शनिवार, २४ जून, २०२३

तू आकाश


तू मुक्त आकाश
*************
तू मुक्त आकाश माझे 
मजसाठी विहराया 
झेपावते तुझ्यात मी 
नुरे कुठे माझी छाया 

तू निळा सागर माझा 
खोल कधी उतराया 
हरवते तुझ्यात मी 
माझेपण जाते लया 

तू धुंद पावूस माझा
येते तुज बिलगाया 
थेंब थेंब झेलतांना 
तुच होतो माझी काया 

तू शुभ्र प्रकाश माझा 
घेते मी रे पांघराया 
कणकण उजळतो 
चैतन्यात सजे माया 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘


प्रार्थना

 प्रार्थना
*******
मी आहे तोवर
माझ्या प्रार्थनेला
अंत नाही 
 पण प्रार्थना करणारे मन
त्याला अंत आहे 
म्हणून 
या प्रार्थनेलाही अंत आहे 

पण मी नसलो तरी 
हे जीवन असणार आहे 
हे जगही असणार आहे
म्हणून ही प्रार्थना ही 
असणार आहे.

थोडक्यात जोवर तू आहे 
तोवर जग असणार आहे 
आणि जोवर जग असणार आहे 
तो दुःख असणार आहे 
जोवर दुःख असणार आहे 
तोवर प्रार्थना असणार आहे 

म्हणजेच 
तू जग दुःख आणि प्रार्थना 
या चौकडीचा खेळ 
चालूच राहणार आहे 

तू वजा जग जग नाही 
जग वजा तू तू नाही 
तू  वजा दुःख दुःख नाही
तू वजा प्रार्थना प्रार्थना नाही 
प्रार्थना वजा तू तू नाही.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘*

गुरुवार, २२ जून, २०२३

हृदयी साठवत

हृदयी साठवत
*******
काय सांगू तुज त्याच त्याच व्यथा 
स्वामी गुरुदत्ता अवधूता ॥१
देही जन्मा येता चालणे हा रस्ता 
वाटसरा चिंता ठरलेल्या ॥२
कधी मिळे उन कधी ती सावली 
चालणे पाउली पुढे पुढे ॥३
दुःख वाळवंट सुख हिरवळ  
भोगणे अटळ हे तो रे ॥४
सारे तुझे देणे सारे तुझे घेणे 
मग ते मोजणे कशासाठी ॥५
देशील रे तू ते भोगणे सुखाने 
मुखी गात गाणे तुझे सदा ॥६
विक्रांत जीवनी  चाले दिनरात 
तुज हृदयात साठवत ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘*

बुधवार, २१ जून, २०२३

पाहते पाहणे

पाहणे पाहते
**********
पाहणे पाहते सांडूनी निरुते 
पाहीलिया त्याते 
तूचि होशी ॥
तोचि तू आपण तत्व ते तू जाण 
 न लगे साधन 
आन काही ॥
भानुबिंबे विन भासले तम 
ज्ञानदेव वर्म 
अनुवादला ॥
********
कुठलीही गोष्ट पाहायची असेल तर त्यामध्ये मी पाहायची वस्तू तो पाहणारा आणि पाहण्याची क्रिया ही तीन गोष्टी लागतात 
परंतु ज्ञानदेव महाराज म्हणतात की पाहणे आणि पाहते सांडून पूर्णपणे तू जर त्याला पाहिले तर तो तूच होशील.
परमात्मा तत्व पाहायचे असेल तर त्या ठिकाणी हा पाहणारा हरवून जायला हवा. पाहणे सुद्धा नष्ट व्हायला हवे .ज्ञान आणि ज्ञाता याचा निरास झाला पाहिजे.
 आणि एकदा तुला तुझे स्वरूप म्हणजे  तो तूच आहे हे कळले की मग आणखीन काही साधन करायची गरज नाही 
कारण जोपर्यंत भानुबिंब म्हणजे सूर्य नसतो तोवरच अंधार असतो भानुबिंब उगवल्यावर अंधार नावाची गोष्ट ही अस्तित्वात नसते.
 त्याप्रमाणे परमात्मा सूर्य ,परमात्मा रूपी ज्ञानाचा उदय झाल्यावरती इतर साऱ्या अहंकारादी वृत्ती त्यावर आधारलेले ज्ञान याचा आपोआपच नाश होतो 
हे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उलगडून सांगत आहेत.

सामान्य माणसाला ही गोष्ट अशक्यप्राय वाटते कारण तसा प्रयत्न करू केल्यास त्याला ते साध्य होत नाही किंवा नेमके काय आणि कसे करायचे हेच कळत नाही. त्यामुळे महाराजांचा हा अभंग त्याला साधनेच्या अंगाने पाहता दुर्बोध वाटू शकतो परंतु नीट पाहिले असता सर्व साधनांचे सार या अभंगात आले आहे. अगदी सुरुवातीला ध्यानामध्ये बसल्यावर, शांतपणे बसल्यावर आपण आपले डोळे मिटल्यावर पाहणे सुरू होते अर्थात हे पाहणे आतमधले असते. तिथे स्मृती म्हणजे आठवणी विचार शब्द चित्र या विविध प्रकाराने मन डोळ्यासमोर नाचू लागते. तिथे आत मध्ये पाहणे चालू राहते आणि पाहणारा त्यामध्ये हरवून जातो म्हणजे एकरूप होतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम पाहणे आणि पाहणारा या मध्ये एक दरी,भेद निर्माण होणे आवश्यक असते. म्हणजे पाहणारा हा त्या पाहण्यामध्ये रस न घेणारा त्यात न रमणारा असा  उपरा किंवा दृष्टा झाला की ती पाहण्याची क्रिया संपूर्णतः बदलते मग ते निखळ पाहणे चालू राहते. त्या पाहण्यात पाहणारा अजिबात स्वतःला विरघळू देत नाही मग ते पाहणे हळूहळू निरस होत जाते. त्याच्या लाटा कमी होऊ लागतात. आणि फक्त पाहणारा शिल्लक उरतो. पाहणे आणि पाहणारा आहे तसे पाहता वेगळे नसतात. त्यामुळे पाहणारा हा पाहणे नसताना च्या अवस्थेत गेल्यावरती जे स्वरूप असते ते आत्मस्वरूपच असते 
त्या ठिकाणी मी पण नसते केवळ शुद्ध स्वरूप अस्तित्वात असते तेच परमात्मा तत्व.
सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे अंधाराचा नाश आपोआपच होतो किंबहुना सूर्याचे अस्तित्व म्हणजेच तमाचा निरास .त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व ज्ञान अज्ञान विरून जाते हे ज्ञानेश्वर महाराज या अभंगांमध्ये आपल्याला उलगडून सांगत आहेत.

विक्रांत प्रभाकर तिकोणे.

सोमवार, १९ जून, २०२३

गिरनार वारी

गिरनार वारी
**********
नसूनही गर्दी हाकलती साधू 
गिरणार बंधू शिखरचे ॥१
कुणी एक नवा फोटो काढू जाता 
नरकाच्या वाटा तया दावी ॥२
कोणी धमकावे फेकीन तो फोन 
किंवा आपटेन धरूनिया ॥३
कोणा निळे शाप कळल्या वाचून 
विचारा तो दीन होय जीवे ॥४
सांगण्या कारण जावे सांभाळून 
अपेक्षा सोडून सौजन्याची ॥५
क्षणभर पहा दत्त चरणाला 
श्रम वेचलेला विसरून ॥६
होऊन चिवट हळू सरकत 
दत्त निरखत पुढे चला ॥७
बोलू द्या साधूला आणि शिपायाला 
कान त्या शब्दाला देऊ नका ॥७
जिथे असे देव तिथेच बडवे 
आम्हा हे तो ठावे सालो साल ॥८
ढळल्या वाचून गिरणार भक्ती 
जावे वहिवाटी  तेथचिया ॥९
नाही असे नाही खंतावतो जीव 
परी राही भाव अभंग तो ॥१०
बोलाव रे दत्ता गिरणार गावा 
क्षणभर जीवा भेटी देई ॥११
विक्रांत संसारी कामी क्रोधी जरी 
तुझ्या पायावरी सरो वारी ॥१२
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, १८ जून, २०२३

पाऊस पहिला

पाऊस पहिला
************
पाऊस पहिला नभात दाटला 
मज आठवला गाव चिमुकला ॥

त्या गावामधला तो पथ इवला 
जलमय झाला गंध विखुरला ॥

पथावर त्या ती होती चालली 
दप्तर पेलत वर छत्री धरली ॥

लाल रिबीनी वर घट्ट वेणी
भालावर अन गंध रेखुनी ॥

भिरभिरणारे ते टपोर डोळे 
गर्द काळे अन तेज दाटले ॥

तिला दिसावे वा तिने पहावे 
केली धडपड ती मलाच ठावे ॥

हाका मारणे कुणा मोठ्याने 
डबक्यावरून वा उडी मारणे ॥

प्रताप असले बहुत मी केले 
कुणासाठी हे तिजला कळले ॥

कौतुक भरले डोळ्यामधले 
मग मजवर होते बरसले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




Not my world


Not my world
*****************

As days are passing
I am becoming 
More and more Unfit  
to the world 
and the work

Corruption
Insensitivity
Reluctance to work 
Laziness 
Arrogance 
Dirty Politics 

Is what 
Most of 
surrounding is

Where you get tools
but no power 
you get place 
but no peace
You get collogue
But no cooperation
And you have to live
with fury and flood
wet and cold

There are fools
around you 
You have to write eassy 
to get rid of them 
And mostly 
You get defeated 
by them .

Bosses are there
to save their skin 
social worker 
cum politician
to achieve their aim
ambitions and dreams.

I think
For this 
One need to be 
become Nut 
Which I can not .
So accepting 
my defeat .
and planning exist.

I think this is not my world.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘





वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...