शुक्रवार, १५ जुलै, २०२२

मासोळी


मासोळी
*******

मोबाईल हातात
अन तू एकांतात 
हसते गालात 
पाहते शब्दात 

अग तू मासोळी 
लागली गळाला 
भुलली आहेस 
कुण्या अमिषाला 

भिरभिरभिर
चंचल नजर
सांग भाळलीस 
अशी कुणावर 

प्रेमाला असती
अनंत या वाटा 
मनी उमटती 
मनोहर लाटा 

भिज हवी तर 
पण बुडू नको 
गोरीच्या गायना 
कधी भुलू नको

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १४ जुलै, २०२२

स्वप्न दर्शन

स्वप्न दर्शन
******:
पाहिले स्वप्नात स्वामी माधवनाथ 
पथात चौकात दिसले अकस्मात ॥
गुरु पौर्णिमा काल उलटून जाता
पहाटे पहाटे आज ती जाग येता ॥
मज प्रिय झाले जे हृदयी भरले 
जरी प्रत्यक्षात ते कधी न भेटले ॥
श्री स्वरूपानंदांचा शिष्योत्तम तो
सोह हंसारुढ असे पुरुषोत्तम तो ॥
नव्हते स्मरण कित्येक दिवसात 
अभ्यास वाचन घडले  वा ग्रंथात ॥
पाहून तयाला हा जीव आनंदाला 
तरी  घेतओळख स्पर्शलो पदाला ॥
सुखानंद जणू तो डोलत चालला 
प्रसन्न हास्यप्रभे जगत उजळला ॥
बस इतुकेच झाले दर्शन दुबारा 
पुन्हा एकदा असे गुरुपौर्णिमेला ॥
गुरुपौर्णिमा असे त्यांची पुण्यतिथी 
मोहर उमटली ती जणू गुरु भक्ती ॥
अस्थिर मनास बोलता न आले 
पाहता न आले सांगता न आले ॥
उरी दाटलेले या आभाळ भरले 
जरी तया  मज वाहता ना आले ॥
परी दाटली जी मनी प्रसन्नता ती 
तिचे अप्रूप मी सांगू तरी किती ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, १३ जुलै, २०२२

गुरुविण

गुरुविण
*******

शून्य जन शून्य वन 
श्री गुरुविण हे जीवन
खिन्न मन खिन्न तन 
श्री गुरुविण हर क्षण 

भरे आश्रम फळफुलांनी 
रांगोळ्यांनी भक्तजनांनी 
जयजयकार स्वाहाकार 
घडे समर्पण अपरंपार 

आता आतून बोलावणे न
आळवणे न  होणे बेचैन 
कितीक झाले इथे प्रेमभंग 
अर्धे अभंग रिते अंतरंग 

अरे असू दे वाट दिसू दे 
दत्त असू दे मनी वसु दे 
वदे विक्रांत हे प्रभू दत्त 
जीवन वात आहे तेवत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, १२ जुलै, २०२२

वाहणे

वाहणे 
******
उगवतो दिवस मावळतो आहे 
आणि मी असा वाहत आहे 

उतरण पाहून पठार माळरान 
दऱ्या डोंगराना ओलांडत आहे

पुला खालून धरणा मधून 
कालवा होवून पुढे जात आहे

असंख्य प्रवाह माझ्यात सामावून 
असंख्य प्रवाहात  विखरत आहे

तोच मी नसून तोच तो होवून 
जीवन जगून दाखवत आहे 

प्राप्तव्य नसून प्राप्तव्य ठरवून 
सातत्य लेवून अस्तित्वात आहे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



सोमवार, ११ जुलै, २०२२

अवचित


अवचित
,*******

कुठे अवचित पैंजण वाजले
मातीत निजले गाणे फुलले

अन कुण्याच्या बेचैन डोळ्यात
होत हलचल रंग उमटले

ओठावर मधु शब्द उतरले
मन हरखले जीवन सजले

जणू पहाटेच्या ओल्या क्षितिजी
शुक्र चांदणे हासत आले

सजल्या वाटा प्रकाश भरल्या 
मुठीत कुणाच्या गुलाल भरले

कुण्या नवथर पाऊल रवाने
कंप दाटून तन मोहरले

मनात भरला चाफा हिरवा
श्वासा मधले गंध गोठले

किमया घडली तुझ्यामुळे ही
नव्हते तरीही अंतर मिटले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



रविवार, १० जुलै, २०२२

माझे मन

माझे मन 
********
माझे मन मला म्हणते तू धाव 
शोध अरे गाव 
मुक्कामाचे॥१
कोण चालवतो कोण भुलवतो 
शोध रे कोण तो 
कुठे आहे ॥२
दिशाच्या या भिंती अवघ्या मोडून 
छत हे तोडून 
नभाकार ॥३
देहाच्या पिंजरी वाहतो जो वारा 
तयाच्या उच्चारा 
ऐक जरा ॥३
सोडव रे पीळ कोहम सोहम 
आयुष्याचा होम 
कर आता ॥४
विक्रांत हातात घेऊनिया प्राणा
अनसुयानंदना
अर्थ मागे  ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५११

शनिवार, ९ जुलै, २०२२

कीर्तनी रंगली



कीर्तनी दंगली 
***********
घणाणतो टाळ 
अणुरेणू मध्ये 
मृदुंगाची थाप 
मना मनामध्ये

भाविक रंगली 
कीर्तनी दंगली 
जन्म जगण्याचे 
भान हरपली 

विठ्ठल गजरी
व्यथा विसरली 
नवे जीव झाली
अमृत पावुली

कामना त्यजली 
भक्ती भारावली 
देवाचिया दारी 
जणू देव झाली

विक्रांत पाहतो 
गाठही सुटली 
पाहता ऐकता 
ब्रम्हानंदी टाळी


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५०९

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...