सोमवार, २२ मे, २०२३

चालणे

चालणे
******

काया न कष्टावी स्थिती न हरावी 
अंतरी पहावी दत्त मूर्ती ॥१

बसे दत्तात्रेय मेरुच्या शिखरी 
वाडी औदुंबरी त्याचं रिती ॥२

घडे तर घडो तेथे तुवा जाणे 
परी ते शिणणे आहे काही ॥३

घडावे भजन मनी दिन रात 
उजळावी वाट अंतरीची ॥४

बाकी धावाधाव कुण्या नशिबात 
प्रारब्धवशात असते रे ॥५

तर असा काही जाहला आदेश 
धावता आवेश थोपवला ॥६

विक्रांत हृदयी धरले साधन
तैसेच चालेन आता पथी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १८ मे, २०२३

दता भेटायाला

दता भेटायाला
***********
पुन्हा भेटायला निघालो दत्ताला 
जीवीच्या जीवाला आपुलिया ॥१

तयाविना रिते काय आहे इथे 
महात्म्य परी ते स्थानाचे त्या ॥२

जिथे गेले संत महान ते भक्त 
श्रेष्ठ नवनाथ पुन्हा पुन्हा ॥३

तयाची ती शक्ती आहे तिथे किती 
कळत्या कळती विलक्षण ॥४

मळलेले मन तिथे हो पावन 
श्रध्देची वाढून येते वेल ॥५

गिरनारी नाथा करी कृपा आता 
परत मागुता धाडू नको ॥६

घेई सामावून माझे मन प्राण
नुरावा रे कण विक्रांत हा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १७ मे, २०२३

ज्ञानदेव -कृपेचे लाघव


ज्ञानदेव -कृपेचे लाघव
****************
भाग्याचा म्हणून रानी भटकता 
भेटे अवचिता चिंतामणी ॥१
तृष्णे लागी होतो बरडी धावत 
पातलो अमृत जल तिथे ॥२
फळले सुकृत भेटले दैवत 
हव्यासा सकट दैन्य गेले ॥३
आता मी चोखट  मिरवतो दाट 
प्रेम वहिवाट आळंदीची ॥४
मायबाप सखा माझा ज्ञानदेव 
कृपेचे लाघव ओघळले ॥५
जीवनाची माझ्या सारी फुले झाली 
पडून राहिली पायी तया ॥६
आता हा विक्रांत सुखे घनदाट 
तयाचा शब्दात नांदतो गा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १६ मे, २०२३

तवंग


ओझे
*****
तनामनावर लादलेले ओझे 
कुठल्या जन्माचे कळेचिना ॥ १
ओझ्याखाली जीव होतो कासावीस 
सुख सारे ओस वाटतात ॥२
एक पेटलेली आग अंतरात 
जाळे दिनरात आतृप्तीची ॥३
मिळेल धनभोग म्हणे छान जग 
परि मी तवंग  पाण्यातला ॥ ४
वाहता वाहतो पाणीयाच्या वाटा 
पाणी नच होता येत मज ॥५
पुढे काय गती ठाव नसे स्थिती 
दत्ता तव चित्ती असे ते रे ॥६
जया सुरवात तया असे अंत
पाहतो विक्रांत उगा क्षोभ ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १४ मे, २०२३

असू दे


असू दे 
******
अजूनही ओढ तुझी मनातून जात नाही 
अजूनही रूप तुझे डोळे हे पुसत नाही ॥

जगते जरी मी इथे कशाला कळत नाही 
हे एकटेपण माझे आता पेलवत नाही ॥

येशील तू याची जरी मुळीच शक्यता नाही 
आशा पालवी आतली तरीही जळत नाही ॥

तू स्वप्न होते साजरे तू श्वास माझे आंधळे 
हरवले रंग तरी जाग येता येत नाही ॥

तू गीत माझे व्याकुळ तू भाव माझे आतुर
विसरले शब्द तरी धून जाता जात नाही ॥

ठरवले दारी तुझ्या मी कधी येणार नाही 
उरातील ओढ तुझी कश्याला बधत नाही ॥

जाणते मन जरी रे  हवे ते मिळत नाही 
असू दे जखमा उरी ज्या कधी भरत नाही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १३ मे, २०२३

दत्ता तुझी वाट

दत्ता तुझी वाट
***********

दत्ता तुझी वाट नाही सापडत
राहतो चुकत जीव सदा ॥१

दत्ता तुझी प्रीत नाही उगवत 
राही भटकत प्राण उगा ॥२

दत्ता तुझे रूप नाही रे दिसत
कळ काळजात उठे नित्य ॥३

दत्ता तुझे शब्द कानी ना पडत 
नाही उमटत नाभीकार ॥४

धिग जीणे माझे दत्ताविन वाया 
विक्रांतही काया सुटो आता ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, १२ मे, २०२३

नावेक भज


नावेक भज
*********

नावेक भज रे भज तू दत्त रे 
काढून चित्त रे 
संसारीचे ॥१
क्षण क्षण दत्त होतील मिनिट 
तेही घटीकात 
साठतील ॥२
होता आठवण दत्त व्यापी मन 
चैतन्य चांदणं 
अंतरात ॥३
सोस मागण्याचा वृथा जगण्याचा 
हरवेल साचा 
सहजीच ॥४
नाम नाम जोडी जप कर पोटी 
सुखाची विरुढी 
उगवेल ॥५
विक्रांत दत्ताला करी विनवणी 
अन्य आठवणी 
देऊ नको ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...