शनिवार, २५ जून, २०२२

कुणासाठी


कुणासाठी
*******
कुणासाठी कोण कधी 
काय इथे असते रे 
ज्याचे त्याचे जगणे हे 
ज्याचे त्याचे असते रे ॥

तिचा लोभ याच्यावरी
याचे प्रेम तिच्यावरी 
सुख होते कुण्या जीवा 
मोरपीस कुण्या उरी ॥

माझे प्रेम माझ्यावरी
तुझे प्रेम तुझ्यावरी 
मोहरून जाता मन 
गाणे येथे ओठावरी ॥

प्रेमासाठी द्वैत हवे 
सुखा हवे दुजेपण 
म्हणूनिया प्रेमा सदा 
शोधतसे वेडे मन ॥

प्रेमासाठी प्रेम कुणा 
काय कधी मिळते रे
सुरक्षित घर एक 
साऱ्या हवे असते रे ॥

मानु नका त्याला तसे
पण खरे असते रे 
सत्य पचवणे इथे
अरे सोपे नसते रे 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २३ जून, २०२२

पालखी

पालखी
*******

थरारे कळस 
कळ हृदयास 
देवा तुझा ध्यास 
अंतरात ॥१

सरेना विरह
मिटेना काहुर
डोळियात पूर
आसवांचा॥२

धावते पालखी 
वेडेपिसे जीव 
अंतरात भाव 
साथ तुझी ॥३

आणिक जीवना 
हवे असे काय 
चालो सवे पाय 
देवा तुझ्या .॥४

फाटक्या देहाची 
विदीर्ण ही खोळ 
तुझ्या पथावर 
पडो देवा ॥५

विक्रांता जीवन 
दोन पावुलांचे 
आळंदी नाथाचे 
राहो ऋणी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




शनिवार, १८ जून, २०२२

तुझे घर

तुझे घर
******::

का गं बाई वाट सुखाची 
तुजला ती भेटत नाही 
किती केला त्याग तरीही 
पोच तुज का मिळत नाही .

होय तुझे ते कर्तव्य असे 
म्हणून का तू गुलाम असते 
करते करते करते म्हणून 
जगाच्या अंगवळणी पडते 

तुझ्याविना घरास या गं
घरपण ते मुळीच नसते 
तरी का  घरास तुझी या
किंमत ती मुळीच  नसते 

थांब जरा नि बघ ताणून 
काय तुझी किम्मत असते 
तशी तुटू तू देणार नाहीस 
कारण घर हे तुझेच असते 

तुझ्या घराचे तुच देवघर 
आणि निर्णया तुझी मोहर 
तसे असेल तर ते तव घर 
अन नसेल तर निर्माण कर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘३७८

शुक्रवार, १७ जून, २०२२

जीव

जीव
***:
तू सांगायचीस 
एक गोष्ट मला 
पोपटात जीव 
असलेल्या राक्षसाची
अन मी हसायचो 
म्हणायचो
असे कुठे असते का ?
एकाचा जीव 
दुसऱ्यात राहतो का ?
तू चिडायचीस रागावयाचीस 
अन म्हणायचीस  
आई कधीच खोटं बोलत नाही !

मग एक दिवस 
तू गेलीस दूर निघून  
घर शहर सोडून . .
तेव्हा मला पटले 
तुझी आई 
खरं तेच सांगायची 
एकाचा जीव 
दुसर्‍यात असतो ते !
राक्षसाचा जीव 
पोपटात असतो ते !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १६ जून, २०२२

गीत

गीत
*****

वदणार गीत नव्हतो परी 
या ओठानी केली फितुरी 

शब्दातआले भाव विभोर 
ह्रदय उघडे झाले समोर 

अन तू त्या म्हणताच बरे 
डोळ्यास फुटले लाख झरे 

कधी बहाना झाला धुराचा 
काही हवेचा थंडपणाचा

विद्ध हरिणी होतीस तू ही
शल्य उरात घेऊन काही

त्या अश्रूचे झाले अमृत 
गेल्या जखमा घाव मिटत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, १५ जून, २०२२

संभाळतो दत्त

 

संभाळतो दत्त 
***********
कारणा वाचून संभाळतो दत्त 
ठेवतो सतत याद त्याची ॥१
आम्ही नच भक्त जाणतो ना भक्ती
साधनेची युक्ती कळेचिना ॥२
आवडतो दत्त तया प्रेमापोटी 
गीत येई ओठी कधी काही ॥३
जगताचे प्रेम आहे या चितात
रूपा नि गुणात धावे मन ॥४
नका बाप करू संतात गणना 
बहुत कामना मनात या ॥ ५
विक्रांता या लाज परी न तयाची 
कशाला ढोंग्याची गादी वाहू॥६
मोहात देहात अनेक जन्मात
मज वाहू देत दत्तराया ॥७
तुज आळवतो कदा एकांतात 
किती सुखा त्यात आहे सांगू ॥८
देह हा तुझाच मन हे तुझेच 
जगणे तुझ्याच पायी दत्ता ॥ ९
बाकी घेणेदेणे काही चुकवणे 
घडते कृपेने तव प्रभू ॥ १०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


 

कारण

कारण
******

कारणेही खूप होती 
कामेही खूप होती 
पण ते सारेच
वरचे बहाणे होते 
खरंतर तुला फक्त
उगाच पाहणे होते 
जाता जाता सहजच 
हाय-हॅलो करणे होते
निष्पन्न अन त्यातून ? 
 छे! काहीच करणे नव्हते 
एक झुळूक वायूची 
होऊन फिरणे होते 
सुगंधित मन अन
अस्तित्व करणे होते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...