मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

दत्त कारभार


दत्त कारभार
******
कृपाळ उदार दत्त कारभार 
मोडतो संसार भाविकांचे ॥

स्नेहळ प्रेमळ दत्त प्रतिपाळ 
फोडतो कपाळ लाडक्यांचे ॥

सुहृद करुण येतो संगतीन 
देतसे सोडून जंगलात ॥

सांभाळी तपात तोडतसे पाश 
करतो निराश जगतात ॥

कोमल विमल भक्त परिमल 
उडवी चिखल समाजात ॥

दत्त नादी लागे  जग त्याचे भंगे
 तरी तेच मागे विक्रांत हा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

रुसणे

रुसणे
*****

तू रुसलेली डोळे फिरवून 
गाल फुगवून गोबरेसे ॥

समजूत तुझी वृथाच काढत 
होतो बोलत खोटे मी ही ॥

रुसणे फुगणे वरवर जरी 
उसळत उरी प्रेम होते ॥

अन गुंफले हात हातात 
मनधरणीत हसू फुलले ॥

नयनामधले दीप उजळले 
घरभर झाले वाती वाती ॥

त्या रुसण्याची गाठ मनात 
असे सुखावत  गोड किती ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

स्वामींच्या गोष्टी

स्वामींच्या गोष्टी
************

स्वामींच्या त्या गोष्टी ऐकता ऐकता 
मन तिथे रमता नाही होय ॥१
स्वामींची ती कृपा प्रेमाचे लाघव 
सुखाचा आरव करी मनी ॥२
पाहिल्या वाचून घडते दर्शन 
शब्दात सजून आलेले ते ॥३
स्वामींचे बोलणे स्वामींचे वागणे 
घडे चितारणे आपोआप ॥४
कळल्या वाचून मग ये वाहून 
प्रवाह कुठून कृपेचा तो ॥५
ऐसी स्वामीराये घडली जी भेटी
पडे मौन मिठी विक्रांता या ॥६
झाले चिदाकाशी मनाचे उन्मन
सोहम शब्दाविन भाव जागा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

मी-तू

मी- तू
******

अस्तित्वाच्या कडे कपारीत 
राही उमटत 
तुझेच स्पंदन 
तव श्वासाचे उष्ण वादळ 
करते घुटमळ 
कणाकणात 
शब्द आर्जवी मनी उमटती 
अचलची होती 
पाय जणू
स्पर्श ओढाळ स्पर्शावरती 
नाती सांगती 
युगायुगाची
कोण असे तू कळल्या वाचून 
कळणे वाहून 
जाते माझे 
मूर्तिमंत मग मी तू होतो
तुझ्यात पाहतो 
अन मला .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

ठरले तर


ठरले तर !!
********

आज-काल सूर्य तापतच नाही वाटतंय
सोलरला उष्ण पाणी येत नाही वाटतंय

सूर्याचे पेट्रोलच संपले की काय वाटतंय
वा महागाईने त्यालाही मारलय वाटतंय

सिस्टीमचे तर सीएमसी केलेय राव 
ते कारागीर तर येऊन जातायेत राव 

म्हणजेच नक्कीच त्या सूर्याचे चुकतंय 
बिचाऱ्या बिल्डरला कोण कोसतय 

अहो पुण्यवान अन सत्य वचनी ते 
करतील चूक कशी सांगा बरं ते 

तर उद्या आपण गच्चीवर जमू यात 
आणि सूर्याचाच निषेध करूयात 

ठरले तर !!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

असणे

असणे
*****

गर्द आभाळागत 
तुझे आर्द्र डोळे 
गहिवरलेले 
कोसळण्या

ओठ कडावर 
हास्य गहिरे 
होते उमटले 
जीवघेणे

शब्द उच्चार
काही उमटले
बोल तरंगले 
हृदयात 

ते क्षण काही 
नव्हतो मीही 
नव्हतीस तू ही 
अस्तित्वात 

शिव ही नव्हता
नव्हती शक्ती 
असणे जगती
 होते फक्त

असण्याच्या 
त्या काठावरती 
अंधुक सृष्टी 
जाणीवेची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

जीवन

जीवन
*****
सर्वच गोष्टींना शेवट असतो 
सुंदर असो वाईट असो 
प्रिय असो अप्रिय असो 
रामायण ही संपते कधी 
महाभारतही संपते 
औरंग्या मरतो कधी 
जातो पापी अफजलही 
हृदयस्थ छत्रपती ही 
जातात जगत सोडूनी
ज्ञानदेव तुकाराम 
नामदेवादी संत मंडळी 
रामदास ब्रह्मचैतन्य 
संपवतात यात्रा आपली 
****
होय विक्रांत तुझीही 
यात्रा आता संपत आली 
एकदा चित्र पुसल्यावर 
ते चांगले होते की वाईट 
कोणालाच फरक पडत नाही 
त्या चित्रालाही 
ते चितारलें जाणे 
ते मिरवणे 
आणि पुसले जाणे 
या कणभर कालक्रमात 
घडते जगणे 
बस तेवढेच 
तेच असते असणे 
त्या अगोदर अन नंतरही 
असतो कागद असतो फळा 
असते पेन्सिल असतो खडू 
असण्यावरतीच हे असणे अवतरते 
असणे होऊन ही नसणे होते
ही निरंतराची 
बुद्धीच्या कक्षेत न येणारी 
व्यापकता पाहता पाहता 
सोडून देते बुद्धी आपले शोधणे 
आणि होते शरणागत 
प्राप्त जीवनाला 
सोडून मोकळे हात 
करून मोकळे अस्तित्व 
अन् मग जीवन 
जगते  जीवन
होवून जीवन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...