तो त्याच्यातील 
माणूसपणा मोठेपणा 
त्याच्या सौजन्यशील वागणुकीमधून
सहज कळून येतो

खरोखर त्याचे आभाळ अफाट आहे 
शरदची कीर्ती मी मित्राकडून 
इतर सह कर्मचाऱ्याकडून 
जास्त करून ऐकली
आणि आपण केलेल्या 
त्याच्याबद्दल ग्रह 
अगदी परफेक्ट आहे 
हे कळून आले 

खरंतर शरद सोबत 
काम करणे मी मिस केले 
त्याच्यासोबत मैत्रीचा काळ 
मला फारसा घालवता आला नाही 
पण जे काही मैत्री क्षण 
स्नेहाचे कवडसे मला मिळाले 
त्याची ओढ किती विलक्षण आहे 
हे मला तो रीटायर होताना जाणवते 

तो रिटायरमेंट नंतर 
सुखी समाधानी आनंदी राहील 
यात शंकाच नाही 
कारण तो  शरद आहे
शरद ऋतू सारखा 
आणि शरद ऋतूतील 
आकाश अन चांदण्यासारखा
शीतल सात्वीक आल्हादक
खरंच त्याच्या सारखी सुंदर गोष्ट 
जगात क्वचितच असते 

त्यामुळे हे चांदणं 
हा प्रेमाचा प्रकाश हे सौख्य 
त्याच्या सहवासात येणाऱ्या 
प्रत्येक व्यक्तीवर 
तो त्याच्या कळत अथवा नकळत 
वर्षांतच राहणार यात शंका नाही 
आणि हा वर्षाव झेलण्याचे
भाग्य घेऊन आलेल्या
भाग्यवान लोकांपैकी मी आहे 
आपण सारे आहोत 
हे आपले महदभाग्यच आहे!
धन्यवाद शरद.!!!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, २९ जून, २०२३

फांदी


ती फांदी
*****
जळत सुकत मन जातं
वठलेल्या फांदीगत
जीवनाचा रस ओला
नकळत हरवत 
म्हटलं तर अस्तित्व 
असतं कुठे लटकत 
पण जीवनाच्या वृक्षाला 
नसतो फरक पडत 
सुखाचे सागर 
भेटतात अनंत 
पण का ,नाही कळत 
सारेच असतात खारट
आकाशात उंचावले हात 
राहतात सदैव रिक्त 
असेल प्राक्तन  काही 
फांदी पुटपुटते स्वतःत 
अन् राहते वाट बघत 
शेवटच्या वादळाची 
सारा उन्हाळा अंगावर झेलत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘








मंगळवार, २७ जून, २०२३

तंतू

तंतू
****
साऱ्याच या जगाचा चालक रिकामटेकडा 
तोडतो मोडतो फोडतो रचतो उगाच दगडा 

घडती म्हणून घडती काही विचित्र आकार 
संगती वीण संगतीचा पाहता दिसे प्रकार 

का जाहलो कशास प्रश्न प्रत्येक पानास 
फुलतो फळतो गळतो नच सरतो प्रवास 

गणितात बांधलेल्या मज दिसती अपार कविता
सुख भोगते त्वचा ही उगाच रात दिन जळता  

मग हवालदिल मेंढ्या करती भक्ती बोभाटा 
उगा धावती थव्यांनी शोधीत आभाळ तुकडा 

जोडून चिंधी चिंधी पट किती थोर हा रचला 
तंतू असहाय्य पिळला परी  ठाव ना कुणाला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...