सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

दत्त गाणे

दत्त गाणे
********

मी दत्त गाणे गातो 
मी अवधूत गाणे गातो 
मी दिगंबराचे गातो 
मी श्रीपादाचे गाणे गातो
मी अत्रिसुतास नमितो  
मी अनुसूयानंदास स्मरतो 

पण मी हे का करतो ?
मी ही कसली  
गुंतवणूक करतो ?
मी नेमके काय मिळवू पाहतो ?
श्रद्धेने साकारलेल्या 
आणि मनाला भावलेल्या 
या मनोरम विग्रहाला 
मी माझ्या जीवनाचा भाग 
का करू इच्छितो ?

मी जाणतो 
माझ्या भोवती दाटलेला 
हा अंधकार 
विकार आणि विकाराचा
हा कोलाहाल 
दारिद्र्य दुःख दैन्य 
विषमता शोषकता 
अत्याचार अनाचार आणि युद्ध 

 या सगळ्यातून उमटणारी
 त्या पलीकडे जाऊ पाहणारी 
ती वितळलेल्या सुवर्णा सारखी 
लखलखित उर्मी 

ती  उर्मी वाहत राहावी 
ती उर्मी जळत असावी 

जी जाणू पाहते त्या 
अगम्य अनाकलनिय 
अगोचर अव्यक्ताला 
त्या सर्वव्यापी  तत्वाला 
ज्याला ती दत्त म्हणते

तो व्यक्त आहे तोच अव्यक्त आहे 
तो रंगरूपाचे अंगडे घालतो
स्वतःला सजवतो  
किंवा मीच त्याला नटवतो
अन माझ्या मनात मिरवतो
अन त्याचे गाणे गातो 

मी त्याला शोधतो 
अन मी मलाही शोधतो  
म्हणून मी दत्त गाणे गातो 
मी अवधूत गाणे गातो 
खरतर  
मी माझेच गाणे गातो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

आलीस

आलीस
******
आलीस सखी तू 
किती युगांनी 
तशीच सजूनी
नवतरुणी ॥
तशाच फिकट 
मऊ ओठातून 
शब्द उधळून 
बोललीस तू ॥
नव्हतोच जरी 
मी त्या विषयात 
परी शब्दात 
चिंब भिजलो ॥
किती विषय 
ते कुठले कुठले 
कुणी ऐकले 
कुणास ठाऊक ॥
नव्हतेच माझे 
काही मागणे 
तुजला देणे 
आणि काही ॥
तरीही भरले 
सारे रितेपण
चिंब माळरान 
चांदण्याने ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

घटीका

घटीका
******

प्रेताशी शृंगार हवा का 
वदली त्यास ती त्वेषाने
अन मग उलटून कुस
निजली दूरवर क्रोधाने 

मग तो आत थिजलेला
वृक्ष जणू की क्षणात तुटला 
होऊन अवनत धुत्कारलेला
 स्वतःच्याच नजरेत उतरला 

अरे प्रेम का देहात नसते ?
स्पर्श पालवी का न बोलते ?
अखेरच्या त्या पुलाचे परी 
तुकडे तुकडे झाले होते 

कडवट क्षण घड्याळ बोले 
पंखा गरगर वादळ हाले 
अरे तुझे ते सरले जळले 
आसक्तीचे अंकुर बहरले

ही दुःखाची का सुखाची 
घटीका नव्या जगण्याची 
का जुन्यात मरून जायची 
त्याला होती ठरवायची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

गिरनारी

गिरनारी
*******

एकटाच दत्ता राहतो कशाला 
उन वारा पाणी साहतो कशाला ॥१

इवलीशी जागा इवलीशी वाट 
सभोवत गर्द झाडी घनदाट ॥२

विरक्त विमुक्त मांडला पसारा 
भगवी पताका मिरवतो बरा ॥३

जरी तुझी सत्ता कणाकणावर 
सृष्टी किती होती तुझ्या इशाऱ्यावर ॥४

घेऊन रूप हे असे कलंदर 
का रे मागे भिक्षा फिरे जगभर ॥५

तुझी लीला फक्त तुला कळू शके 
तुला जाणण्याचे यत्न सारे फुके ॥६

तुच तुझी दे रे ओळख करून 
विक्रांत हा लीन पायाशी येऊन ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

You choose


You choose
************
You choose not to see me 
you choose not to think about me 

but tell me O dear is it possible ?
how can water forget its coolness?
how can flower forget its fragnance?
how can Earth lose its softness ?
how can Sky deny it's brightness ?
you know it  very well 
they are not separable 
and so me from you  !

I am in your breath like air !
I am in your eyes like tears !
I am in your dream like colours !
I am in your heart like a swear !

don't try it ever, let me be here 
as I am  a part of you 
weather I will be there or not there.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

दत्त कारभार


दत्त कारभार
******
कृपाळ उदार दत्त कारभार 
मोडतो संसार भाविकांचे ॥

स्नेहळ प्रेमळ दत्त प्रतिपाळ 
फोडतो कपाळ लाडक्यांचे ॥

सुहृद करुण येतो संगतीन 
देतसे सोडून जंगलात ॥

सांभाळी तपात तोडतसे पाश 
करतो निराश जगतात ॥

कोमल विमल भक्त परिमल 
उडवी चिखल समाजात ॥

दत्त नादी लागे  जग त्याचे भंगे
 तरी तेच मागे विक्रांत हा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

रुसणे

रुसणे
*****

तू रुसलेली डोळे फिरवून 
गाल फुगवून गोबरेसे ॥

समजूत तुझी वृथाच काढत 
होतो बोलत खोटे मी ही ॥

रुसणे फुगणे वरवर जरी 
उसळत उरी प्रेम होते ॥

अन गुंफले हात हातात 
मनधरणीत हसू फुलले ॥

नयनामधले दीप उजळले 
घरभर झाले वाती वाती ॥

त्या रुसण्याची गाठ मनात 
असे सुखावत  गोड किती ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...