शनिवार, ८ जानेवारी, २०२२

उपकार

{photo .from internet.}
उपकार 
******

जा उधळीत रूप तू
तुझाच बाजार आहे 
मी एकटा कुठे इथे 
हे दर्दी हजार आहे 

तू पाहू नकोस कधी 
दिसणे मुश्किल आहे 
दाटून आभाळ थोर
तुझा जयकार आहे 

नच मागतो तुला मी 
हि स्वप्न हजार आहे 
नि वार काळजावर 
जे माझे उधार आहे 

किती चोरले कटाक्ष 
चुकवीत या जगाला 
देऊ कसा त्या परत 
जगण्या आधार आहे 

तू येऊ नकोस कधी
दुनिया आबाद आहे 
तू भेटलीस काय हा
कमी उपकार आहे

जगतो येथे विक्रांत 
स्मृतीत राहतो आहे 
पाहतो सदा अंतरी
तुझाच वावर आहे  

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

साधू

साधू
******
नदी तीराला तेज भरला 
होता एक तो साधू बसला 
 
हातामध्ये त्या होती कुबडी 
वस्त्र भगवी जाडी भरडी

डोळे उघडे नव्हते उघडे 
जणू उघडली आत कवाडे  

डोई कपाळी खांद्यावरती 
उग्र  कुरूळ्या जटा रुळती

भस्म फासले नाम कोरले 
मणी रुद्राक्ष गळ्यात सजले

कधीकाळी जग सांडला
काळ प्रवाही देह वाहीला

कोण कुणाचा कधी असेल 
कुणास ठावूक किंवा नसेल

असेल घर काय तयाला 
किंवा सांडला व्याप पसारा 

काय असतील सगेसोयरे 
कधीकाळी वा बायका-पोरे

अथवा मस्त फकीर मलंग 
सर्वकाळ जो आपल्यात दंग 

तया सारखे व्हावे आपण 
क्षणोक्षणी हे  म्हणते मन

परि तो दत्त नाहीच ऐकत 
संसारात या सदैव विक्रांत

मग मनीचा मज गोसावी 
वेडे स्वप्न एक काही दावी 

भगवे नेसून देह चालला 
नाव हरवला गाव पुसला

अंतर्बाह्य तो दत्त भरला 
 सर्वकाळ नि ओठी सजला

नसल्या वाचून माझे मी पण 
प्रभू पदावर अर्पून जीवन 

त्या स्वप्नाला सत्य मानून
हे स्वप्न मग जातो पाहून

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

 

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

गुंफण


गुंफण
******
कशी तुटते कुणाच्या 
वेड्या मनाची गुंफण 
नाती विभक्त होऊन 
उरे एकाकी जीवन 

वाटा सुटतात कधी 
पथ मोडतात कधी 
जरी एकच प्रवास 
हात सुटतात कधी 

शब्द चुकलेले काही 
हट्ट रुतलेले काही 
माळ तुटता गळ्याची 
मोती ओघळून जाई 

असे असते किती रे 
इथे आयुष्य हातात 
सरे संसार थाटला 
तीन-चार दशकात 

पंख लावून काळाचे 
सुख विहंग उडतो 
मनी भरला उत्कट
क्षण कालचा गमतो 

कणकण आनंदाचे 
घ्यावे ओंजळी भरून 
द्यावे उंच उधळून 
जाण्याआधी ओघळून

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

चित्र

चित्र
*****

तू हरवून गेलीस 
सोबत तुझी चित्रही
प्रत्यक्ष दुर्लभ जरी 
तो आधार होता काही 

किती दिस उलटली 
स्मृतिचित्रे हरवली 
निर्गुणात याद दृढ 
डोळे कासाविस झाली 

हळूहळू हरवेन
मीही काळवाही येथे 
घडेल वा न घडेल 
गाठ तुझी कधी कुठे

सांगणार नाहीस तू 
गोष्ट तुझी कधी कुणा 
मीही कधी उजागर 
करणार नाही खुणा 

हरवेल कुजबुज 
जगती या वेळ कुणा 
सांभाळून ठेवेन ते
तरीही तुझे चित्र मना

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, २ जानेवारी, २०२२

नरसोबाच्या वाडीला

नरसोबाची वाडी
*************

देव राहातो वाडीला 
माय कृष्णेच्या तीराला 
सदा रक्षितो भक्ताला 
धाव घेतो संकटाला 

त्याने ओढले मजला 
वेड लावले जीवाला 
पदचिन्हात सजला 
ठसा जीवी उमटला

किती चालावे  रिंगणा
किती घालू प्रदक्षिणा 
हौस पुरेना फिटेना 
वाटे पथ व्हावे मना

किती डुंबावे कृष्णेत
मनमोहक तीर्थात 
घोष ह्रदयी गर्जत
किर्ती देवाची मुखात

सुखे भरलो भरलो 
दत्त दर्शन पातलो
साऱ्या चिंता विसरलो 
येणे जाणे हरवलो 

दत्त भरला भरला 
अंतर्बाह्य रे साचला 
काही सांगण्या जगाला
विक्रांत नच उरला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, १ जानेवारी, २०२२

मावळत्या सूर्याने

मावळत्या सूर्याने
***************

मावळून दिन गेला 
वर्षामधला पहिला 
एक एक बावीसचा 
बघ दोन होत आला 

तारखांना अंत नाही 
सारा खेळ आकड्यांचा 
काळ हा अकाल आहे 
संबंध ना घड्याळाचा 

या क्षणात काळ आहे 
जरी दिसे वाहणारा 
पण चाळा या मनाला 
कल्पनेचा वारा प्यारा 

मावळत्या सूर्याने का 
उगवत्या त्या सूर्याला 
म्हटले असे इथे की 
माझ्याहून तू वेगळा 

जीवन हे व्यक्त ज्यास
जगणे ही आहे भास 
अनाकलनीय तरी
एक दिव्य चिद्विलास 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

काका महाराज


काका महाराज 
************
महाशक्तीचा पुजारी 
स्वामी दीक्षा अधिकारी 
गुरु मूर्त स्वप्नांतरी 
पाहिली  मी ॥१

काका महाराज श्रेष्ठ 
भक्तराज ते वरिष्ठ 
घडे तयांची रे भेट
ऐसी काही ॥२

वेष तसाच नित्याचा 
काळी टोपी धोतराचा 
वरी कोट नि शोभेचा 
सुप्रसिद्ध ॥३

तया पाहता धावलो 
आणि नमिता जाहलो 
माळ रुद्राक्ष पातलो 
हातामध्ये ॥४

जरी साधने पासून 
व्यस्त दूर हरवून 
बीज पेरले येऊन 
पाहताती ॥५

कधी घडली ना भेट 
कधी पाहिली ना थेट 
मुद्रा तरी ह्दयात 
उमटली ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...