गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

जाणे

जाणे
****
आता घडेल रे तुझे जाणे 
पुन्हा पाहणे वा नच पाहणे 
सताड शून्यात उगा बसणे
त्या क्षणांना फक्त आठवणे 

का ही कथा अशीच असते 
लाट येताच पाणी भरते 
पाणी अखेर पाणी असते 
पुन्हा वाहून जाणार असते 

किती खोल हे क्षण टोचती 
हाय जीवाला जगू न देती
परी खंत ना मनी उमटती 
रे खरेच केली होती प्रिती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

तुझ्याशिवाय


तुझ्याशिवाय
**********
तुझ्याशिवाय 
कविता लिहिणे 
स्वप्न पाहणे होत नाही 

बळे बसवतो 
कुणास मनात 
भावभावनात उगा जरी 

परी तो आवेग
आस ना उत्कट 
जीवास चिरत जात नाही

तू दिलेस जे 
सुख सोनेरी 
घाव दुधारी  जगण्याला

ते जगणेही 
मागे पडले 
आणिक उरले शून्य पाही

रिक्त एकटे 
फक्त असणे 
शाप भोगणे जसा काही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .


मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

दत्त भावला


दत्त भावला
*********
दत्त  भावला 
मनात धरला 
जन्म लावला पणास मी ॥
पडो देह आता 
तयाच्या दारात 
घडो जे मनात असे त्याच्या ॥
दत्त माझे गीत 
दत्त माझी प्रीत 
दत्त मनमित जन्मोजन्मी ॥
बांधुनिया खुण- 
गाठ या मनात 
राहे स्मरणात तयाच्या रे॥
दिला जो तू भाव 
व्हावा घनदाट 
प्रार्थतो विक्रांत दत्ता तुज॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

मागणे


मागणे
******

दिसो मजलागी मानअपमान 
दत्ताचे चरण सम दोन

आली सुख दु:ख जी काही वाट्याला 
साहता तयाला येवू दे रे

घडो संतसंग भेटोत दुर्जन
पाहू दे समान दोघालागी

पिडा आधीव्याधी प्रारब्ध वा शाप
नुमटो संताप भोगतांना

देह जाऊ देरे देहाच्या वाटेने 
तया हे जगणे भाग इथे 

परी या मनाची करून गुंडाळी 
दत्त पायतळी ठेवियली

विक्रांता वासना आणिक कामना 
दत्त प्रेमाविना नको आता 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .



 

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

ज्ञानदेव

ज्ञानदेव
*****

माय बाप सखा माझा ज्ञानेश्वर 
कृपेचा सागर गुरुदेव ॥
भरवतो मुखी घास मोतियाचा 
ज्ञानाचा भक्तीचा हळुवार ॥
राहूनिया स्थिर खोल अंतरात 
राही झंकारत नामवीणा ॥
शब्दमूर्ती त्याची पुजतो सतत 
प्रेमी उच्चारत ओव्या फुले ॥
परी आर्त एक अजून मनात 
रूप डोळीयात पडले ना ॥
दिव्य पाय धुळ लावावी ती भाळा 
यावी एक वेळा माय भेटी ॥
विक्रांत संताच्या दारीचा याचक 
माऊलीस हाक मारतसे ॥
तयाच्या शब्दांचा ठेवी देवा मान 
कृपा वरदान देई मज ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

आवेग

आवेग
*****
टाळूनही तुज सख्या
मज टाळता न येते
लावूनही तावदाने 
हे वादळ न टळते

व्यापून तना मना तू
असा खोल रुतलेला
वळताच कुस थोडी 
ये जाग तव स्मृतीला

जगतेच मी भ्रमात 
बघ तुझ्या स्मरणात 
फुलतो मोहर नवा 
भरूनि हर क्षणात 

ती झिंग लोचनातील
मम लोचनात आली
त्या कृष्णकलापातील
मी झुळूक एक झाली

वेडयाच उपमा जरी 
मज त्यात त्याच येती
प्रत्येक बहरातील 
आवेग नवे असती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

हौस

  
हौस
******
कामनेचा खेळ 
पुरे हा दयाळा 
घेई रे पदाला 
तुझ्या आता ॥१

फाटलेले वस्त्र 
जरी भरजरी 
पुसण्यास परी 
राहू दे रे ॥२

नको पांघरूस 
नको मिरवूस 
पुरव  रे हौस 
भक्तीची ही ॥३

राहू दे होवून 
तुझा दास आता 
आणिक विक्रांता 
नको काही॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 



वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...