शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

वाणतो


वाणतो
******
सोडून हात हा 
तू आता कुणाची 
सोडुन साथ ही 
तू आता स्वतःची ॥१॥

नव्हती कधीच 
गाठ बांधलेली 
चालता प्राक्तनी  
गाठ पडलेली ॥२॥

कुणाचे असे हे 
काही देणे घेणे 
तयालागी इथे 
असे हे भेटणे ॥३॥

घडे भेटणेही 
घडे सुटणेही 
उमलता कळी 
घडे पडणेही ॥४॥

परी जाहले हे 
गंधित जगणे 
वाणतो क्षणास 
त्या कृतज्ञतेने ॥५॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

दत्त दावितो

दत्त दावितो
*********
दत्त दावितो जगणे 
मज करून खेळणे 
डाव उलटा सुलटा 
त्यात हसणे रडणे ॥१

कधी फुगवी हवेने 
उंच नेई रे वाऱ्याने 
मग फजित करुन
हवा काढतो सुईने ॥२

कधी दावून ज्ञानाला 
टाकी स्तिमित करून 
कधी लावून कामाला 
टाकी हाडास मोडून॥३ 

मित्रपरिवार सुख 
देई भरभरूनिया 
ठेवी एकांति विरक्त 
मृत्यू खेळ दाऊनिया॥४

देई यश धनमान 
सुखे भौतिक भरून 
त्यात अपूर्णता पण 
देई हळूच पेरून ॥५

आत कळते मनाला 
खेळ निरर्थ चालला 
आस जागते अंतरी 
भेटण्याची शाश्वताला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..



बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

पैसा

पैसा
*****
हे जग व्यवहाराचे पैशाचे अन कमवायचे 
माझ्या काय कामाचे उगाच ओझे वाहायचे 

पैशात सुख नसते रे पैशात प्रेम नसते 
पैसा हे वेड असते भुतागत मागे लागते 

पाच पन्नास वर्षाचे असते आयुष्य माणसाचे
यात वाया घालवायचे हे तो लक्षण मूर्खपणाचे 

फुगू देत आकडे बँकेचे ढिग जमो त्या कागदाचे 
खुळे स्वप्न गाडी बंगल्याचे पंथ अंध हे निरर्थाचे

प्रेम भरू दे कणाकणात आनंद उसळो हृदयात
गाणे उमटावे ओठात हेच घडावे फक्त जीवनात 

पोटा कपडयासाठी अन कमवावे रे छतासाठी 
पैसे एवढेच कुणी काही जमवावे जगण्यासाठी

बांधूनी हा पैसा उरावर कुणास जाता येत नाही
जग आंधळे डोळा असून त्या कधी दिसत नाही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..



मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

बुडालो नाही

नाही
****

हजारदा डोळ्यात तुझ्या 
बुडूनही मी बुडलो नाही 
किती गोंदले तुज देहावर 
चंद्र सावळा झालो नाही 

कधी हसता खळाळून तू 
भिजलो परी फुटलो नाही 
किती झेलले तुषार हाती 
कड्यावर कोसळलो नाही 

ती नाव कागदी होती जरी 
कधी वादळा घाबरलो नाही 
पडता थेंब तव डोळ्यातील 
पुन्हा कधीच भरारलो नाही 

घेऊन बाजार खिशात फुलांचा 
उधळण्यास कचरलो नाही 
फुले जुईची तुझी इवली 
वेचण्या परी धजावलो नाही 

हात तव जरी देण्यास उतावीळ
झोळी घेऊन मी आलो नाही 
जरी राहिलो आयुष्य भिकारी  
तुझ्याविना कुणा विकलो नाही 

म्हणती जग हे विक्रांत दिवाना 
कुणा विचारत बसलो नाही 
मी माझ्यातच मस्त विरक्त 
स्वप्न तुझे पण विसरलो नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

पालव




पालव
******

भक्तीचा भिकारी दत्ता मी रे बरा 
नको देऊ मला मोठेपणा ॥१

जाणतो मी माझे मूल्य ते इवले 
तार्‍यांनी भरले आभाळ हे ॥२

प्रत्येक पत्थर असे अवनीचा 
भाव हा मनाचा तुझ्यासाठी ॥३

तुच तुझे शब्द देऊनिया ओठी 
धरलेस हाती कौतुकाने ॥४

आता दूर सार शब्दांचे पालव 
रूप ते दाखव शब्दातीत ॥५

याच क्षणासाठी जन्म कोटी कोटी 
विक्रांत जगती घेईल रे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

आलीस तू


आलीस तू
*********
आलीस तू उधळीत हसू 
मेघ सावळा झालीस तू 
माझ्यासाठी पण कधीच 
नव्हता हा गं वर्षा ऋतु 

लखलख डोळे केस मखमली 
जरी सावरत बोललीस तू
त्या न गावचा होऊन उगा
मज थांबवले मी जाता ऊतू

 मन हे वैरी आपले असते 
स्वप्न दावते भलते सलते 
वारा पिऊन उगाच फिरते 
रित जगाची तया न कळते

जाणून मनीचे व्यर्थ खेळणे
दिले सार्थ त्या काही करणे
मान वळवली वही उघडली 
जगतासाठी लिहिली कवणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

पुराणातील काळ मींमासा

पुराणातील काळ मींमासा
*******************:
आणखी 1 लहानपणापासून मनात येणारी शंका. हरितालिकेच्या कहाणीत उल्लेख आहे की पार्वतीमातेने भगवान शंकरांसाठी 
64,000 वर्षे तप केलै. लहानपणी शंका यायची की इतकी वर्ष कशी? का तेव्हाचा life span आतापेक्षा जास्ती होते? 🙏🙏

उत्तर

ही गोष्ट किंवा इतर अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामध्ये तो राजा काही हजार वर्ष राज्य करतो असे लिहिलेले आहे .उदा.कार्तविर्य राजा वगैरे.  सदर कथा ज्ञानी मुनी किंवा ऋषींनी लिहिलेल्या आहेत असे मानले तरी ते इतकी वर्ष का लिहतात ते कळायला मार्ग नाही आणि आपल्या हिशोबाने हि वर्ष म्हणजे काहीच्या काहीच वाटतात तर मग हे लिहिणारे एक प्रकारचे स्वप्नरंजन तर करत नाहीत ? किंवा कुठलीही गोष्ट अंडरलाईन करायची असेल किंवा बोल्र्ड करायची असेल किंवा ती ठसवायची असेल तर तिला मुद्दाम चढवून वाढवून सांगितले जाते .ती पद्धत तर वापरली जात नाही  ना असे वाटते 

जे कोणी चार युगांची हिंदू धर्मातील धारणा मान्य करतात त्यांना तर माहीत असेल सत्य युगामध्ये मनुष्याचे आयुष्य एक लाख वर्ष होते. त्रेता युगामध्ये मनुष्याच्या आयुष्य दहा हजार वर्षे होते द्वापार युगामध्ये मनुष्य हजार वर्षे जगायचा आणि कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्य फक्त शंभर वर्ष आहे.आणि शिवपार्वती हे तर सत्य युगाच्या ही अगोदरचे आहेत त्यामुळे ६४००० वर्ष हा कालावधी तसा लहान असावा .आणि  अमरत्वा पुढे ६४०००  म्हणजे तर किती लहान आकडा आहे

वैज्ञानिक आधार शोधायला गेलो तर. . 
 जयंत नारळीकर यांच्या कथा ज्यांनी वाचल्या असतील त्यांना डायमेन्शनची थेअरी माहीत असेल मराठीत डायमेन्शनला मिती असे म्हणतात त्या थेअरी प्रमाणे एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मिति अस्तित्वात असू शकतात परंतु त्या एका मितितून दुसऱ्या मितिमध्ये प्रवेश करणे साधारणपणे शक्य नसते  (परंतु काही विशेष लोकांना काही विशिष्ट द्वारामधून किंवा वार्म होल मधून मिति  क्रॉस करायची परवानगी असावी..)त्यामुळे असे अनेक विश्व या पृथ्वीतलावर अस्तित्वात असणे शक्य आहे. तर प्रत्येक डायमेन्शन मधील काळ हे परिमाण वेगळं असू शकतं किंवा असावे ..त्याचे स्पष्ट उदाहरण श्रीकृष्णाचे बंधू बलराम आणि त्याची पत्नी रेवती यांच्या विवाहाला लागू होते रेवतीचा पिता रेवतीला घेऊन ब्रह्मदेवाकडे  योग्य वराची चौकशी करायला  गेला होता परंतु तेथे तो काही काळ थांबल्यामुळे तेवढ्या कालावधीमध्ये पृथ्वीवरील शेकडो वर्ष उलटून गेले होते व त्यामुळे त्या काळातील एकही वर रेवतीसाठी जिवंत राहिला नव्हता. ब्रह्मदेवाने तिच्या पित्याला पृथ्वीवर परत पाठवले व बलराम सध्या तिच्या साठी सर्वोत्तम वर आहे असे सांगितले.


या थेअरी वरील कालगणनेला पाठिंबा देतात या कालगणनेच समर्थन करतात . 
अन्यथा हे
मनावर ठसवण्यासाठी वाढवलेली वर्ष.असे मानणेआणि आपल्याला हवा तो चांगला त्यातील अर्थ काढणे हे ही ठिक.

डॉ.विक्रांत तिकोणे


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...